प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

पाली धर्मशास्त्रांतील विनयपिटक.- बौद्ध लोक विनयपिटकाला आपल्या धर्मग्रंथांमध्यें आद्यस्थान देतात. तेव्हां त्याचा आपण प्रथम विचार करूं. परंतु यावरून सुत्त पिटकापेक्षां हा ग्रंथ अगोदर रचला गेला आहे असें आपण मानतों असें मात्र नाहीं. विनयपिटकामध्यें पुढील ग्रंथ येतात. १ सुत्त विभंग [(अ) पाराजिक, (आ) पाचित्तिय]; २ खंधक [(अ) महावग्ग, आणि (आ) चुल्लवग्ग]; ३ परिवार अथवा परिवार पाट.

सुत्तविभंग.- याचा अर्थ सुत्तांची फोड, म्हणजे विवरण असा असून सुत्त याचा अर्थ येथें पातिमोक्खांतील निरनिराळीं वाक्यें अथवा कलमें असा आहे. या ग्रंथांत पापांची यादी असून ती २२७ निरनिराळ्या कलमांत वर्णन केलेली आहे. सर्व भिक्षू व भिक्षुणी एकत्र जमले असतांना हा ग्रंथ त्यांपुढें पठन करीत असत; व प्रत्येक वचनानंतर त्या सभेचा अध्यक्ष हजर असलेल्या सर्वांत त्यांच्यामधील कोणीं वर्णन केलेलें पातक केलें आहे काय असें विचारी; व तसें असल्यास त्यास आपलें पाप कबूल करावें लागे. उपोसथ विधि हा प्रत्यक्ष बुद्धापासूनच प्रचारांत आला असावा; आणि पातिमोक्ख हा बौद्ध वाङ्‌मयाचा सर्वांत प्राचीन भाग असावा. या पातकांची यादी जरी हस्तलिखित ग्रंथांतून निराळा भाग म्हणून दाखविली जाते, आणि यामुळें जरी ती धर्मशास्त्रांत अंतर्भूत होत नाहीं, तरी सुत्त विभंगामध्येंच तिचा समावेश केलेला आहे. कारण यामध्यें पातिमोक्खावरील केवळ जुनी टीका असून तिलाच पुढें शास्त्रीय महत्त्व आलें आहे. तिजमध्यें प्रत्येक सुत्तांतील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला असून एक कथा सांगून तीमध्यें बुद्धानें स्वतः तो नियम कोणत्या वेळीं घालून दिला ते सांगितलें आहे.

पा रा जि क व पा चि त्ति य.- सुत्त विभंगाचे त्यांत वर्णन केलेल्या पातकांवरून दोन भाग करण्यांत आले आहेत. पहिल्या भागास पाराजिक असे म्हणतात, व त्यांत वर्णिलेल्या पातकांमुळें मनुष्य संप्रदायबहिष्कृत होत असे. दुस-या भागास पाचित्तिय असें नांव असून त्यांत वर्णन केलेल्या पातकांस प्रायश्चित्तें सांगितलेलीं आहेत.

खंधक [खंडक?].- हा भाग सुत्तविभंगाच्या पुरवणीदाखल असून त्यामध्यें संघाच्या निरनिराळ्या व्यवस्थेबद्दल नियम आहेत. त्यांनां अनुसरून भिक्षू व भिक्षुणी यांची दिनचर्या आंखली जात असे.

खंधकांतील व सुत्तविभंगांतील कथानकांमध्यें लेखनपद्धतीसंबंधीं इतकें साम्य आहे कीं ओल्डेनबर्गच्या मतें ते दोन्ही ग्रंथ एकाच काळीं लिहिले गेले असावेत. सारख्या सारख्या विधीचें वर्णन करते वेळीं दोन्ही ग्रंथांत सारख्याच प्रास्ताविक गोष्टी दिल्या आहेत (ओल्डेन्बर्ग, विनयपिटक प्रस्तावना, पृ. २२ व पुढील पानें पहा).

म हा व ग्ग व चु ल्ल व ग्ग.- खंधकाचे महावग्ग व चुल्ल वग्ग असे दोन भाग आहेत. महा वग्गाच्या दहा प्रकरणांमध्यें संघांत प्रवेश करण्याबद्दल, उपोसथ विधीबद्दल, वर्षाकालांतील दिनचर्येबद्दल, पवारणा म्हणजे वर्षाकालानंतर करावयाच्या विधीबद्दल, पादुका वापरण्याबद्दल, आसनें व वाहनें याबद्दल, भिक्षूंचीं वस्त्रें व औषधी यांबद्दल, व विशेषतः संघाच्या नियमनासंबंधीं मतभेद उत्पन्न झाला असल्यास त्याची चौकशी कशी करावी याबद्दल नियम सांगितले आहेत. चुल्ल वग्गामध्यें पहिल्या नऊ प्रकरणांत किरकोळ गोष्टीबद्दलचे शिस्तीदाखल नियम दिले आहेत. उदाहरणार्थ, प्रायश्चित घेण्याचे व व्रतबंधाचे निरनिराळे प्रकार, वादग्रसत प्रश्नाचा निकाल, भिक्षूंची दिनचर्या, त्यांचे निवास व त्यांतील सामानसुमान, त्यांची परस्परांशीं वागणुक व पातिमोक्ख विधि केव्हां जरूर नाहीं याबद्दल नियम आहेत. चुल्लवग्गाच्या दहाव्या प्रकरणांत भिक्षुणीचा धर्म सांगितला आहे. सुत्तविभंग ज्याप्रमाणें पातिमोक्खाच्या पायावर रचलें गेलें आहे, त्याप्रमाणें खंधकामध्यें सांगितलेल्या क्रिया व विधी करण्यासाठीं आधारभूत असा ''कम्मवाचा'' म्हणजे क्रियाविषयक नियम किंवा शब्द हा भाग जोडलेला आहे. पातिमोक्खाप्रमाणेंच याचाहि अंतर्भाव तिपिटकामध्यें होत नाहीं. परंतु ज्याप्रमाणें वैदिक ब्राह्मणांमध्यें व सूत्रांमध्यें मंत्रांचा समावेश केला आहे. त्याप्रमाणेंच यांचा खंधकामध्यें समावेश केला आहे. अकरावें व बारावें प्रकरण हीं चुल्लवग्गाला परिशिष्टादाखल कांहीं कालानंतर जोडलेलीं असून त्यांमध्यें राजगृह व वैशाली येथील पहिल्या व दुस-या संगीतींची हकीकत दिली आहे. ज्या अर्थीं परिशिष्टामध्येंहि संप्रदायाच्या इतिहासाबद्दलचीच माहिती दिली आहे त्या अर्थीं आपणांस असें म्हणतां येईल कीं, विनयपिटकांतल्या ग्रंथांत बौद्ध भिक्षूंचा संघ हा एकच विषय आहे.