प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

जातककथा. - ही गोष्ट विशेषतः खुद्दनिकायामध्यें समाविष्ट केलेल्या जातक अथवा बोधिसत्त (त्त्व) कथा (बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या गोष्टी) यांमध्यें जास्त स्पष्टपणें दिसून येते. बौद्ध ग्रंथामध्यें बोधिसत्त हें नांव जो पुढें बुद्ध व्हावयाचा असतो त्याला दिलेलें आहे. गौतमबुद्धाला बोधिसत्त हें नांव शाक्य वंशांत येऊन बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीच्या सर्व जन्मांमध्यें दिलेलें आढळतें. जातक कथांमध्यें बोधिसत्तानें आपल्या एखाद्या पूर्व जन्मामध्यें स्वतः केलेल्या, अथवा प्रेक्षक किंवा इतर कोणत्याहि प्रकारें त्याचा ज्यांत संबंध आलेला आहे, अशा गोष्टी दिलेल्या आहेत. यामुळें प्रत्येक जातकाचा आरंभ अमुक एका वेळीं (उदाहरणार्थ, ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां) बोधिसत्त अमक्याच्या पोटीं (उदाहरणार्थ, एखाद्या राणीच्या अथवा हत्तिणीच्या) जन्मास आला होता' अश रीतीनें होऊन नंतर गोष्ट सुरू होते. यामुळें लोकांमध्यें प्रचारांत असलेल्या अथवा लौकिक वाङ्‌मयामध्यें आढळणा-या कोणत्याहि गोष्टीला जातककथेचें रूप देणें शक्य होतें. त्या गोष्टीतील एखाद्या मनुष्याला, प्राण्याला अथवा देवतेला बोधिसत्त म्हटलें म्हणजे झालें. आणि याप्रमाणें कोणतीहि गोष्ट, मग ती लौकिक असो अथवा बौद्ध कल्पनांपासून कितीहि दूरची असो, तिला बौद्ध कथेचें रूप देतां येत असे. तथापि भारतीयांमध्यें कथा सांगण्याचा व ऐकण्याचा नाद जो इतका हाडींमांसीं खिळला आहे, त्याचा उपयोग आपल्याला अनुयायी मिळविण्याकडे जर भिक्षूंनीं करून घेतला नसता तर त्यांनां भारतीय म्हणून म्हणतांच आलें नसतें. ही गोष्ट बौद्ध भिक्षूंनींच केवळ नव्हे तर भरतखंडांतील सर्व संप्रदायांच्या उपदेशकांनीं केली आहे; आणि तीच गोष्ट कांहीं शतकांनंतर पाश्चात्त्य ख्रिस्ती भिक्षूंनींहि केली. या भिक्षूंनां पोप ग्रेगरी दि ग्रेट यानें 'दाखल्यासाठीं सांगितलेली गोष्ट पुराव्याप्रमाणें उपयोगीं पडते' असें सांगितलें होतें. भरतखंडांतील भिक्षूंनींहि याच तत्त्वाचा स्वीकार केला होता; आणि पुढें ख्रिस्ती उपदेशकांनीं जसें केलें त्याप्रमाणेंच बौद्ध भिक्षूंनींहि आपल्या कार्यासाठीं निरनिराळ्या त-हेच्या काल्पनिक गोष्टी, अद्भुत कथा व आख्यानें इत्यादिकांचा उपयोग केला. यामुळें जातककथांची कल्पना ख्रिस्ती लोकांस जेस्टा रोमॅनोरम अथवा वेसेलस्किस माँकस्लेटैन यावरून करतां येईल. या पुस्तकांतील गोष्टी निरनिराळ्या शतकांतील धर्मोपदेशकांच्या प्रवचनांतून एकत्र केल्या असून त्यांचे विषय फार विविध आहेत व त्यांमध्यें कांहीं पारमार्थिक किंवा आध्यात्मिक तर कांहीं केवळ लौकिक अथवा ऐहिक विषयासंबंधाच्या गोष्टी आहेत. प्राचीन कालच्या बौद्ध थेरांनीं प्रथमतः भिक्षूंनां गोष्टी सांगण्याबद्दल कदाचित् निषेध केला असेल. धर्मशास्त्रामध्यें कित्येक ठिकाणीं भिक्षूंनां राजे, चोर, मंत्री, शस्त्रास्त्रें, युद्ध, स्त्रिया, देव, यक्ष, जलपर्यटन इ. विषयांवर गोष्टी सांगण्याचा स्पष्ट निषेध केलेला आढळतो. तथापि लवकरच या बाबतींत सवलत मिळूं लागली, आणि एका बौद्ध संस्कृत ग्रंथामध्यें आपणांला असें वर्णन आढळतें कीं, बुद्ध सूत्रें, गाथा, आख्यानें व जातकें यांच्या साहाय्यानें उपदेश करीत असे. आणि तो फार सुरस आणि उपदेशपर गोष्टी सांगत असे आणि त्यामुळें लोकांनां पारमार्थिक ज्ञानापासून या जन्मांत सुख मिळून मरणोत्तरहि सुख मिळत असे. प्रथमतः सर्व गोष्टींनां जातकांचें रूप देण्याची आवश्यकता वाटली नसावी. कारण, आपणांला मधूनमधून कांहीं गोष्टी तशाच आढळतात; उदाहरणार्थ, विनय पिटकांतील दीघावु याच्या गोष्टीमध्यें नायकास बोधिसत्त्वाचें रूप दिलेलें आढळत नाहीं. या गोष्टीपासून ब-याच नंतर एक जातककथा निर्माण झाली. तथापि कांहीं वास्तविक जातककथा असून त्या सूत्रसंग्रहामध्यें आढळतात, आणि त्यांवरून बौद्ध भिक्षू मध्यकालीन ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणें आपल्या प्रवचनांतून गोष्टीचा उपयोग करीत असत असें दिसतें. जातककथांचा जेव्हां एका ग्रंथामध्यें संग्रह करण्यास प्रारंभ झाला, तेव्हां सर्व जातककथांचा धर्मशास्त्रामध्यें समावेश झाला होता असें नाहीं. आणि या ग्रंथापैकींहि कांहीं भागासच धर्मशासत्राची मान्यता मिळाली. ज्या जातककथा पद्यांमध्यें (गाथा) असत, त्यांनां पूर्णपणें संग्रहामध्यें जागा मिळाली. प्राचीन कालीं भारतवर्षामध्यें गद्य व गद्यमिश्रित कथा सांगण्याचा प्रघात फार होता असें दिसून येतें. गोष्टी तरी विशेषतः याच गद्यपद्यमिश्रित पद्धतींत असत. गद्य कथेला कांहीं पद्यें जोडून रसभरीत करण्याची व पद्यांतील भाग गद्यामध्यें स्पष्ट करण्याची चाल फार सार्वत्रिक होती. यक्षयक्षिणींच्या कल्पित कथांमध्यें ग्रिम याच्या ग्रंथामध्यें आढळून येतात त्याप्रमाणें प्रचलित गोष्टी व पद्यें घातलेलीं आढळतात. कल्पित कथा रचणारा एक दोन पद्यांमध्यें तिचें तात्पर्य देत असे. लावण्या व गाणीं रचणारे यांचीं गीतें संवादात्मक पद्यांमध्यें असून ते प्रारंभीं कांहीं प्रास्ताविक गद्य भाग घालीत असत; व मधून मधून गद्यामध्यें कांहीं आवश्यक ठिकाणीं खुलासा देत असत. यामुळें ज्या गोष्टींनां जातकांचे रूप देण्यांत आलें त्या, सर्वच नसल्या तरी बहुतेक, गद्यपद्यमिश्रित असत. परंतु धर्मशास्त्रामध्यें फक्त पद्यांचा म्ह. गाथांचाच समावेश करण्यांत आला. व तेवढ्याच खुद्दकनिकायामध्यें समाविष्ट करण्यांत आल्या. यामुळें धर्मशास्त्रामध्यें जो जातक ग्रंथ आहे, तो फक्त पद्यमय असून त्यामध्यें कांहीं पद्यमय कथा आहेत. परंतु कांहींचा गद्य गोष्टींशिवाय अर्थ लागत नाहीं. अशा ठिकाणीं गद्य भाग घालण्याचें काम उपदेशांवर पडून ते आपल्या इच्छेप्रमाणें वेळेनुसार तो घालीत असत. अखेरीस कांहीं कालानें - धर्मशास्त्रांत अंतर्भूत होणारा भाग निश्चित झाल्यानंतर ब-याच कालानें - टीकारूपानें हा गद्य भाग जोडून निश्चित करण्याचें काम सुरू झालें असावें. अशा टीकात्मक ग्रंथामध्यें प्रत्येक जातककथेचे पुढील भाग येतात:-

१  प्रथम प्रास्ताविक गोष्ट असून तिला पच्चुप्पन्नवत्थु (प्रत्युत्पन्नवस्तु – कथाप्रसंग) असें नांव असून, तीमध्यें बुद्धानें ती गोष्ट भिक्षूंनां केव्हां सांगितली त्या प्रसंगाचें वर्णन असतें.
२  नंतर एक गद्य कथा अतीतवत्थु (अतीतवस्तु) असून तीमध्यें ती कथा सांगितलेली असते.
३  तिस-या भागामध्यें गाथा (पद्यें) असून सामान्यतः त्या अतीतवत्थु किंवा क्वचित् पच्चुप्पन्नवत्थूमध्यें मोडतात.
४  चौथ्या भागांत (वेच्याकरण) गाथांनां व्याकरणदृष्ट्या शब्दार्थसूचक टीपा दिलेल्या असतात.
५  पांचव्या भागांत (समोधान) मागील कथेंतील पुरुषांशीं प्रस्तुत कथेंतील व्यक्तींचें साम्य दाखविलेलें असतें.

जा त क क थां ची र च ना व इ ति हा स.- या जातक कथांवरील जातकठ्ठ - कथा नांवाच्या टीकात्मक ग्रंथाचें सिंहली भाषेंत भाषांतर झालें होतें; परंतु तें केव्हां झालें हें निश्चित नाहीं, व मूळांतील गाथा (पद्यें) भाषांतरकर्त्यानें पालींतच ठेविल्या होत्या. या सिंहली ग्रंथाचें बहुधा ख्रिस्ती शकाच्या पांचव्या शतकामध्यें जातकठ्ठवण्णन (जातकार्थवर्णन) या नांवानें पुनः पाली भाषेमध्यें भाषांतर झालें, आणि हेंच भाषांतर व्ही फॉसबोल या डेन विद्वानानें संपादन केल्यामुळें सर्वांनां माहीत होऊन भाषांतररूपानें त्याचा सर्वत्र प्रसार झालेला आहे.

या जातकठ्ठवण्णन ग्रंथाच्या इतिहासावरूनच असें म्हणतां येईल कीं, जातककथांतील गद्य भाग गाथांइतका जुना हीं हे सिद्ध होते. धर्मशास्त्राच्या प्राचीनत्वाबद्दल जे मुद्दे पुढें आणितां येतात, ते तेथें लागू पडत नाहींत. आणि गाथा कांहिंहि फरक न होतां मूळापासून पालींतच राहिल्या आहेत, व गद्य भागाचें प्रथम पालींतून सिंहलीमध्यें व पुन्हां सिंहलींतून पालीमध्यें याप्रमाणें दोनदां भाषांतर झालें आहे. हें पहिलें व दुसरें भाषांतर होत असतांना मुळामध्यें पुष्कळ फरक झाले असतील व कांहीं भाग अधिकहि आला असेल; किंवा संग्रहकारानें अथवा या जातककथांच्या एखाद्या संपादकानें सुद्धां यांतील गद्यामध्यें फेरफार करणें अथवा भर घालणें शक्य आहे. पुष्कळ ठिकाणीं गद्यभाग अलीकडील आहे, हें अगदीं उघड दिसतें. त्यामध्यें सिंहलद्वीपाचा उल्लेख आढळतो. गाथा व गद्य यांमध्यें कांहीं ठिकाणीं विरोधहि दृष्टीस पडतो.

गाथांची भाषाहि गद्यापेक्षां बरीच जुनी आहे. याचें कारण गाथांचें भाषांतर व पुनर्भाषांतर झालें नाहीं हें एक होय. प्रत्युत्पन्नवस्तु आणि अतीतवस्तु यांमधील फरक फॉसबोल याच्या आवृत्तीवरून कळून येत नाहीं. ते दोन्हीहि भाग एकाच टीकाकारानें रचल्यासारखे दिसतात. तथापि, या टीकाकारानें जुन्या व चांगल्या सामुग्रीचा उपयोग केलेला असावा. कारण, लहान लहान कल्पित कथा व काल्पनिक अद्भुत गोष्टी यांमधील गद्य भाग उत्कृष्ट साधला आहे. परंतु इतर जातकांमधील - विशेषतः ज्यांमध्यें गद्य भागाची जरूर भासत नाहीं अशा गोष्टींतील - गद्य फारच कमी दर्जाचें, नीरस व कांहीं कांहीं ठिकाणीं गाथाशीं विसंगतहि दिसतें. एकाच टीकाकारानें कांहीं गोष्टी चातुर्यानें व विनोदयुक्त अशा लिहून कांहीं अगदीं नीरस व निर्जीव भाषेंत लिहिल्या आहेत, असें आपणांला म्हणतां येणार नाहीं. तेव्हां आपणांला असें गृहीत धरलें पाहिजे कीं, ज्या गोष्टी चांगल्या वठल्या आहेत तेथें त्याला मूळच्या चांगल्या गोष्टी व परंपरा उपलब्ध असाव्या. याप्रमाणें गद्यांतहि कांहीं जुना भाग राखला गेला असवा.

ख्रि. पू. ति स -या श त कां त जा त क क थां चें अ स्ति त्व.- आणि वास्तविक गोष्टहि अशीच आहे. कांहीं जातक कथा व त्यांतील गद्य भाग हीं बौद्ध परंपरेमध्यें ख्रिस्तपूर्व तिस-या शतकांत अस्तित्वांत होती, ही गोष्ट भरहुत आणि सांची येथील स्तूपांसभोवतीं असलेल्या दगडी भिंतीवरील कोरीव चित्रांवरून सिद्ध होते. ही गोष्ट जातकांच्या इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाची आहे. हीं बहुमोल बौद्ध स्मारकें अंकितलेखशास्त्रवेत्त्यांच्या मतें ख्रिस्तपूर्व तिस-या किंवा दुस-या शतकांतील असून, त्यांवर आपणांला जातककथांतील प्रसंग खोदलेले आढळतात. त्यांमध्यें कांहीं प्रसंग केवळ गद्य कथांमध्येंच वर्णन केलेले आहेत. भरहुत येथें तर त्या चित्रांवर जातकांचीं नांवेंहि खोदलेलीं आहेत. या चित्रांवरून एवढें सिद्ध होतें कीं, सध्यांच्या जातक ग्रंथांमध्यें आढळणा-या कांहीं गोष्टी ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या अखेरीच्या कालींहि जातक या नांवानेंच संबोधिल्या जात असून, त्या बोधिसत्त्वाच्या गोष्टी म्हणूनच प्रसिद्ध असत. त्याप्रमाणेंच त्यांवरून असेंहि सिद्ध होतें कीं, त्या वेळीं प्रचलित असलेल्या पुष्कळ लौकिक गोष्टींनां बौद्ध भिक्षूंनीं सांप्रदायिक रूप दिलें होतें. यावरून त्या गोष्टी फार प्राचीन कालापासून प्रचलित असून बुद्धपूर्वकालीन असाव्यात.

ग द्य भा गा चें उ त्त र का ली न त्व.- यामुळें कांहीं प्रसिद्ध संशोधकांनीं जातक कथांमध्यें आपणांला बुद्धकालीन अथवा त्याच्या पूर्वीच्याहि कालच्या गद्य वाङ्‌मयाचें व संस्कृतीचें चित्र दृष्टीस पडतें असें जें गृहीत धरलें आहे, तें कांहीं थोड्या बाबतींत खरें आहे. यांतील कांहीं पद्यें व कांहीं गद्य कथा मात्र इतक्या जुन्या असाव्यात. तथापि कांहीं म्हणी व परंपरागत कथा बुद्धपूर्वकालीन साधूंच्या काव्यांतील असल्या तरी, एकंदर गाथांचा भरणा ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाहून जुना आहे असें म्हणणेंच मूळीं वाजवी होणार नाहीं; मग सिद्ध करणें तर दूरचे राहिलें. गद्य भाग बहुतेक ख्रिस्ती शकानंतरचाच आहे असें खात्रीनें म्हणता येईल.