प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

निकायांतील परस्पर संबंध.- या चार निकायांतील परस्पर संबंध पाहतां - क्षुद्रकनिकाय याचें स्वरूप अगदींच निराळें आहे - एवढी गोष्ट मात्र निश्चित दिसते कीं, कांहीं सूत्रांची मालिका या संग्रहांपैकीं एकांतच नव्हे तर निरनिराळ्या संग्रहांत आढळते व सूत्रांतून प्रतिपादन केलेल्या तत्त्वांमध्यें या चारहि संग्रहांत मुळींच फरक आढळत नाहीं. पुष्कळ ठिकाणीं तर एखादें सूत्र मूळ कोणत्या संग्रहांत असावें हें निश्चित करणें फार कठिण आहे. उदाहरणार्थ, ज्यामध्यें स्त्रियां नरकांत जाण्यास कारणीभूत होतात अशा तीन गुणांचें वर्णन केलें आहे. तें सूत्र, संयुत्त आणि अंगुत्तर या दोन्ही निकायांमध्यें आढळतें व तें पहिल्या संग्रहामध्यें स्त्रीविषयक सूत्रांमध्यें व दुस-या संग्रहांमध्यें तीन संख्याविषयक सूत्रांमध्यें योग्यच दिसतें. उलटपक्षीं संयुत्तनिकायांतील कांहीं प्रकरणें अंगुत्तरनिकायांतील सूत्रांच्या पुरवणीदाखल अथवा उदाहरणादाखल असल्यासारखीं दिसतात. उ. (सं. नि. ३७, १४-२४ व अंगु. नि. ५,२३०) दीघनिकायांतील सूत्रें पुष्कळ ठिकाणीं प्रथम लहान असून नंतर वाढवल्यासारखीं दिसतात. उ. मज्झिम निकायांतील दहावें सूत्र (सति पठ्ठान सुत्त) हें अक्षरशः दीघनिकायामध्यें (नं. २२ महासति पठ्ठान सुत्त) आढळतें. मात्र या ठिकाणीं त्यांत कांहीं टीकात्मक मजकूर अधिक घातलेला आढळतो. त्याचप्रमाणें परिनिब्बानसुत्त हेंहि त्यांत पुष्कळ भर पडल्यामुळेंच एवढें मोठें झालें आहे. तसेंच दीघनिकायांतील कांहीं मजकूर अंगुत्तरनिकायामध्येंच जास्त योग्य दिसतो. शेवटच्या दोन निकायांमध्यें सूत्रांची संख्या बरीच वाढण्याचें कारण मुख्यतः एकाच विषयावर निरनिराळीं अनेक सूत्रें रचलीं गेलीं हें होय. असाच प्रकार मज्झिमनिकायामध्येंहि आढळतो. तसेंच मज्झिम व दीघनिकायांतील कांहीं प्रवचनें फार लांब असण्याचें कारण त्यांत वारंवार झालेली पुनरुक्ति हें होय. हे सर्व सूत्रसंग्रह आरंभीं त्यांची : आवश्यकता असल्यामुळेंच रचले गेले ही गोष्ट लक्षांत आल्यावांचून रहात नाहीं. हीं सूत्रें प्रथम भिक्षूंस आचार घालून देण्याकरितां, त्यांनां उपदेश करण्याकरितां, समाजामध्यें प्रवचन करण्याकरितां किंवा नित्यविधींचा काल व पूजापद्धति वगैरे निश्चित करण्याकरितां अस्तित्वांत आली असावींत. त्यांत वारंवार आढळून येणा-या पुनरुक्तीचा आतां जरी आपणास कंटाळा येत असला तरी त्या पुनरुक्तीवरून हीं प्रथम वाचावयाकरितां केलेलीं नसून तोंडानें सांगण्याकरितां रचलीं होतीं ही गोष्ट सिद्ध होते.