प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

थेरगाथा व थेरीगाथा.- खुद्दकनिकायांतील निरनिराळे ग्रंथ कसे अव्यवस्थित रीतीनें एकत्र केलें आहेत हें या वरील दोन नीरस व रुक्ष काव्यांशेजारीं लागलीच थेरगाथा व थेरीगाथा हीं दोन सौंदर्य व जोरदारपणा या गुणांमुळें सरस असलेलीं अशीं काव्यें ग्रथित केलीं आहेत यावरून दिसतें. हीं दोन काव्यें ॠग्वेदांतील सूक्तांपासून तों कालिदास व अमरु यांच्या पद्यांपावेतों कोणत्याहि उत्कृष्ट काव्याच्या तोडीचीं आहेत. थेर आणि थेरी गाथा हे दोन काव्यांचें संग्रह आहेत. पहिल्यामध्यें १०७ काव्यें असून त्यांत १२७९ पद्यें (गाथा) आणि दुस-यांत ७३ काव्यें असून ५२२ पद्यें आहेत. हीं कांहीं थेर व थेरी (वुद्ध भिक्षू व भिक्षुणी) यांनीं रचलीं असून रचणा-यांचीं नावें दिलेली आहेत. हीं नांवें आपणांला हस्तलिखितांतून व धम्मपाल याच्या टीकेंतहि आढळतात. ही टीका ख्रिस्ती शकाच्या ५ व्या शतकाच्या सुमारास रचली असून तिच्यामध्यें या थेर व थेरी यांच्या चरित्रविषयक गोष्टीहि दिल्या आहेत. या गोष्टी कांहीं अंशीं पद्यांवरून जमविलेल्या आहेत, व कांहीं इतर कथाग्रंथांतून अथवा कल्पनेनें रचून घातल्या आहेत. त्या खरोखर घडलेल्या गोष्टी आहेत असें नाहीं. त्याप्रमाणेंच हीं सर्व काव्यें त्याच (नांवें दिलेल्या) थेर अथवा थेरी यांनीं रचल्याबद्दल जी परंपरा आहे तीहि खरी मानतां येत नाहीं. परंतु हीं सर्व काव्यें एकानेंच केली नसून अनेकांनीं केलीं आहेत; व त्यांपैकीं कांहीं थेरांनीं व थेरींनीं केलीं आहेत. येथपर्यंत ही परंपरा बरोबर आहे. निरनिराळ्या कर्त्यांच्या नांवावर असलेलीं कांहीं काव्यें एकानेंच केलीं असतील किंवा एकाच्याच नांवावर असलेलीं काव्यें अनेकांनीं केलीं असतील. त्याप्रमाणेंच भिक्षूंच्या काव्यांतील कांहीं काव्यें भिक्षुणींनीं केलीं असतील व भिक्षुणींच्या काव्यांतील कांहीं भिक्षूंनीं केलीं असतील. परंतु हीं सर्व एकाच्याच मेंदूंतून खास निघालीं नाहींत. कांहीं गोष्टींत विशिष्ट शब्दसमूह वारंवार आढळतो आणि त्यांतील रहस्यहि बहुतांशीं एकच आहे असें दिसतें. तरी यावरून केवळ त्यांवर बौद्ध कल्पनांचा ठसा उठला आहे एवढीच गोष्ट सिद्ध होते. के. ई. न्यूमन याच्या मताप्रमाणें या सर्व काव्यांवर एकाच व्यक्तीच्या कल्पनांचा ठसा आहे असें म्हणतां येत नाहीं.

भिक्षुणीगीतांतील बहुतेक गाणीं स्त्रियांनींच रचिली असावींत याबद्दल संशय नाहीं. स्त्रीहृदयांतून निघालेलीं हीं गाणीं पुरुषांनीं रचिली असतील असें न म्हणण्याइतकीं बौद्ध भिक्षुवर्गास भिक्षुणींबद्दल कळकळ कधींच वाटत नसे. या गोष्टींच्या प्रतययाकरितां गौतमानें आपल्या दाईच्या भिक्षुणीसंघ स्थापन करण्याच्या मार्गांत किती अडचणी घातल्या याबद्दल जी परंपरागत माहिती आहे व स्त्रियांचा कैवार घेतल्याबद्दल आनंद यास सांप्रदायिक ग्रंथामध्यें ठिकठिकाणीं दूषणें दिलीं आहेत त्यांकडे पहावें. याच कारणामुळें वस्तुस्थिति जर इतकी विरुद्ध नसती तर या काव्यांचें कर्तृत्व भिक्षुणींकडे देण्यास त्यांचें मन केव्हांहि तयार झालें नसतें. या भिक्षू व भिक्षुणी यांच्या गीतांतील भाषा, भाव आणि त्यांचा खरा रोख यांमधील फरक मिसेस र्‍हीस डेव्हिड्स यांनीं चांगला दाखविला आहे. हे दोन्ही संग्रह जो एकामागून एक वाचील त्याला असें आढळून येईल कीं, भिक्षुगीतांमध्यें न आढळणारी वैयक्तिक आत्मविषयक छटा भिक्षुणीगीतांमध्यें वारंवार दिसून येते. भिक्षुगीतांमध्यें मनाचे निरनिराळे विकार अथवा अनुभव वर्णन केलेले असतात, तर भिक्षुणीगीतांमध्यें ठिकठिकाणीं त्यांनां बाहेरच्या जगाचे आलेले अनुभव दृष्टीस पडतात. भिक्षुगीतांत सृष्टिवर्णन अधिक आढळतें तर भिक्षुणीगीतांत आयुष्याचें चित्र दृष्टीस पडतें.

यां ती ल आ ध्या त्मि क व नै ति क त त्त्वें.- दोन्ही संग्रहांमध्यें आध्यात्मिक ध्येय व नैतिक तत्त्वें यांचे उद्धाटन केलें आहे. या सर्व भिक्षूंनां व भिक्षुणींनां मनाच्या अत्यंत शांतीपेक्षां कोणतीहि गोष्ट अधिक वाटत नाहीं. या शांतीमुळें साधूंचा देवांनां हेवा वाटतो. हिची प्राप्ति राग, द्वेष व भ्रम यांचा नाश केल्यानें आणि सर्व विषयवासनांचा त्याग केल्यानें होते; आणि हिच्यामुळें पुनर्जन्माच्या अभावाबद्दलची जाणीव झाल्यामुळें सर्व दुःखांचा शेवट होऊन अत्युच्च सुख जें निर्वाण त्याचा अनुभव मिळतो. ज्या भिक्षूला सुख व दुःख या दोहोंचीहि जाणीव होत नाहीं, व ज्याला भूक अथवा थंडी यांची बाधा होत नाहीं तो सुखी होय. ज्या भिक्षुणीला स्वतःबद्दल पुढें दिल्याप्रमाणें म्हणतां येईल ती सुखी होय (थेरीगाथा ७६) : ''ऐहिक अथवा पार लौकिक सुखाची इच्छा नष्ट झाली आहे; विषय आणि विभ्रम यांचा मी त्याग केला आहे, मला शांति व सर्वश्रेष्ठ सुख जें निर्वाण त्याची प्राप्ति झाली आहे.'' हीं ध्येयें व मुख्य जीं चार नैतिक तत्त्वें - आर्यचतुर्विधिमार्ग, सर्वभूतदय (मेत्त), अहिंसा व आत्मनिग्रह हीं धम्मपदांतील वचनें व सुत्तनिपातांतील पद्यें याप्रमाणेंच या काव्यांतहि एकत्र वर्णन केलीं आहेत. ही भिक्षू व भिक्षुणी यांचीं गीतें, त्यांच्या स्वतःबद्दलचेच उद्गार व स्वतःचेच अनुभव असल्यामुळें वरील दोहोंपासून भिन्न आहेत. एका भिक्षूनें मोठ्या प्रौढानें त्याची बायको व मुलगा त्याच्या शांतीचा भंग करीत असल्यामुळें त्यानें त्यांचें बंधन कसें तोडून टाकिलें हें सांगितलें आहे (थेरगाथा २९९ इ.) दुस-यानें आपल्या बायकोपासून, देंठापासून ज्याप्रमाणें कळी वेगळी होते त्याप्रमाणें हळू हळू परंतु कायमची सुटका करून घेतल्यामुळें त्याला मिळालेल्या सुखाचें वर्णन केलें आहे (थेरगाथा ७२). तिस-यानें एका वेश्येचे पाश आपण कसे तोडून टाकिले तें सांगितलें आहे (थेरगाथा ४५९ व पुढील). भिक्षुगीतांमध्यें ठिकठिकाणीं स्त्रियांची निंदा करून त्यांनां भुरळ पाडणा-या, बंधनकारक व भिक्षूला त्याच्या पवित्र जीवितक्रमापासून भ्रष्ट करण्याचा सतत प्रयत्न करणा-या असें म्हटलें आहे. एकजण म्हणतो, कितीहि बायका आल्या तरी त्या मला मोहूं शकणार नाहींत (थेरगाथा १२११). स्त्री हें सर्व दुःखाचें कारण आहे. जो तिच्यापासून निश्चयानें दूर रहातो तोच विजयी होतो (थेरगाथा ७३८ व पु.). एका भिक्षूनें एका स्त्रीच्या कुजत असलेल्या प्रेतास पाहिल्यामुळें आपणांला सन्मार्गाकडे जावयाची प्रेरणा कशी झाली, याचें मोठें किळसवाणें वर्णन दिलें आहे (थेरगाथा ३१५ व पु. आणि ३९३ व पु.). या ओंगळ वर्णनाच्या उलट कांहीं सुंदर वर्णनेंहि आहेत. एका ठिकाणीं एका भिक्षूनें आपल्या आईनें आपणाला सत्याची ओळख कशी करून दिली तें सांगून तिचे सुंदर शब्दांनीं आभार मानिले आहेत. दुस-या एका भिक्षूनें आपण भिक्षु झालों परंतु या जगास कायमचे सोडून गेलों नाहीं असें म्हणून आईचें सांत्वन केलें आहे (थेरगाथा ४४). एकानें आपण गळलेलीं फुलें वेंचून त्यांवर किती गरीबीनें निर्वाह करीत असूं व नंतर आपण बुद्धाकडे येऊन मुक्तीचा मार्ग कसा शोधून काढला हें सांगितलें आहे (थेरगाथा ६२० व पु.). दुस-या एकानें आपण राजपुरोहिताचे पुत्र असून किती श्रीमंतींत रहात असूं, व पुढें बुद्धाचें दर्शन होऊन आपणाला दीक्षा कशी मिळाली याचें वर्णन केलें आहे (थेरगाथा ४२३ व पु.). एका भिक्षु झालेल्या राजानें आपल्या पूर्वीच्या ऐश्वर्यसंपन्न दरबाराची व त्या वेळच्या भिक्षुवृत्तीची तुलना केली आहे (थेरगाथा ४८२ व पु.). पूर्वीं दरोडेखोर असून नंतर भिक्षु झालेल्या लोकांनींहि आपल्या पूर्वचरित्राचें वर्णन केलें आहे. तथापि भिक्षुगीतांमध्यें अशा त-हेच्या बाह्य परिस्थितीचें वर्णन कमीच आहे. बहुतकरून त्यांमध्यें भिक्षूंच्या अंतःस्थितीचें लहान लहान कवितांमध्यें वर्णन केलें आहे. तथापि थेर तलपुट याच्या गीतांमध्यें एक मोठें काव्य असून त्यामध्यें पवित्र ध्येय मिळविण्याचा प्रयत्न करणा-या भिक्षूंचें आत्मगत भाषण दिलें आहे.