प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
मज्झिम निकाय.- या शब्दांचा अर्थ मध्यम आकाराच्या उपदेशपर व्याख्यानांचा संग्रह असा आहे. यामध्यें १५२ भाषणें व संवाद आहेत. हे सामान्यतः दीघ निकायांतील भाषणें व संवाद यांहून लहान आहेत, एवढाच काय तो त्यांच्यांत फरक आहे. या संग्रहांतील सुत्तेंहि स्वतंत्र व पर्ण असत त्यांचें महत्त्व व प्रकार यांत फार भेद आहेत. या संग्रहातील सत्तांची संख्या पुष्कळ असल्यामुळें दीघ निकायापेक्षां यांत विषयहि जास्त व विविध प्रकारचे आले आहेत. यामध्यें आपणांला बौद्ध संप्रदायाचीं निरनिराळीं तत्त्वें पुढें मांडणारे सत्यचतुष्ट्य, विषयांची व्यर्थता, आत्म्याच्या अस्तित्त्वाबद्दलच्या शंकांचें निरसन, निर्वाण, ध्यानाचे निरनिराळे प्रकार इत्यादि बहुतेक सर्व विषय आढळतात. कांहीं ठिकाणीं हे संवाद केवळ रुक्ष व्याख्यानाप्रमाणें वाटतात, परंतु कांहीं ठिकाणीं ते सामान्य लोकांनां आवडतील अशा मनोरंजक संभाषणाच्या स्वरूपांत असून आरंभीं मोठा व लहान उपोद्धात म्हणजे प्रास्ताविक गोष्ट आढळते. दृष्टान्त देऊन शिक्षण दिलें असतां तें लोकांस जास्त आवडतें - मग सर्व भाषणामध्यें एकाच दृष्टान्ताचा परिपोष केलेला असो अगर तेच तत्त्व पुनः पुनः ठसविण्याकरितां एकामागून एक अनेक दृष्टान्त दिलेले असोत - हें तत्त्व जाणून या ग्रंथांत कांहीं कल्पित अथवा पौराणिक कथा सांगून त्यांचा संबंध एखाद्या तत्त्वाशीं जोडलेला आढळतो. उदाहरणार्थ, नं. ३७ या सुत्तामध्यें बुद्धाचा प्रसिद्ध शिष्य मोग्गलान यानें स्वर्गांत इंद्रास दिलेल्या भेटीचें वर्णन केलेलें आहे. त्या भेटीच्या वेळीं मोग्गलान या भिक्षूनें आपल्या पायाच्या आंगठ्यानें स्वर्गांतील सर्व मंदिरांस हालविलें (५० व्या सुत्तांत याच गोष्टीचा पुनः उल्लेख केला आहे). या गोष्टीवरून महाभारत व इतर पुराणांतील ब्राह्मणी कथांची आठवण होते.