प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
बौद्धसंप्रदायिक संस्कृत वाङ्मय.- बौद्धसांप्रदायिक संस्कृत वाङ्मयावरूनहि बौद्ध धर्मशास्त्राचें पुरातनत्व व त्याच्या पाली भाषेंत झालेल्या भाषांतराचें यथार्थत्व सिद्ध होतें. हें वाङ्मय कांहीं शुद्ध संस्कृत भाषेंत व कांहीं मिश्र संस्कृत भाषेंत असून त्यामध्यें नाना त-हेचे व नाना पंथांचे ग्रंथ आढळतात. या पंथांपैकीं एका पंथाचें स्वतंत्र धर्मशास्त्र संस्कृत भाषेंत असून त्याचे कांहीं भाग अगदीं अलीकडे प्रसिद्धीस आले आहेत. हें धर्मशास्त्र स्वतः जरी पाली भाषेंतून घेतलेलें नसलें, तरी त्यावरून पाली भाषेंतल्या धर्मशास्त्राचें यथार्थत्व चांगलें सिद्ध होतें. कारण, जरी या संस्कृत आणि पाली धर्मशास्त्रीय ग्रंथांत शब्दरचनेमध्यें व विषयांच्या अनुक्रमामध्यें ठिकठिकाणीं फरक दिसून येतो, तरी त्यांमध्यें कांहीं भाग इतके शब्दशः सारखे आढळतात कीं ते मूळ एकाच परंपरेवरून निघाले असावेत असें गृहीत धरणें भाग पडतें. त्याप्रमाणेंच नेपाळामधील बौद्धांच्या संस्कृत धर्मग्रंथांमध्यें, व तिबेटी व चिनी भाषांतील भाषांतरावरून केवळ माहीत होणा-या कांहीं बौद्ध संप्रदायाच्या धर्मग्रंथांमध्यें आपणांला कांहीं ठिकाणीं असें निश्चितपणें आढळून येतें कीं, त्यांतील मूल तत्त्वें एकच आहेत, एवढेंच नव्हे तर त्यांतील कांहीं ग्रंथलि मुख्य मुख्य गोष्टींत पूर्णतेनें या पाली धर्मशास्त्राशीं जुळतात. या बौद्ध संस्कृत वाङ्मयाशीं आपला जसजसा अधिक परिचय होत जातो व त्याची पाली धर्मशास्त्राशीं आपण जों जों सुक्ष्मपणें तुलना करून पाहूं लागतों, तों तों पाली धर्मशास्त्र हें जरी सर्वस्वीं मुळास धरून नाहीं तरी ते मुळाची उत्कृष्टतेनें कल्पना करून देतें असें जें ओल्डेनबर्गचें म्हणणें आहे तें आपणांस खरें वाटूं लागतें. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांत लिहिल्या गेलेल्या या पाली धर्मशास्त्राप्रमाणेंच, असा कोणताहि बौद्ध धर्मग्रंथ अथवा शास्त्र नाहीं कीं, ज्यामध्यें अशोकासारख्या प्रसिद्ध बौद्ध राजाचा एका शब्दानेंहि उल्लेख नाहीं. भाषा, रचना व विषय या सर्वांवरून हें पाली धर्मशास्त्र स्पष्टपणें उपनिषदांसारखें दिसतें, तर उलट पक्षीं संस्कृत बौद्ध वाङ्मय हें पुराणांसारखें आढळतें.