प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
निकाय.- सुत्तपिटक या ग्रंथांत एकंदर पांच निकाय अथवा संग्रह आहेत. ते येणेंप्रमाणें : १ दीघ निकाय, २ मज्झिम निकाय, ३ संयुत्त निकाय, ४ अंगुत्तर निकाय व ५ खुद्दक निकाय. यांपैकीं खुद्दक निकायामध्यें पुढील ग्रंथ आहेत : १ खुद्दक पाठ, २ धम्मपद, ३ उदान, ४ इतिवुत्तक, ५ सुत्तनिपात, ६ विमान वत्थु, ७ पेतंवत्थु, ८ थेर गाथा ९ थेरी गाथा, १० जातक ११ निद्देस, १२ पटिसंभिदामग्ग, १३ अपदान, १४ बुद्धवंस व १५ चरियापिटक.
पहिल्या चार निकायांमध्यें सुत्तें म्ह. उपदेशपर भाषणें. (सुत्त या शब्दाबद्दल सुत्तन्त हा शब्द अनेकदां वापरलेला आहे) आहेत. हीं भाषणें कांहीं ठिकाणीं बुद्धानें व कांहीं ठिकाणीं त्याच्या एखाद्या शिष्यानें केलेलीं असून त्यांपूर्वीं तीं भाषणें कोणत्या प्रसंगीं व कशासाठीं केलेलीं होतीं याविषयीं थोडा प्रास्ताविक मजकूर असतो. कांहीं ठिकाणीं तीं उपनिषदें अथवा महाभारत यांतील इतिहाससंवादांप्रमाणें संभाषणरूपानें प्रास्ताविक कथेनंतर दिलीं आहेत. परंतु हीं सर्व सुत्तें गद्यामध्यें आहेत. फक्त क्वचित् ठिकाणींच थोड्या सुत्तांत मधून मधून गाथा आलेल्या आहेत. ह्या गाथा बहुधा दुस-या ग्रंथांतील अवतरणें अथवा मध्येंच घातलेलीं पद्यें आहेत. अशीं पद्यें गद्यामध्यें कांहीं ठिकाणीं त्या भागाचें महत्त्व दर्शविण्याकरितां व कांहीं ठिकाणी गद्याला प्रौढत्व आणण्याकरितां मधून मधून घालण्याची वहिवाट भारतीय वाङ्मयामध्यें पूर्वींपासून चालत आली असून ती लोकांनां फार प्रिय झाली होती.