प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

थेरवाद नांवाचें यथार्थत्व.- या सिंहलद्वीपांत लिहिल्या गेलेल्या व परंपरेनें चालत आलेल्या धर्मशास्त्रा मध्यें खुद्द सिंहलद्वीपाचा कोठेंहि उल्लेख नाहीं. यावरून हें सिंहली बौद्धांचे धर्मशास्त्र नसून भारतवर्षीय बौद्ध संप्रदायाचें धर्मशास्त्र आहे या गोष्टीस बळकटी येते. अर्थात् यामुळेंच सर्वांत प्राचीन बौद्ध संप्रदाय आज कायम राहिला असून, या धर्मशास्त्रास दिलेलें थेरवाद म्हणजे बुद्धाच्या पहिल्या शिष्यांचा संप्रदाय हें नांव यथार्थ आहे. हें पाली धर्मशास्त्र बौद्ध संप्रदायाचें यथार्थ ज्ञान देतें एवढेंच नव्हे, तर केवळ वाङ्‌मयाच्या दृष्टीनेंहि पाहिलें असतां हे ग्रंथ सर्व बौद्ध वाङ्‌मयामध्यें श्रेष्ठ आहेत.