प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

नीतिविषयक उदात्त कथा.- याप्रमाणेंच कित्येक ठिकाणीं बौद्ध संप्रदायांतील कांहीं नीतिविषयक उदात्त कथाहि आहेत. उदाहरणार्थ, राजपुत्र दीर्घायु याची गोष्ट घ्या. त्यानें आपल्या मातापितरांच्या खुनाचा सूड घेण्याकरितां हरत-हेचे प्रयत्न केले. परंतु खुनी इसम राजा ब्रह्मदत्त हा अगदीं त्याच्या हातांत सांपडला तेव्हां त्यानें आपली उपसलेली तरवार पुन्हां म्यानांत घालून सुडाची कल्पना टाकून दिली.