प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

बौद्ध धर्मशास्त्राच्या रचनेचा काळ.- प्राचीन बौद्ध वाङ्‌मय म्हणजे बुद्धाचीं संभाषणें व वचनें, व गीतें, कथा व सांप्रदायिक नियम यांचा संग्रह हीं होत; व या संग्रहांचा मोठा समूह म्हणजेच त्रिपिटक होय. आतां हें उघड आहे कीं, या संग्रहांतील निरनिराळे भाग निरनिराळ्या काळीं रचले गेले असून हा संग्रह म्हणजे त्यांचें अखेरचें स्वरूप असावें; व तो एका विशिष्ट काळांतील वाङ्‌मयविषयक चळवळीच्या अखेरीचा द्योतक होय.

बौद्ध परंपरेवरून पहिला असा एक संग्रह फार प्राचीन काळीं केला गेल्याचा दाखला मिळतो. कारण, बुद्ध निर्वाणाप्रत गेल्यावर कांहीं आठवड्यांनीं राजगृहीं-सध्यांच्या राजगिर गांवीं-त्याच्याजवळ असणा-या शिष्यांनीं 'प्रथम बौद्ध संगीति' भरवून धर्म आणि विनय (म्ह. बौद्ध धार्मिक आचार) हीं निश्चित केल्याचा उल्लेख आहे.

आतां त्रिपिटकांमध्यें हे धर्म व विनय यांचे नियम सुत्तपिटक आणि विनयपिटक या दोन भागांत नमूद केले आहेत. प्रचलित पाली धर्मशास्त्रांत बुद्धनिर्वाणकालीन नियम अक्षरशः जसेचे तसेच चालत आलेले आहेत अशी समजूत आहे. परंतु ते इतक्या कालपर्यंत अविकृत स्थितींत राहणें सर्वथा अशक्य असल्यामुळें बुद्धकालीन नियम ते हेच या गोष्टीवर विश्वास ठेववत नाहीं. तथापि यावरून ही परंपरा अगदीं निराधार आहे असें समजण्याचें मात्र कारण नाहीं. कारण वरील गोष्टींपासून आपणांला एवढी गोष्ट कळते कीं, बुद्ध निर्वाणास गेल्यानंतर लवकरच त्या संप्रदायांतील शिष्टमंडळी आपली सांप्रदायिक मुख्य मुख्य तत्त्वें व संप्रदायाचे आचारनियम निश्चित करण्याकरितां एकत्र जमली असावी; व ही गोष्ट संभवनीयहि दिसते. यद्यपि सध्यां प्रचलित असलेल्या तिपिटकाची रचना होण्याकरितां बुद्धनिर्वाणानंतरचा इतका अल्पकाल पुरेसा नाहीं.

वैशाली येथें बुद्धनिर्वाणानंतर शंभर वर्षांनीं द्वितीय संगीति भरल्याबद्दल जी परंपरा आहे ती जासष विश्वसनीय दिसते. परंतु ही संगीति केवळ या संप्रदायांतील आचारांमध्यें जीं दहा पाखंडें उद्भवलीं होतीं तीं नाहीशीं करण्याकरितांच भरविली गेली होती अशी जुनी माहिती उपलब्ध आहे. अलीकडच्या माहितीवरून, एका सभेचें अधिवेशन आठ महिने चालून सांप्रदायिक वाङ्‌मयाचें परीक्षण करण्यांत आलें. जुन्या माहितीवर विश्वास ठेवला तर आपणांला एवढें एक ऐतिहासिक सत्य कळतें कीं, बुद्धनिर्वाणानंतर सुमारें एका शतकानें संप्रदायामध्यें मतभेद होऊन एवढा वादविवाद माजला कीं, सर्व भिक्षूंची एक मोठी सभा भरविणें भाग पडलें; व त्या सभेंत त्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल करण्यांत आला. परंतु यावरून असें निश्चित दिसतें कीं, त्या वेळीं सध्यांच्या विनयपिटकाप्रमाणें भिक्षूंच्या आचारांबद्दलचे नियम आपणांला सध्यांच्या तिपिटकामध्यें आढळतात त्याप्रमाणें कांहीं तरी निश्चित असले पाहिजेत, आणि त्यावरूनच वरील वादग्रस्त प्रश्नांचा निकाल करण्यांत आला असला पाहिजे. सारांश, बुद्धनिर्वाणानंतर पहिल्या शतकामध्यें बौद्ध संप्रदायाचें पूर्ण धर्मशास्त्र नसलें तरी त्यास आधारभूत अशीं सूत्रें निश्चित झालेलीं होतीं.