प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तृतीय संगीतींत बौद्ध धर्मशास्त्राची रचना.- बौद्धसांप्रदायिक धर्मशास्त्र पूर्णतेनें तृतीय संगीतीमध्यें रचलें गेलें असावें. सिंहली बखरी महावंसो व दीपवंसो यावरून ही संगीति प्रसिद्ध अशोक राजाच्या कारकीर्दींत भरली होती. या बखरी जरी मधूनमधून दंतकथांनीं भरल्या आहेत, तरी त्या मुख्य गोष्टींत विश्वसनीय आहेत असें विंटरनिट्झ समजतो. या बखरींवरून असें दिसतें कीं, त्या वेळीं बौद्ध संप्रदायामध्यें बरेंच पंथ निघाले होते, व त्यामुळें ज्यांनां बुद्धानें घालून दिलेल्या मूळ संप्रदायाप्रमाणें चालावयाचें होतें त्यांच्याकरितां धर्मशास्त्राचे नियम निश्चित करणें अवश्य वाटूं लागलें असावें. राजा अशोक हा बौद्धांचा मोठा पुरस्कर्ता असल्यामुळें त्याच्याच कारकीर्दींत अशा प्रकारचें धर्मशास्त्र रचलें जाणें संभवनीय दिसतें. अशोकानेंहि आपल्या एका शासनामध्यें पाखंडवाद्यांचा प्रतिकार केलेला दिसतो. त्याला देखील बुद्धाचीं खरीं सांप्रदायिक मतें कोणतीं हें निश्चित करणें अशक्य वाटलें असावें. अशोकाच्या शिलालेखांत या संगीतीचा उल्लेख सांपडत नाहीं यावरून विंटरनिट्झ हा, अशोक हा इतका निःपक्षपाती होता कीं ही संगीति स्वतःच्या नांवानें न बोलावितां तें काम त्यानें भिक्षुवर्गावर सोंपविलें, असें अनुमान काढतो. हा त्याचा निःपक्षपातीपणा त्यानें आपल्या शासनांत इतर संप्रदायांस दिलेल्या मतस्वातंत्र्याचा विशेष उल्लेख केल्यावरून दिसून येतो असें तो म्हणतो. तथापि, आपल्या शासनामध्यें अशोकास या संगीतीचा उल्लेख करण्याचें कांहीं कारण नव्हतें असें फ्लीट यास वाटतें (जर्नल रॉयल एशिआटिक सोसायटी, १९०८, पृ. ४९३ पहा). व स्वतः विंटरनिट्झहि ख्रि. पृ. २४२-२४१ या कालापर्यंत तिसरी संगीति झाली नव्हती हें व्ही. ए. स्मिथचें म्हणणें कदाचित् खरेंहि असूं शकेल आणि म्हणूनच त्याच्या शासनामध्यें या संगीतीचा उल्लेख आला नसेल हें कबूल करतो.