प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तिपिटक तेंच तृतीय संगीतींत तयार झालेलें पाली धर्मशास्त्र काय ?- बखरकारानें महिंद व त्यासहवर्तमान असलेले भिक्षू हे आकाशमार्गानें उडत सिंहलद्वीपांत येऊन उतरले असें जें वर्णन केलें आहे त्यावर जरी आपणांस विश्वास ठेवतां येत नाहीं, तरी ही सिंलप्रचारविषयक कथा आपणांस कुचकामाची समजतां येत नाहीं. अशा प्रकारच्या अनेक दंतकथांनां आधारभूत अथवा मूलभूत एक ऐतिहासिक सत्य असावें असें आपणांस धरून चालण्यास हरकत नाहीं. तें सत्य हें कीं, हा बौद्ध संप्रदाय व तद्विषयक धर्मशास्त्र यांनां सिंहलद्वीपांत प्रथम महिंद यानें नेलें. आरंभीं या धर्मशास्त्राचें संक्रमण एका पिढीकडून दुस-या पिढीकडे अध्ययनअध्यापनद्वारा तोंडी परंपरेनें होत असे, पण पुढें ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकामध्यें तें सिंहली राजा वट्टगामनि याच्या कारकीर्दींत लिहून काढण्यांत आलें, हा जो प्रचलित समज आहे तोहि बहुतांशीं खरा असावा. याप्रमाणें सिंहलद्वीपांतील बौद्धांच्या मतें, सध्यां प्रचलित असलेलें पाली भाषेंतील धर्मशास्त्र जें तिपिटक तेंच तृतीय संगीतीमध्यें रचलें गेलेलें, महिंदानें सिंहलद्वीपांत आणलेले आणि वट्टगामनीच्या कारकीर्दींत लिहिले गेलेले बौद्ध धर्मशास्त्र होय.
या तिपिटकाचीं तीन पिटके आहेत. पिटक याचा अर्थ पेटिका म्हणजे पेटी असा आहे. हीं तीन पिटकें येणेंप्रमाणें:-
१ विनय पिटक.- आचारसंग्रह. यामध्यें संघाचे नियम आहेत. त्यांत भिक्षू व भिक्षुणी याच्या दिनक्रमाबद्दल व आचारांबद्दल नियम आहेत.
२ सु त्त पि ट क.- पाली भाषेंतील सुत्त हा शब्द संस्कृत भाषेंतील सूत्र या शब्दासारखाच आहे. परंतु बौद्ध त्याचा उपयोग थोडक्यांत उपदेश अगर विधान या अर्थीं न करतां उपदेशपर वाक्य अथवा प्रवचन या अर्थीं करतात. धम्म या विषयावरील लहान अथवा मोठें विवरणात्मक वाक्य अथवा संभाषण याला सुत्त हा शब्द लावतात. सुत्तपिटकामध्यें पाच निकाय सूत्रसंग्रह आहेत.
३ अ भि ध म्म पि ट क.- यामध्यें विनय पिटकाप्रमाणेंच धम्मविषयक विवेचन आहे, परंतु तें वरीलप्रमाणें लहानलहान वाक्यांत अथवा संभाषणात नाहीं. हा भाग म्हणजे बौद्धसांप्रदायिक नीतितत्त्वांचा मानसशास्त्रदृष्ट्या पाया असून त्यामध्यें निरनिराळे विषय, विभाग व अनुक्रमणी देऊन त्यांवर पांडित्यपूर्ण लांबलचक रुक्ष विवेचन केलें आहे.
धर्मग्रंथांची पिटकवार तीन पेट्यांत विभागणी केली असून त्याशिवाय पाली धर्मसूत्रांत उल्लेखिल्याप्रमाणें धर्मग्रंथांची ९ अंगेंहि केलेली आहेत. ही अंगें येणेंप्रमाणें - (१) सुत्त (उपदेशपर व्याख्यानें); (२) गेय्य (गद्यपद्यमिश्रित व्याख्यानें); (३) वेय्याकरण (अभिधम्माच्या धर्तीप्रमाणें केलेले विवरण); (४) गाथा (श्लोक); (५) उदान (स्फूर्तिदायक उक्ती); (६) इत्तिवुत्तक ('बुद्ध असें म्हणाला' या शब्दांनीं सुरू होणारीं लहान लहान भाषणें); (७) जातक (बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या गोष्टी); (८) अब्भुत धम्म (चमत्कारांविषयीं विचार); व (९) वेदल्ल (प्रश्नोत्तररूपी उपदेश). बौद्धांच्या संस्कृत वाङ्मयामध्येंहि अशाच प्रकारची विभागणी आहे. परंतु ही विभागणी सर्व सूत्रांत नाहीं, इतकेंच नाहीं तर कांहीं पुस्तकांतहि ती नाहीं. आकारावरून व मजकुरावरून कित्येक ग्रंथांचें फक्त वर्गीकरण या विभागणीपद्धतीनें केलेलें आहे.
वर उल्लेखिलेला तिस्स यानें रचलेला कथावत्थु हा भाग या पाली धर्मशास्त्रांत अभिधम्मपिटकामध्यें समाविष्ट केलेला आहे. परंतु हा तिपिटकांतील सर्वांत अखेरीस रचलेला भाग आहे हें सिद्ध करतां येईल. कारण त्यामध्यें सुत्तपिटकांतील बरींच वचनें अगोदरच ज्ञात आहेत असें गृहीत धरलें आहे. तसेंच प्राचीन ग्रंथामध्यें-उदाहरणार्थ राजगृह येथील संगीतीच्या हकीकतीमध्यें-धम्म आणि विनय यांचाच वारंवार उल्लेख आढळतो; अभिधम्माचा कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं. तेव्हां यावरून दुस-या गोष्टी बाजूस ठेवल्या तरी असें म्हणतां येईल कीं, तृतीय संगीतीच्या सभासदांनीं सर्व सांप्रदायिक ग्रंथ एकत्र करते वेळीं अभिधम्म ग्रंथांस त्यांच्या उत्तरकालीनत्वामुळें शेवटची जागा दिली व शेवटीं तिस्स याचा स्वतःचा ग्रंथ जोडून दिला. तथापि सिंहली श्रद्धाळू बौद्ध लोकांप्रमाणें आपणांस तृतीय संगीतीच्या वेळीं रचलेलें बौद्ध धर्मशास्त्र हेंच सध्यां प्रचलित असलेलें पाली भाषेंतील तिपिटक होय हें मान्य करणें अशक्य आहे.