प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
दीघ निकायाच्या रचनाकालावर प्रकाश पाडणारीं आणखीं कांहीं सुत्तें.- दीघ निकाय हा संग्रह अलीकडे पूर्ण झाला आहे ही गोष्ट नं. ३२ या व इतर सुत्तांवरूनहि सिद्ध होते. यांमध्यें राक्षस व सर्प यांचें निवारण करण्याचे मंत्र दिलेले आहेत. त्याप्रमाणेंच नं. २६ या सुत्तामध्यें भविष्यत्कालीं होणारा बुद्ध मेत्तेय्य याचा उल्लेख आहे. थिऑसॉफिस्टांचा भावी महात्मा तो हाच होय. संगीति आणि दसुत्तर या दोन शेवटल्या सुत्तांमध्यें अभिधम्मपिटक याची रचना होण्यापूर्वीं प्रचारांत नसलेलीं कांहीं वाक्यें आलीं असून त्यांची रचना अंगुत्तर निकायासारखी आहे. यावरूनहि वरील गोष्ट सिद्ध होते.