प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तिपिटकाचें प्राचीन व अर्वाचीन स्वरूप.- यावरून पालीभाषेंतील तिपिटक हें जरी अशोकाच्या वेळीं रचलेल्या धर्मशास्त्राशीं जवळ जवळ सदृश असलें, तरी त्याची भाषा व त्यांतील विषयक हीं एकच असणें शक्य नाहीं. कारण ख्रिस्तपूर्व तिस-या शतकापासून पहिल्या शतकापर्यंत व हें धर्मशास्त्र लिहिलें जाऊन निश्चित होईपर्यंत - किंवा त्यानंतरहि - त्याच्या स्वरूपांत फरक होत गेले असले पाहिजेत. विशेषेंकरून त्यांत पुष्कळ भर पडली असली पाहिजे, व मूळ ग्रंथांवरील टीका त्या ग्रंथातच सामील झाल्या असल्या पाहिजेत. या ग्रंथांच्या परंपरेची ॠग्वेदांतील सूक्ताच्या परंपरेशीं तुलना करणें बरोबर नाहीं. संस्कृतहून ब-याच भिन्न असलेल्या प्राचीन भाषेनें वैदिक सूक्तांचें रक्षण केलें आहे. वैदिक सूक्तांत प्रक्षिप्त भाग तेव्हांच ओळखतां आला असता. उलटपक्षीं पाली भाषा मठवासी भिक्षू वापरूं लागल्यामुळें, त्या भाषेंत निष्णात असलेल्या उत्तरकालीन इसमास पाली ग्रंथांत मागून प्रक्षिप्त भाग घुसडणें बरेंच सोपे होतें. हा जो मध्यंतरीं दोन हजार वर्षांचा काल गेला त्यानें आपला कांहीं तरी ठसा या ग्रंथांवर उमटविला असलाच पाहिजे. याखेरीज, या ग्रंथांमध्यें दिसून येणा-या कित्येक परस्परविरुद्ध वचनांची, एकत्र ग्रथित केलेल्या जुन्या व नव्या परंपरांची व निरनिराळ्या संग्रहांत आढळून येणा-या पुनरुक्तींची, संगति आपणांस लावतां येणार नाहीं.
तथापि अशा प्रकारच्या पुनरुक्तींवरून व विरोधांवरून एकंदर धर्मसूत्रें मूळचीं व खरीं नाहींत असे अनुमान करणें बरोबर होणार नाहीं. एखादी कविता बुद्धाची आहे असें एखाद्या ग्रंथांत सांगितलेलें असून ती सारिपुत्ताची आहे असें दुस-या ग्रंथांत म्हटलें असेल, किंवा एखादें भाषण राजगृहामध्यें केलेले होतें असा एका ग्रंथांत उल्लेख असून तें काशी येथें केलेलें होते असा दुस-या ग्रंथांत उल्लेख असेल, तर हीं दंतकथात्मक वचनें खरीं नाहींत एवढेंच यावरून सिद्ध होतें. परंतु या कवितांवरून व भाषणांवरून बुद्धाच्या प्राचीन तत्त्वांचा बोध होत नाहीं असें मात्र त्यावरून सिद्ध होत नाहीं. धर्मसूत्रांतील प्रत्येक शब्दा खरा असून बुद्धाशीं त्याचा संबंध आहे या कर्मठ बौद्धांच्या समजुतीला विघातक असे फ्रँकी वगैरे टीकाकारांचे युक्तीवाद आहेत; परंतु धर्मसुत्रें कांहीं अंशीं खरीं व मूळचीं आहेत अशी जी यूरोपांतील पंडितांची कल्पना आहे, त्या कल्पनेविरुद्ध कोणताहि आधार नाहीं.
उपयुक्त गोष्टी लक्षांत ठेवूनहि आपणांस असें म्हणतां येईल कीं, पाली तिपिटकाचा बहुतेक भाग साधारणतः ख्रिस्तपूर्व तिस-या शतकांत लिहिल्या गेलेल्या मागधी धर्मशास्त्राहून फारसा निराळा नाहीं. या गोष्टीची साक्ष अशोकाच्या शिलालेखांवरून विशेषेंकरून पटते. अशोकाच्या शासनांमध्यें पाली धर्मशास्त्रांतील जुन्या सूत्रांत असलेलेंच रहस्य दिसून येतें; एवढेंच नव्हे तर या दोहोंतील भाषहि सारखीच असून अशोकाच्या शासनांत आढळून येणारीं अवतरणें या धर्मशास्त्रामध्यें थोड्या फार फरकानें जशींचीं तशींच आढळून येतात. बैरात येथील ख्रि. पू. २४९ मधील शासनामध्यें या राजानें मगध देशांतील भिक्षूंस उद्देशून, बुद्धाचीं सर्व वचनें चांगलींच आहेत असें म्हटलें आहे. परंतु त्यानें सातच ग्रंथांची नांवें दिलीं असून त्यांचा अवश्य अभ्यास करावा असें सांगितलें आहे. हे ग्रंथ सध्यांच्या सुत्तपिटकामध्यें कांहीं त्याच नांवांखालीं व कांहीं त्यांसारख्या नांवांखालीं आढळतात. शिवाय ख्रिस्तपूर्व दुस-या शतकांतील व त्यापूर्वींचे भरहुत, सांची वगैरे ठिकाणीं जे स्तूप आहेत त्यांवर कांहीं सूचक लेख व चित्रेंहि खोदलेलीं आहेत.