प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
पाली भाषा.- प्रथमतः ख्रिस्तपूर्व तृतीय शतकामध्यें रचलें गेलेलें धर्मशास्त्र व सध्यांचें तिपिटक यांची भाषा एकच असणें अशक्य आहे. कारण तें त्या वेळची मगध (बहार) देशांतील जी मागधी भाषा तींतच रचलें गेलें असलें पाहिजे. गौतमबुद्धाची हीच जन्मभाषा असून तींतच तो उपदेश करीत असला पाहिजे. त्याचप्रमाणें मगध देशाची राजधानी जें पाटलिपुत्र शहर त्यामध्यें धर्मशास्त्रें रचणा-या भिक्षूंनीं मागधीच भाषा वापरली असली पाहिजे. या मागधी धर्मग्रंथांचे अवशेष अद्यापीहि पाली भाषेंतील धर्मशास्त्रांत दाखवितां येतील. सिंहलद्वीप, ब्रह्मदेश व सयाम या देशांतील लोक तर त्यांच्या धर्मशास्त्राची जी पाली भाषा आहे तिला मागधी या नांवानेंच उल्लेखितात. तथापि ती भाषा आपणांला शिलालेख, व्याकरणें व इतर ग्रंथ यांमध्यें आढळून येणा-या मागधी भाषेहून अगदीं निराळी दिसते. त्याचप्रमाणें ती दुस-या कोणत्याहि भाषेशीं सदृश अशीहि दिसत नाहीं. पाली ही फक्त वाङ्मयविषयक भाषा म्हणजे केवळ प्रौढ वाङ्मयांत आढळणारी भाषा असून ती केवळ बौद्ध लोकच ग्रंथांतरीं उपयोगांत आणीत असत; आणि तिची वाढ इतर वाङ्मयीन भाषांप्रमाणें कमीजास्त प्रमाणात निरनिराळ्या देशभाषांचें मिश्रण होऊन झाली होती. अर्थात् अशी वाङ्मयविषयक भाषा जरी दोन निरनिराळ्या देशभाषांच्या मिश्रणांतील एक अवस्था दाखविते, तरी ती प्रथमतः त्यांपैकीं कोणत्या तरी एकाच देशभाषेपासून निश्चितपणें निघाली असली पाहिजे. अशा रीतीनें ही मूळ देशभाषा मागधी असणें शक्य आहे; व त्यामुळें पाली आणि मागधी या दोन्ही एकच भाषा आहेत अशी जी परंपरागत समजूत आहे, ती अक्षरशः खरी नसली तरी तिला थोडासा ऐतिहासिक पुराव्याचा पाठिंबा आहे.
बौद्ध संप्रदायाच्या बाल्यावस्थेंत धर्मशास्त्रग्रंथांच्या भाषेच्या स्वरूपाकडे विशेष लक्ष दिलें जात नसे. याविषयीं बुद्धाचें एक वचन असें सांगण्यांत येतें कीं, तो शब्दापेक्षां अर्थालाच जास्त महत्त्व देत असे.
विनयपिटकामध्यें बुद्धाचें असें वचन दिलें आहेः ''माझ्या वचनांचें संस्कृतासारख्या नियमबद्ध शास्त्रीय भाषेंत भाषांतर करतां कामा नये; त्या वचनांचा अर्थ प्रत्येकानें आपआपल्या भाषेमध्यें योग्य तो खुलासा करून समजून द्यावा हेंच उत्तम.''
तेव्हां, वाङ्मयविषयक जी पाली भाषा तिची वाढ हळू हळू झाली असून तिला निश्चित स्वरूप वट्टगामनींच्या कारकीर्दीत सिलोनमध्यें हें धर्मशास्त्र लिहिलें गेलें त्या वेळीं आलें असावे. यानंतर सिंहलद्वीपांतील भिक्षुवर्गानें धर्मशास्त्राची हीच भाषा कायम राखणें व त्याचा त्या भाषेंत प्रसार करणें या गोष्टीस महत्त्व दिलें असावें; कारण ही भाषा त्या वेळीं निश्चित झाली होती. तसेंच त्या वेळीं पाली भाषेमध्यें लिहिल्या गेलेल्या तिपिटकधर्मशास्त्राची निश्चित झालेली भाषा कायम राखण्याची खबरदारी ज्याप्रमाणें तेथील भिक्षुवर्ग गेल्या दोन हजार वर्षांत अत्यंत काळजीपूर्वक घेत आला, त्याचप्रमाणें त्यांत समाविष्ट केलेले विषयहि जसेचे तसे परंपरेनें कायम राखण्याची खबरदारी त्यानें घेतली असावी. तथापि पाली भाषेमध्यें जाऊन निश्चित होण्यापूर्वीं व सिहलद्वीपांत जाऊन पोंचण्यापूर्वीं शास्त्रग्रंथांच्या स्वरूपांत पुष्कळ बदल झाला असणें संभवनीय आहे.