प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
बुद्धाचा पहिल्या दुखण्यानंतरचा आनंदास उपदेश.- या सुत्ताच्या दुस-या प्रकरणामध्यें असलेला कांहीं भाग निश्चयपूर्वक मूळचा व प्राचीन म्हणतां येईल. दुस-या प्रकरणामध्यें वेळुब येथें बुद्धाला आलेल्या पहिल्या दुखण्याची हकीकत सांगितली आहे. या दुखण्यांतून बुद्ध आपल्या आत्मिक सामर्थ्यानें बरा झाला व आनंदास येणेंप्रमाणें म्हणाला : ''मी झांकली मूठ राखणारा गुरु नाहीं. मी स्वतःजवळ कांहींहि न ठेवतां सर्व जगाला सत्याचा उपदेश केला आहे. केवळ समाजाचा पुढारी म्हणून शेखी मिरविण्याची मीं कधींहि इच्छा केली नाहीं, व म्हणून हा संघ माझ्यावर केव्हांहि अवलंबून नव्हता. माझ्या मागें जर मीं उपदेशिलेल्या धर्माचें अवलंबन करून लोक राहतील तर त्यांनां नेत्याची उणीव भासणार नाहीं. तेव्हां, हे आनंदा, तुम्ही स्वतःचेच मार्गदर्शक (दीप) व्हा. तुम्हांला स्वतःचाच आश्रय असूं द्या. तुमचा धर्म तुम्हांला मार्गदर्शक आहे असें मानून त्याचा आश्रय करा.'