प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

बुद्धवंस.- खुद्दक निकायांतील लहान ग्रंथांमध्यें बुद्धवंस हा एक आहे. यामध्यें गौतम बुद्धाच्या पूर्वी जगाच्या बारा कल्पांमध्यें होऊन गेलेल्या चोवीस बुद्धांच्या पद्यमय परंपरागत कथा दिल्या आहेत. पूर्वींच्या चोवीस बुद्धापैकीं प्रत्येकाचें वर्णन एकएका प्रकरणांत केलें असल्याचे प्रास्ताविक प्रकरणांत सांगितलें आहे. प्रत्येक बुद्धानें धर्मचक्राला कशी गति दिली याचें शुष्क वर्णन असून गौतम बुद्धाच्या चरित्रांतील गोष्टी पूर्वीच्या प्रत्येक बुद्धाच्या चरित्रामध्यें कांहीं किरकोळ फरकानें कशा घडत गेल्या, तें दाखविलें आहे. या सर्व गोष्टी गौतम बुद्धानें स्वमुखानें सांगितल्या आहेत असें दाखविलें आहे, आणि त्यानें पूर्वींच्या प्रत्येक बुद्धाच्या वेळीं आपण कोण होतों, आपण त्याची कशी पूजा करीत होतों व त्यानें आपण पुढें बुद्ध होणार हें भविष्य कसें वर्तविलें होतें, याची हकीकत दिली आहे. या ग्रंथामध्यें पहिला बुद्ध दीपंकर याची कथा असलेलें दुसरें प्रकरण यामध्येंच कायतीं काव्य व प्रतिभा हीं दिसून येतात.

त्या वेळीं गौतम बुद्ध सुमेध या नांवाचा श्रीमान् ब्राह्मण होता. त्याने एके दिवशीं जगाचा तिटकारा येऊन हें क्षुद्र शरीर एखाद्या घाणेरड्या वस्तूप्रमाणें तुच्छ लेखून हिमालयामध्यें जाऊन आश्रमवास पतकरला. या पद्यमय वर्णनावरून थेर गाथांचे स्मरण होतें. त्या वेळीं बुद्ध दीपंकर हा धर्माचा विजय करीत सर्व जगामध्यें फिरत होता, आणि सर्व मनुष्यें व देव त्याची पूजा करीत होते. साधु झालेला सुमेध हाहि येऊन मार्गात एका चिखल असलेल्या जागीं आपल्या मोकळ्या केलेल्या जटा, तागाचे वस्त्र व चामड्याचें पांघरूण अंथरून आपण उपडा निजतो. मनांत इच्छा ही कीं, दीपंकर जेव्हां आपल्या शिष्यांसह त्या मार्गानें जाईल, तेव्हां त्याच्या पायाला चिखल लागूं नये. याप्रमाणें तो जमिनीवर पडला असतां एके दिवशीं तो बुद्ध होऊन जगाचा उद्धार करण्याचा निश्चय करतो. दीपंकर येऊन सुमेध पुढें मोठा होईल असें भविष्य सांगतो. तेव्हां सर्व दहा सहस्त्र जगांतील लोक आनंदाची गर्जना करतात, आणि पुढें येणा-या बुद्धाबद्दलचें भविष्य सांगण्याच्या वेळीं होणारीं नेहमीचीं शुभ चिन्हें व चमत्कार होतात. परंतु सुमेध हा बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीची जी स्थिति-म्हणजे दहा पारमितांचें आपल्या अंगीं पूर्णत्व प्राप्त करून घेणें-ती साध्य करून घेण्याचा निश्चय करतो.

याप्रमाणें हा वरील भाग म्हणजे गौतमाच्या आत्मचरित्राची प्रस्तावनाच असून तें आत्मचरित्र त्यानें सव्विसाव्या प्रकरणामध्यें पंचवीस पद्यांमध्ये आपल्या अखेरच्या जन्मांतील मुख्य मुख्य गोष्टींचें वर्णन करून सांगितले आहे. या ग्रंथाच्या उपसंहारामध्यें पुढें येणा-या मेतेय्य बुद्धापर्यंतच्या बुद्धांचीं यादी आणि बौद्ध स्मारकें कोणकोणत्या भागांत आहेत हे दिलें आहे.

बुद्धवंस या ग्रंथावरील टीकेमध्यें हा ग्रंथ बुद्धानें स्वतः सांगितलेला असून थेरांच्या अव्याहत परंपरेने तो तृतीय संगातीपर्यंत चालत आला होता आणि तसाच तो गुरुशिष्यांच्या अव्याहत परंपरेनें आजपर्यंत चालत आला आहे असें सांगितलें आहे. परंतु जुन्या धर्मग्रंथांमध्यें ज्या अर्थीं गौतमापूर्वीं सहा पुरुष होऊन गेल्याचा उल्लेख आहे, त्या अर्थी टीकाकाराच्या वरील म्हणण्यावर न विश्वसितां बुद्धवंस हा पाली धर्मशास्त्रांतील बराच अलीकडील ग्रंथ आहे, असेंच आपण मानलें पाहिजे. या ग्रंथकालीं बुद्ध देवत्वाप्रत जाऊन त्याची पूजापद्धति पूर्णपणें प्रचारांत आली होती. ही गोष्ट मूळ तिपिटकामध्यें मुळींच आढळत नाहीं. या पूजापद्धतीस बौद्ध संस्कृत वाङ्‌मयानें व विशेषतः महायान पंथानें पूर्णत्वाप्रत नेलें होतें.