प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
प्रत्यक्ष बुद्धाचीं वचनें.- या कालांत कांहीं बौद्ध वाङ्मय उत्पन्न झालें असेल काय ? मुळींच नाहीं. यद्यापि बौद्धांचे पाली भाषेंतील सांप्रदायिक ग्रंथ जे तिपिटक अथवा त्रिपिटक यांमध्यें सर्व भाषणें व वचनें बुद्धांच्याच तोंडी घातलीं आहेत; व तीं भाषणें त्यानें कोणकोणत्या प्रसंगीं केलीं हेंहि निश्चितपणें व सविस्तर दिलें आहे. तथापि खरोखर बुद्धाचीं वचनें यांपैकीं कोणतीं हें निवडून काढणें जवळ जवळ अशक्य आहे. कारण बुद्धाचे स्वनिर्मित ग्रंथ याज्ञवल्क्य, शांडिल्य अथवा शौनक यांच्या इतकेच असणें शक्य आहे. परंतु वर निर्दिष्ट केलेल्या ॠषींचीं ज्याप्रमाणें बरींचशीं भाषणें व वचनें उपनिषदांमधून परंपरेनें चालत आलीं आहेत, त्याप्रमाणेंच बुद्धाचीं बरींचशीं भाषणें व वचनें त्याच्या शिष्यांनीं आपल्या स्मरणांत फार काळजीपूर्वक ठेवून तीं परंपरेनें कायम राखलीं असावींत. 'सत्यचतुष्टय' म्ह. चार आर्य सत्यें यावरील बुद्धाचें काशी येथील प्रवचन; 'अष्टविध मार्ग' म्ह. आर्य अष्टांगिक मार्ग यावरील भाषण (हें सांप्रदायिक पाली ग्रंथांमध्यें त्याचप्रमाणें बौद्ध- सांप्रदायिक संस्कृत ग्रंथांमध्यें त्याच शब्दांत अनेक वेळां आलेलें आहे); निर्वाणापूर्वीं आपल्या शिष्यांस उद्देशून केलेलीं महापरिनिब्बान सुत्तांमधील त्यांची अखेरचीं भाषणें; आणि धम्मपद, उदान, इतिवुत्तक व नेपाळांतील संस्कृत ग्रंथ व त्यांची तिबेटी आणि चिनी भाषांत असलेलीं भाषांतरें यांमध्यें जीं पद्यें व ज्या उक्ती 'बुद्धाचीं वचनें' म्हणून आढळतात तीं; हीं सर्व खास बुद्धाचींच असावींत असें म्हणण्यानें आपण अंधश्रद्धेच्या आरोपास पात्र होऊं असें वाटत नाहीं. शिवाय, गौतमानें केवळ हें जग दुःखमय आहे या तत्त्वाचा व त्या दुःखाचा परिहार कसा करावा याबद्दलचा उपदेश केला एवढेंच नव्हे, तर त्यानें एका नियमबद्ध संप्रदायाची स्थापना केली होती. त्यानें आपल्याभोंवतीं शिष्यमंडळ जमविलेलें होतें. हा शिष्यवर्ग त्यानें घालून दिलेल्या कडक नियमांचें पालन करून आपल्या गुरूच्या उपदेशाप्रमाणें शुद्धाचरण ठेवून सर्व दुःखांचा अंत जें अत्युच्चनिर्वाण त्याची प्राप्ति करून घेण्याच्या मार्गास लागला होता. तेव्हां या भिक्षुसंघाचे कांहीं नियम व आचार स्वतः बुद्धानेंच घालून दिलेले असले पाहिजेत. विशेषतः 'दससीलम्' किंवा भिक्षुवर्गास केलेल्या दहा आज्ञा व 'पातिमोक्ख' अथवा स्वापातकनिवेदन ही या सदरांखालीं येतात. सारांश, कोणताहि बौद्ध वाङ्मयांतील ग्रंथ सर्वतः बुद्धकालीन म्हणतां येणार नाहीं; तरी त्यांतील कांहीं निवडक भाग बुद्धाचीं वचनें म्हणून मानल्यास तें चूक होणार नाहीं. एवढें मात्र खरें कीं, बुद्धाच्या पहिल्या शिष्यांपैकीं कांहीं विशेष बुद्धिमान् असून त्यांनीं या संग्रहांतील कांहीं भाषणें, श्लोक व वचनें स्वतःच रचून त्यांत सामील केलीं असण्याचा संभव आहे. पाली गाथांतील वचनें फार प्राचीन असावींत असें वृत्तांवरूनहि व्यक्त होतें. पाली गाथांतील वृत्तें रामायणांतील वृत्तांपेक्षां प्राचीन आहेत असें ओल्डेनबर्गचें मत आहे (गुरुपूजाकौमुदी पृ. ९ व पुढील पानें).