प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

धम्मसंगणि.- तिसरा ग्रंथ धम्मसंगणि (मनःस्थितीचे प्रकार) हा असून त्याला मिसेस र्‍हीस डेव्हिड्स या भाषांतरकत्रींनें मानसिकनीतिशास्त्रसंग्रह असे नांव दिले आहे. या ग्रंथांत धम्माचे निरनिराळे प्रकार सांगितले आहेत. यामध्ये शारीरिक व मानसिक स्थिति, कल्पना व मनाचे चमत्कार हे विषय येतात. इंग्रजी भाषांतरकत्रीनें प्रास्ताविक आध्यात्मिक निबंधामध्यें या दुर्बोध प्रश्नोत्तरावरून व त्यांतील रुख याद्यांवरून बौद्ध तत्त्वज्ञानपद्धतीचा उत्कृष्ट रीतीनें जुळवून मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या पद्धतीला तिनें तत्त्वज्ञान पद्धतीच्या इतिहासामध्यें बरेंच महत्त्वाचें स्थान दिलें आहे. सिंहलद्वीपामध्यें तरी निदान या ग्रंथाचा अधिकार बराच मोठा समजला जातो. या ग्रंथाच्या तिस-या प्रकरणावर अत्थुद्धार या नांवाची सारिपुत्ताच्या नांवानें प्रचलित असलेली टीका परिशिष्टादाखल जोडलेली असून तिचा धर्मशास्त्रामध्यें समावेश करण्यांत आला होता.