प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

पुनरुक्ति.- या सूत्रांमध्यें आढळून येणारे शब्द व वाक्यें यांच्या पुनरुक्तीमुळें हीं प्रवचनें वत्तृफ्त्वाच्या दृष्टीनें जास्त परिणामकारक होत व तीं श्रोत्यांच्या मनावर चांगलीं ठसत असत. हीं प्रवचनें जर लिहून विद्यार्थ्यांस वाचावयासाठीं दिलीं असतीं तर तीं आतांइतकींच तेव्हांहि कंटाळवाणीं वाटलीं असतीं. त्यांतील सर्व पुनरुक्ति कायम ठेवून या सूत्राचें भाषांतर करणें जवळ जवळ अश्यक्य आहे. के. ई. न्यूमन यानें जर्मन भाषेमध्यें लिहिलेल्या ''गौतम बुद्धाचीं भाषणें'' नांवाच्या ग्रंथामध्यें ठिकठिकाणीं ही पुनरुक्ति कायम ठेवण्याच्या कामीं फार चिकाटी दाखविली आहे. तरी तेथेंहि कांहीं ठिकाणीं ही पुनरुक्ति गाळावी लागली आहे. कारण ओल्डेनबर्गच्या म्हणण्याप्रमाणें या बौद्ध भिक्षूंस ''आणि'' हा शब्द खरोखरच माहीत नसावा असें दिसतें. एवढेंच नव्हे तर त्यांस सर्वनामांचा उपयोगहि अज्ञात असावा. संयुत्तनिकायांतील खालीं दिलेलें भाषण (१५, ३) आंतील द्विरुक्ति गाळल्यास किती जोरदार व उदात्त दिसतें पहा:-

बुद्ध म्हणाला, ''भिक्षूहो, हा संसार आद्यंतरहित आहे. अज्ञानाने आवृत व वासनेनें बद्ध असे हे जीव कधींपासून भ्रमण करूं लागले हें कळत नाहीं. कारण हे भिक्षूंनो, तुम्ही इतस्ततः भ्रमण करीत असतां तुमचा अनिष्टाशीं झालेला संयोग व इष्टापासून झालेला वियोग यापासून झालेल्या दुःखानें तुम्ही गाळलेले अश्रू व महासागरांतील उदक यांमध्यें जास्त कोणतें ?''

''महाराज,'' भिक्षू उत्तर करतात, ''आपण उपदेशिलेल्या तत्त्वांप्रमाणें आम्हांला इतस्ततः या दीघ मार्गावर भ्रमण करीत असतां अनिष्टसंयोग व इष्टवियोग यांपासून झालेल्या दुःखामुळें गाळलेले अश्रू हे सागरांतील पाण्यापेक्षां अधिक वाटतात.''

बुद्ध म्हणतो, ''उत्तम, उत्तम, फार उत्तम. हे भिक्षूहो, मी उपदेशिलेल्या तत्त्वांचा तुम्हांस बरोबर बोध झाला आहे. होय. या दीर्घ मार्गावर भ्रमण करीत असतां अनिष्टसंयोग व इष्टवियोग यामुळें तुम्ही गाळलेले अश्रू हे चतुःसागरांतील पाण्यापेक्षां अधिक आहेत. तुम्हांला मातृवियोगाचा अनुभव पुत्रवियोगाचा अनुभव, कन्यावियोगाचा अनुभव, वस्तुवियोगाचा अनुभव, आप्तवियोगाचा अनुभव व रोगामुळें झालेल्या नाशाचा अनुभव पुष्कळ दिवस आलेला आहे व हे वर सांगितलेले (मातृवियोग इ. पुन्हां सर्व) अनुभव घेत असतां व अनिष्टसंयोग व इष्टवियोग यांबद्दल शोक करीत असतां तुम्ही गाळलेलें अश्रुजल चतुःसागरांतील पाण्यापेक्षां जास्त आहे. यांचें कारण काय ? हे भिक्षूहो, हा संसार आद्यंतरहित आहे. अज्ञानानें आवृत आणि वासनांनीं बद्ध असे हे प्राणी केव्हांपासून भ्रमण करूं लागले हें कळत नाहीं. आणि म्हणून या जगांतील वस्तूंबद्दल तिटकारा येण्यास पुरेसें कारण आहे; त्यांच्याबद्दल द्वेष वाटण्यास पुरेसें कारण आहे; व त्यांपासून सुटका करून घेण्यास पुरेसें कारण आहे.''

तथापि, इतर सूत्रांप्रमाणें या सूत्रांतील पुनरुक्तिस्थलें इतकीं प्रमाणाबाहेर नाहींत; आणि यामुळेंच ज्या लहान व त्रोटक वचनांतून एकच विचार अगदीं स्पष्टपणें मांडलेला आहे, आणि ज्याचें विवेचन एकहि अनवश्यक शब्द न घालतां केलें आहे तीं सूत्रें जास्त आवडतात. या चारहि निकायांमध्यें असे संवाद थोडेसे आढळतातच. यामुळें, कांहीं सयुक्तिक कारणांवरून आपणांला असें गृहींत धरतां आलें, कीं आटपसर व अशीं पुनरुक्तीनें दूषित न झालेलीं सूत्रें हीं या संग्रहांतील सर्वांत जुनीं सूत्रें आहेत, तर या चार संग्रहांतील अमुक एक संग्रह दुस-या संग्रहापेक्षां आधीं रचला गेला असें म्हणण्यास जागा रहात नाहीं. तें कांहींहि असलें, तरी चारहि निकायांमध्यें कांहीं फार प्राचीन व कांहीं अलीकडील सूत्रें आहेत हे स्पष्ट आहे. चारहि संग्रहांमधील सूत्रांमध्यें ज्या कांहीं चांगल्या गोष्टी सामान्यतः आढळतात, त्यांवरून या सर्व सूत्रांची मूलतत्त्वें एकच आहेत ही गोष्ट दृष्टीस पडते. त्या सर्वांतहि मधूनमधून आपणांला कांहीं तुटक संवाद आढळतात. यांमध्यें बुद्धाचे प्रतिस्पर्ध्यांशीं झालेले वादविवाद दिलेले आहेत. हे वादविवाद सुसंस्कृत, सयुक्तिक, सभ्य व मनोहर अशा पद्धतीनें चाललेले आढळतात. त्याचे प्रतिपक्षी ब्राह्मण अथवा इतर सांप्रदायिक लोक असत. प्रथमतः तो आपल्या प्रतिपक्ष्याचें सर्व म्हणणें पुढें मांडीत असे. त्यानें दाखविलेले सर्व मुद्दे त्याच्याच भाषेंत व त्याच्याच दृष्टांतांसह घेऊन त्याची बाजू पुढें मांडून न कळत त्याला तो त्याच्या अगदीं उलट बाजूला नेत असे. हे संवाद रचणा-यांनां प्रत्यक्ष बुद्धानें त्या वादविवादाच्या प्रसंगीं केलेल्या भाषणांची आठवण असावी असें र्‍हिस डेव्हिड्सप्रमाणें विंटरनिट्झहि धरून चालतो व सॉक्रेटिस याच्या विवेचनपद्धतीची कल्पना ज्याप्रमाणें आपणांस प्लेटोच्या संवादांवरून येते, त्याप्रमाणेंच बुद्धाच्या विवरणपद्धतीची कांहींशीं कल्पना आपणांस वरील संवादावरून करितां येईल असें तो म्हणतो.