प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तिस्स मोग्गलिपुत्त.- तथापि ज्या सिंहली बखरींस व्ही. ए. स्मिथ उत्तरकालीन म्हणून कमी विश्वसनीय मानतो त्यांवर इतर कांहीं यूरोपीय पंडितांप्रमाणें विश्वसून विंटरनिट्झ पुढें म्हणतो कीं, परंपरेवरून पाहतांहि असेंच दिसतें कीं, ही संगीति अशोक राजानें स्वतः बोलाविलेली नसून ती विद्वान् आणि सर्वमान्य अशा तिस्स मोग्गलिपुत्त या भिक्षूनें बुद्धप्रणीत (सत्संप्रदायाचें) धर्मशास्त्र रचण्याकरितां बोलाविली होती. त्याच्या निमंत्रणावरून पाटलिपुत्र (पाटणा) येथें १००० भिक्षूंची संगीति भरली होती. त्याच्या मताप्रमाणें बुद्धांच्या प्रथम शिष्यांनीं पाळलेला व विभज्यवादी पंथाचा जो थेरवाद तोच बुद्धप्रणीत संप्रदाय होता. तिस्स हा स्वतः त्याच पंथाचा अनुयायी असून या संगीतीमध्यें त्यानेंच प्रमुख भाग घेतला होता. या संगीतीचें अधिवेशन पाटलिपुत्र येथें ९ महिने चालून तींत याच पंथाच्या धर्मशास्त्राची रचना करण्यांत आली. तिस्स यानेंच 'कथा वत्थु' हा भाग रचून तो धर्मशास्त्रामधें सामील केला अशी जी परंपरागत माहिती आहे तीहि विंटरनिट्झ यास विश्वसनीय वाटते. 'कथा वत्थु' या भागांत तत्कालीन सर्व पाखंडांचें खंडन केलेलें आहे. सिंहली बखरींवरून पाहतां याच तिस्सानें बौद्ध संप्रदायाचा प्रसार करण्याकरितां उत्तरेकडे व दक्षिणेकडे प्रथम प्रचारक धाडून बौद्ध संप्रदायाचा परदेशांत प्रसार करण्याचा उपक्रम केला. अशोकाचा धाकटा भाऊ (कांहींच्या मतें अशोकाचा पुत्र) महिंद हा या तिस्साचा शिष्य असून त्यानेंच बौद्ध संप्रदाय व बौद्ध धर्मशास्त्र यांचा सिंहलद्वीपांत प्रवेश करविला असा समज आहे.