प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

पुग्गल पञ्ञत्ति. - (व्यक्तिवर्णन) अभिधम्मपिटकांतील या पहिल्या ग्रंथाचें स्वरूप व आंतील विषय हीं अद्यापीहि पुष्कळ ठिकाणी सुत्तपिटकांतील ग्रंथांप्रमाणेंच दिसतात. याचे स्वरूप दीघ निकायांतील संगीतिसुत्ताहून किंचित् निराळे असून यांतील ३ ते ५ हीं प्रकरणें बहुतेक अंगुत्तरनिकायामध्यें आलीं आहेत. यामधील कांहीं प्रकरणें इतर निकायांतील कांहीं सुत्तांप्रमाणेंच असून तीं इतरांपेक्षां अधिक चांगलीं दिसतात. मधून मधून कांहीं सुंदर दृष्टांत आढळतात. उदाहरणार्थ, निरनिराळ्या त-हेनें स्त्रियांशीं संबंध असलेल्या पांच प्रकारच्या भिक्षूंनां पांच योध्यांची उपमा दिलेली आहे (५,३), आणि हाच दृष्टांत मज्झिम निकायामध्यें बारीक सारीक गोष्टीतहि लावून दाखविलेला आहे. परंतु या ग्रंथामध्यें वाङ्‌मयाच्या दृष्टीनें ज्यांचें महत्त्व नाकबूल करतां येणार नाहीं, अशीं ठिकाणें थोडींच आढळतात. साधारणपणें ग्रंथाच्या इतर मागांप्रमाणें दृष्टांतहि बहुतेक नीरस आणि कंटाळवाणें आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय निरनिराळ्या व्यक्तीचें त्यांच्या नीतिमत्तेच्या दृष्टीने वर्गीकरण करणें हा आहे. खालीं दिलेल्या उदाहरणावरून या ग्रंथांचें धोरण, आणि व्याख्या व वर्गीकरणें यांचे अभिधम्मांतील वास्तविक स्वरूप यांची कल्पना येईल.

प्र. -  क्रोधयुक्त कोणास म्हणावें आणि क्रोध म्हणजे काय ?
उ. - क्रोध म्हणजे संतापणें; संतापयुक्त व द्वेषयुक्त होणें; द्वेष करण्याची क्रिया; द्वेषयुक्त मनःस्थिति; रागीट असणें; देहभान विसरणें; रागावणें; खपा मर्जी; वैरीपणा; अत्याचार; जळफळाट; मनाची विकारवशता. ह्याला क्रोध म्हणतात; व जो मनुष्य ह्या क्रोधापासून मुक्त नसतो त्याला क्रोधयुक्त म्हणतात.

प्र. - लबाड कोणाला म्हणावें व लबाडी म्हणजे काय ?
उ. - मनुष्य लबाड व कावेबाज असला; आणि त्यामध्यें लबाडी, लबाडीचा स्वभाव, लबाडपणाचे विचार, कावेबाजपणा, हेवा, मत्सर, विश्वासघातकीपणा हे दोष भरलेले असले तर त्यास लबाडी म्हणतात. आणि जो ह्या दोषांपासून मुक्त नसतो तो लबाड होय.

प्र. -  नीच कोणाला म्हणावें ?
उ. -  अनीतिमान् ज्याला वाईट संवयी आहेत व जो दुस-या नीतिभ्रष्ट मनुष्याबरोबर स्नेह राखतो त्याला नीच म्हणावें.

प्र. - उदार कोणाला म्हणावें ?
उ. - जो नीतिमान् असतो, ज्याला चांगल्या संवयी असतात व जो नीतिमान् व सुशील माणसाशीं संगत ठेवतो त्याला उदार म्हणावें.