प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

दीघ निकाय.- हा उपदेशपर मोठमोठ्या भाषणांचा संग्रह असून यामध्यें ३४ बरींच मोठीं सुत्तें आहेत. प्रत्येक सुत्तामध्यें कांहीं तरी सांप्रदायिक मताचें सूक्ष्म रीतीनें विवरण केलें आहे. हा प्रत्येक भाग एक एक स्वतंत्र ग्रंथ मानतां येईल.

ब्रह्मजाल सुत्त.- दीघ निकायापैकी पहिलें जें ब्रह्मजाल सुत्त (ब्राह्मणी जाळ्यावरील भाषण) तें बौद्ध संप्रदायाच्या इतिहासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें आहे. बुद्ध आपल्या शिष्यांस आचारविषयक व नीतिविषयक नियम घालून देत असतांना त्यानें ब्राह्मण व इतर यती यांचे जीवितक्रम, विचारपरंपरा, व्यवसाय, वादविवाद इ. गोष्टींचा लांबलचक याद्या देऊन या सर्व गोष्टींपासून बौद्ध भिक्षूनें अलिप्त राहिलें पाहिजे असें सांगितलें आहे. आपलें श्रेष्ठत्व भासविण्यासाठीं गृहस्थाश्रमी ब्राह्मण आणि यती यांचा सामुच्चयानें उल्लेख करून एकाच कसोटीनें दोघांचें परीक्षण करण्याची क्लृप्ति त्याची मिशनरी हुषारी दाखविते. बुद्धानें असें म्हटलें आहे कीं आपणांला ब्राह्मण व यती यांचीं अशीं उदाहरणें सांपडतात कीं, ते संपत्ति जमवितात; त्यांनां नृत्य, गीत, नाटकें व इतर खेळ आवडतात (येथें बुद्धानें त्या वेळच्या लोकांच्या करमणुकीच्या प्रकारांची एक लांबच लांब यादी दिली आहे ती सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाची आहे); कांहीं ऐषआरामांत दंग असतात; कांहीं आपली उपजीविका यज्ञ, भविष्यकथन व जादू वगैरे प्रकारांनीं करतात (या ठिकाणीं यादी दिली आहे तीहि महत्त्वाची आहे); आणि कांही अस्तिनास्तिवाद, जगाचे आद्यन्त व आत्मा यांचे स्वरूप व पूर्वपीठिका इत्यादि विषयांवर रणें माजवितात. या शेवटच्या ठिकाणीं बुद्धानें निरनिराळ्या ६२ विचारपरंपरांची-त्याच्या दृष्टीनें पाखंडांची-यादी दिली आहे व म्हटलें आहे कीं, या सर्व गोष्टींपासून बुद्धाच्या शिष्यांनीं दूर रहावें. विंटरनिट्झच्या मतें ज्याप्रमाणें एखादा कुशल कोळी आपलें, सूक्ष्म छिद्रांचें जाळें तळ्यांत टाकून त्यांतील लहान मोठे सर्व मासे पकडतो, त्याप्रमाणें बुद्धाला या आपल्या ब्रह्मजालामध्यें सर्व वितंडवादी व तत्त्ववेत्ते यांनां, त्यांनीं मतें व विचार हीं निरर्थक व मोक्षाच्या मार्गांत अडथळे आणणारीं आहेत हें दाखवून कसें पकडावें तें चांगलें ठाऊक होतें. या सुत्तामध्यें बुद्धानें कांहीं गणित वगैरे शास्त्रीय विषयांवरहि कोरडे आढले आहेत. त्यामुळें त्याच्या सोवळेंपणापेक्षां त्याचें अज्ञानच दृष्टीस पडतें.

सामञ्ञफल सुत्त.- दुस-या सामञ्ञफल सुत्तामध्यें वैराग्यफलावर विवेचन असून त्यावरूनहि बुद्धकालीन विचार व जीवितक्रम यांबद्दल बरीच महत्त्वाची माहिती मिळते. कारण यामध्यें आपणांला बौद्धेतर प्रमुख संप्रदायांच्या आचार्यांच्या व संस्थापकांच्या विचारपरंपरा दृष्टीस पडतात.

अंबठ्ठ सूत्त.- भारतवर्षांतील जातिव्यवस्थेचा इतिहास व बौद्ध संप्रदायाची तद्विषयक वृत्ति हीं पहावयाची असल्यास अंबठ्ठ सुत्त (नं. ३) हें फार महत्त्वाचें आहे. या सुत्तामध्यें त्याचा ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाविषयीं मत्सर दृग्गोचर होतो. हीन कुलामध्यें मुलगी देण्यापेक्षां तिच्या भावानेंच तिचें पाणिग्रहण करणें अधिक चांगलें व अशा संयोगापासून माझा जन्म झाला आहे अशी बढाई ज्यांत मारली आहे तें हेंच सुत्त होय. शाक्यवंश व श्रीकृष्ण [कण्ह] यांच्याबद्दल आलेल्या उल्लेखांमुळें या सुत्तास पौराणिक व कांहीं ऐतिहासिकहि महत्त्व आलें आहे.

कूटदंत व तेविज्ज सुत्तें.- कूटदंत सुत्त (नं. ५, तीक्ष्णदंत ब्राह्मण यावर व्याख्यान) आणि तेविज्ज सुत्त (नं. १३, वेदत्रयीवर व्याख्यान) या दोन सुत्तांमध्यें बौद्ध व ब्राह्मणी या नव्या व जुन्या संप्रदायांचा परस्परसंबंध चांगला दिसून येतो, व त्याबरोबरच बुद्धाचें वेदत्रयीबद्दल संपूर्ण अज्ञान दृष्टीस पडतें. या सुत्तामध्यें बुद्धानें बालिश व्याजोक्तीनें ब्राह्मणी संप्रदाय व त्यांतील क्रूर यज्ञ आणि वेदज्ञांची ब्रह्माशीं ऐक्य करण्याकरितां चाललेली खटपट यांची बौद्ध संप्रदायांतील त्याग (आत्मयज्ञ) व उच्चजीवितध्येय यांच्याबरोबर तुलना केली आहे.

महानिदान व सिगालोवाद सूत्तें.- बौद्ध विचारपरंपरेचें मुख्य तत्त्व जें कारणपरंपरा त्याचा ऊहापोद महानिदान सुत्त (नं. १५, कारणांवरील प्रवचन) यांत केला आहे, व लौकिक दृष्ट्या बौद्ध नीतितत्त्वांचा. विचार सिगालोवाद सुत्त (नं. २९) या पाली धर्मशास्त्रांतील एका महत्त्वाच्या सुत्तांत केला आहे. यामध्यें बौद्ध गृहस्थाचा धम्म म्हणजे आचार विस्तृतपणें दिला आहे.

महापरिनिब्बान सुत्त.- परंतु दीघ निकायामधील सर्वांत सर्व बाबतींत महत्त्वाचें सुत्त म्हटलें म्हणजे महापरिनिब्बान सुत्त (नं. १६) हें होय. यामध्यें बुद्धाचें महानिर्वाणावरील व्याख्यान आहे. याचें स्वरूप व त्यांतील विषय हीं इतर सर्व सुत्तांहून अगदीं निराळीं आहेत. हें केवळ विशिष्ट धार्मिक विषयावर संवाद अथवा व्याख्यान अशा स्वरूपाचें नसून त्यामध्यें बुद्धाचे अखेरचे दिवस, त्याचीं शेवटचीं संभाषणें व वचनें आणि त्याचें निर्वाण याबद्दलची सविस्तर हकीकत आहे. यांतील सर्वांत जुना भाग हा तिपिटकाच्या सर्वांत जुन्या भागांबरोबरचा असून ज्या काळांत बुद्धचरित्रावर काव्यें रचलीं गेलीं त्या काळाच्या आरंभींचा असवा. पाली धर्मशास्त्रामध्यें बुद्धाचें चरित्र आढळत नाहीं ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. तथापि विनयपिटक व सुत्तपिटक यांतील कांहीं भागांतून त्याचा उपक्रम केलेला आढळतो.