प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
पहापरिनिब्बाणसुत्तांतील बुद्धाचें चित्र.- तितकाच जुना व मूळचा भाग म्हटला म्हणजे, पांचव्या प्रकरणामध्यें बुद्धाच्या निर्वाणाचा समय जवळ आला तेव्हां आनंद यास तें दुःख असह्य होऊन तो बाहेर दरवाज्याजवळ उभा राहून रडूं लागला असतां, बुद्धानें त्याच्या प्रेमाची जाणीव दर्शवून त्याचें प्रेमळ शब्दांनीं शांतवन केलें या प्रसंगाचें जेथें वर्णन केलें आहे तो होय. या सुत्तामध्यें इतस्ततः आढळून येणा-या गाथाहि ब-याच प्राचीन दिसतात. या गाथांमध्यें बुद्धाचीं व त्याच्या शिष्यांची कांहीं मार्मिक वचनें असून, कांहीं ठिकाणीं कथांमधील विशेष प्रसंग त्यामुळें मनावर जास्त ठसतात. या सर्व ठिकाणीं बुद्ध आपणाला साध्या माणसाप्रमाणेंच बोलतांना आढळतो. याच सुत्ताच्या इतर भागांत तो एखाद्या मांत्रिकाप्रमाणें किंवा यक्षाप्रमाणें चमत्कार करतांना आढळतो. उदाहरणार्थ, एके ठिकाणीं तो माझ्या इच्छेस येईल तर मला आपल्या मंत्रसामर्थ्यानें जगाच्या कल्पान्तापर्यंत आपलें आयुष्य वाढवितां येईल, अशी आपल्या सामर्थ्याची प्रौढी मारतो; दुस-या एका ठिकाणीं बुद्धानें निर्वाणास जावयाचा निश्चय केल्यामुळें भूकंप झाला असें म्हटलें असून, या प्रसंगाचा फायदा घेऊन बुद्धानें भूकंपाचीं आठ कारणें सांगून त्यांची जगांतील आठ पदार्थांशीं जी तुलना केली ती दिली आहे (३.११-३३). या ठिकाणीं आपणांला नंतरच्या लेखकांनीं घुसडून दिलेला बराचसा मजकूर आढळतो. या मजकुरामध्यें प्राचीन गोष्टींतील मर्म अथवा प्राचीन लेखकांची स्फूर्ति, यांचा अल्पहि अंश सांपडत नाहीं. पुष्कळ ठिकाणीं हा प्रक्षिप्त भाग कोठून आला तें शोधून काढणें फारसें कठिण नाहीं. कारण या सुत्ताचे कांहीं भाग जसेचे तसेंच तिपिटकाच्या इतर भागांत आढळत असल्यामुळें तेथूनच ते आले असावेत हें उघड होतें. परंतु या प्रक्षिप्त भागांनीं सुत्ताच्या मूळ स्वरूपांत विशेषसा फरक केला नाहीं. हें सुत्त वाचीत असतां ख्रिस्ती मनुष्यास त्याच्या शुभ वर्तमानाची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाहीं.