प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
गौतमाची विवेचनपद्धति.- गौतमबुद्धाच्या विवेचन पद्धतीमध्यें दृष्टांत देऊन कोणतीहि गोष्ट श्रोत्यांच्या मनावर ठसवून द्यावयाची व अशा रीतीनें त्यांची खात्री करावयाची ही गोष्ट मुख्य असे. दृष्टांत म्हणजे कांहीं पुरावा नव्हे. परंतु दृष्टांताचा मनावर अधिक परिणाम होतो, व अनेक वेळां तो हजारों पुराव्यांपेक्षांहि श्रोत्याच्या बुद्धीलाहि पटतो ही गोष्ट बुद्धाला चांगली ठाऊक असल्यामुळें, तो आपल्या भाषणांतून वारंवार दृष्टांतांचा उपयोग करीत असे, व त्याच्या शिष्यांनींहि या गोष्टींत त्याचें अनुकरण केलेलें दिसतें. यामुळेंच आपणांला चारहि संग्रहांतून दृष्टांतांची रेलचेल आढळून येते, व त्यांमुळेंच या भाषणांमध्यें कौशल्य दृष्टीस पडून त्यांनां वाङ्मयविषयक महत्त्व आलें आहे.
दृ ष्टा न्त.- अशा त-हेच्या मनाची खात्री करून देणा-या दृष्टांताचें उदाहरण आपणांला बुद्ध व मालुंक्या याचा पुत्र यांच्यामधील संवादामध्यें आढळतें. यामध्यें बुद्धाला एका जिज्ञासु शिष्यानें जन्म व मृत्यु इत्यादि आध्यात्मिक विषयाबद्दल प्रश्न कला असतां त्याला बुद्धानें असें उत्तर दिलें आहे कीं, अशा प्रश्नांस उतरें देत बसलें असतां मोक्षाचा उपाय शोधून काढण्यास व दुःखापासून मुक्त होण्यास वेळच रहाणार नाहीं. ही गोष्ट त्यानें पुढील दृष्टांतावरून सिद्ध केली आहे.
एका मनुष्यास एक विषारी बाण लागला, तेव्हां त्याच्या मित्रांनीं त्याला तत्काळ वैद्याकडे नेलें. वैद्य तो बाण उपटून काढूं लागला असतां, जर तो मनुष्य ओरडून म्हणाला कीं 'थांबा, प्रथम हा बाण कोणीं मारला तो क्षत्रिय, ब्राह्मण वैश्य किंवा शूद्र होता, तो कोणत्या कुलांतील होता, तो उंच होता कीं ठेंगणा होता, तो बाण कशा प्रकारचा आहे इत्यादि गोष्टी मला प्रथम समजल्याशिवाय मी हा बाण काढूं देणार नाहीं' तर पुढें काय होणार ? या सर्व प्रश्नांचीं उत्तरें मिळण्यापूर्वीं तो मरूनहि जाईल. याचप्रमाणें ज्या शिष्याला परलोक इत्यादि विषयांबद्दल सर्व प्रश्नांचीं उत्तरें प्रथम मिळण्याची इच्छा असेल तो दुःख, दुःखाचा आरंभ व त्याचा शेवट व तें घालविण्याचा उपाय या गोष्टी कळण्यापूर्वीं मरूनहि जाईल. याप्रमाणेंच तेविज्जसुत्तांतील (दीघ निकाय १३, १५) दृष्टांतहि असेच मुद्देसूद आहेत. यामध्यें बुद्धानें असें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे कीं, ब्राह्मणांची ब्रह्मामध्यें एकरूप होऊन मोक्ष मिळविण्याची इच्छा मूर्खपणाची आहे. कारण त्यांनां असें कबूल करावें लागतें कीं, तें ब्रह्म त्यांनीं, त्यांच्या गूरूंनीं, परम गुरूंनीं अथवा प्राचीन कालांतील ॠषींनींहि प्रत्यक्ष पाहिलें नाहीं. बुद्ध म्हणतो कीं, ही गोष्ट अंधमालिकेप्रमाणें दिसते. त्या मालिकेपैकीं पहिल्याला, मधल्याला अथवा शेवटल्याला कोणालाहि दिसत नसतें. ही अज्ञात अशा ईश्वराच्या प्राप्तीबद्दलची इच्छा, ज्याप्रमाणें एखादा तरुण म्हणतो कीं, माझें प्रेम एका अतिशय सुंदर तरुणीवर बसलें आहे, पण त्याला ती तरुणी कोण आहे असा प्रश्न विचारला असतां ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या वर्णाची आहे, तिचे नांव काय आहे, ती उंच आहे कीं ठेंगणी आहे, ती काळी आहे कीं गोरी आहे, तिचें रहाण्याचें ठिकाण कोठे आहे, याबद्दल कांहींच सांगता येत नाहीं; किंवा ज्याप्रमाणें एखादा मनुष्य एखाद्या चवाठ्यावरील प्रासादाच्या सज्जाला जिना बांधावयाची इच्छा करतो, परंतु हा सज्जा पूर्वेस आहे कीं दक्षिणेस आहे, पश्चिमेस आहे कीं उत्तरेस आहे, तो उंच आहे, ठेंगणा आहे, कीं मध्यम उंचीचा आहे, हें त्याला ठाऊक नसतें, त्याप्रमाणें आहे. 'त्यागफल' या सूत्रामध्यें (दीघनिकाय २, ६९; ७८) संसारांतून मुक्त झालेल्या यतीच्या सुखाची कल्पना बुद्धानें अनेक सुंदर दृष्टांतांमध्यें दिली आहे. ज्याप्रमाणें एखादा ॠणको आपलें सर्व कर्ज फेडून व आपल्या कुटुंबाच्या पोषणाकरितां कांहीं संग्रह करून ठेवतो; एखादा रोगी पुष्कळ दिवस दुःख भोगून पुनः निरागी बनतो; एखादा बंदिवासाचें दुःख भोगून नंतर मोकळा होतो; एखाद्या गुलामास त्याचा धनी स्वातंत्र्य देतो; एखादा पांथस्थ बिकट मार्गामध्यें वाट चुकून जंगलामध्यें भटकत फिरत असतां एखाद्या मनुष्यवस्ती असलेल्या खेड्यास पोहोंचतो; किंवा ज्याप्रमाणें एखाद्या तळ्यामध्यें फक्त एकाच थंड झ-याचें पाणी सांठतें-दुस-या कोणत्याहि दिशेनें त्यांत पाणी येत नाहीं अगर त्यावर पाऊस पडत नाहीं- व अशा त-हेनें तें तळें नेहमीं त्या एकाच झ-याच्या थंड पाण्यानें सदैव भरलेलें असतें; त्याप्रमाणें या यतीच्या ठिकाणीं नेहमीं सौख्यपूर्ण शांति भरपूर वास करीत असते. सुखाची नश्वरता ही पुष्कळ दृष्टांतामध्यें दाखविली आहे. इंद्रियजन्य सुखें हीं पुष्कळ दृष्टांतामध्यें दाखविली आहे. इंद्रियजन्य सुखें हीं किती दुःखमय व क्लेशमय आहेत हें दाखविण्याकरितां मज्झिम निकायांतील ५४ व्या सूत्रामध्यें सात ठळक दृष्टांत दिले आहेत. एका भुकेनें पीडित झालेल्या कुत्र्यापुढें एखाद्या खाटिकानें एक हाड टाकिलें असतां त्याची जशी क्षुधा शांत होत नाहीं, तशी त्या मांसरहित हाडासारखीं हीं इंद्रियजन्य सुखें आहेत. हीं दुःखमय व क्लेशमय असून त्यांपासून परिणाम वाईटच व्हावयाचा. ज्याप्रमाणें एखादा पक्षी एखाद्या मांसखंडावर झडप घालतो व इतर पक्षी त्याच्यावर हल्ला करून त्याला टोंचतात, त्याप्रमाणें या विषयांपासून दुःखच उद्भवतें. साधू या विषयसुखांस निखा-यानें भरलेल्या एखाद्या खांचेप्रमाणें मानून त्यांपासून दूर सरतात. ज्याप्रमाणें स्वप्नांतील सुंदर दृश्य जागें झाल्याबरोबर नाहींसें होतें, किंवा ज्याप्रमाणें उसन्या आणलेल्या धनामुळें तें उसनें आहे हें न समजून एखाद्या मनुष्याचा हेवा करावा, त्याप्रमाणें हीं विषयसुखें आहेत. एखाद्या मनुष्यानें अरण्यामध्यें फळांनीं लादलेला एखादा वृक्ष पाहून तीं पोटभर खाण्याकरितां वर चढावें, पण इतक्यांत दुस-या मनुष्यानें येऊन तें झाड पाहून त्यावरील फळें खाण्याकरितां तें मुळांसकट तोडून पाडण्यास आरंभ करावा व वरील मनुष्यास पीडा द्यावी, त्याप्रमाणें या विषयसुखांचा उपभोग घेतला असतां केवळ क्लेश, दुःख व सर्व प्रकारची पीडा उत्पन्न होते.
दृ ष्टा न्त व प्र स्तु त प रि स्थि ति.- कांहीं ठिकाणीं या दृष्टांतांचा मेळ प्रस्तुत परिस्थितीशीं फार सुंदर व सहृदयतेनें बसविलेला आढळतो. उदाहरणार्थ, मज्झिमनिकायांतील ५८ व्या सूत्रामध्यें, नीगंठ नातपुत्त याच्या चिथावणीवरून राजा अभय हा बुद्धाला कांहीं तरी बिकट प्रश्न विचारून त्याला कुंठित करण्याच्या हेतूनें आला असतां, त्यानें बुद्धाला आपण कधीं कटु भाषण करीत नाहीं काय असा प्रश्न केला. बुद्धानें मला कांहीं प्रसंगीं कटु भाषण करावें लागतें असें कबूल केल्यावर यानें उलट असा प्रश्न केला कीं, तर मग आपणामध्यें व सामान्य जनांमध्यें - जर आपण कटु भाषण करतां तर - कांहीं फरक दिसत नाहीं. त्या वेळीं अभय राजाच्या मांडीवर त्याचा एक लहान अल्पवयी मुलगा बसला होता. बुद्धानें त्या राजाला असा प्रश्न केला. 'हे राजा, या मुलानें तुझ्या अथवा दाईच्या निष्काळजीपणामुळें जर एखादा लांकडाचा तुकडा अगर दगड तोंडांत घातला, तर तूं काय करशील असें तुला वाटतें ?' राजानें उत्तर दिलें, 'महाराज, मी तो बाहेर काढीन; व मला जर तसें एकदम करतां आलें नाहीं, तर मी त्याचें डोकें डाव्या हातानें धरून उजव्या हाताचें बोट वांकडें करून बाहेर काढीन. तसें करतांना जरी रक्त निघालें तरी हरकत नाहीं. आणि असें कां म्हणाल तर याचें कारण एवढेंच कीं, या कृत्यानें मीं त्या मुलावर दयाच केली असें होईल.' तेव्हां बुद्ध म्हणाला : 'त्याचप्रमाणें हें राजा, तथागत कोणताहि खोटा, चुकीचा अथवा अपायकारक म्हणून माहीत असलेला व दुस-याला अप्रिय व दुःखकारक होईल असा शब्द केव्हांहि उच्चारीत नाहीं. त्याप्रमाणेंच खरा, बरोबर आणि अपायरहित म्हणून माहीत असलेला, परंतु दुस-याला अप्रिय व दुःखकारक होईल असा शब्द तथागत उच्चारीत नाहीं. परंतु जर त्याला एखादा शब्द खरा, बरोबर व सुपरिणामी आहे असें माहीत असलें, तर जरी तो दुस-याला अप्रिय व दुःखकारक होत असेल तरी तो उच्चारणें योग्य होय असें तथागत समजतो. आणि तसें कां तर, त्या जीवाबद्दल तथागताला दया येते म्हणून.'
दिव्याचा दृष्टांत हा फार आवडता असून तो वारंवार दिलेला आढळतो. हा दृष्टान्त येणें प्रमाणें :
''हे भिक्षूंनो, ज्याप्रमाणें एखादा तेलाचा दिवा तेल आणि वात यांच्या साहाय्यानें जळत राहतो, आणि ज्याप्रमाणें त्यांत कोणी मधून मधून तेलवात घालीत राहिला तर तो दिवा अनंत कालपर्यंत तसाच जळत राहील. त्याचप्रमाणें, हे भिक्षूंनो, केवळ बंधनांप्रमाणें असलेल्या या जगांतील वस्तूंच्या ठायीं जो मनुष्य आसक्ति ठेवतो त्याचाहि हव्यास दिवसानुदिवस वाढतच जातो.''
एका गांवांतील शिष्टांनीं बुद्धाला, आपणांस जर सर्व मनुष्यांबद्दल सारखीच कळकळ वाटते, व आपण जर सर्वांवर सारखेच उपकार करतां, तर आपण आपली तत्त्वें इतर लोकांसच जास्त पूर्णतेनें कां समजावून देत नाहीं, असा प्रश्न केला असतां त्यानें उत्तरादाखल पुढील दृष्टांत सांगितला. शेतकरी ज्याप्रमाणें प्रथम चांगल्या जमिनीवर, नंतर मध्यम जमिनीवर व शेवटीं वाईट जमिनीवर लागवड करतो, त्याचप्रमाणें बुद्ध आपलीं तत्त्वें प्रथम भिक्षूंस व भिक्षुणींस, नंतर इतर अनुयायांस, व शेवटीं संप्रदायास व आलेल्या इतर लोकांस समजावून देतो.
या दृष्टांतांतून विनोदहि मधून मधून आढळतो. उदाहरणार्थ, मज्झिम निकाय १२६ मध्यें म्हटलें आहे कीं, एखाद्यानें एका भांड्यांत वाळू व पाणी एका ठिकाणीं घेऊन कितीहि घुसळलें अथवा रगडलें, तरी त्यापासून तेल कधींहि निघणार नाहीं; किंवा एखाद्यानें गाईचें शिंग धरून कितीहि पिळलें, तरी त्यापासून दूध मिळणार नाहीं वगैरे; त्याप्रमाणेंच एखादा भिक्षु जर योग्य मार्गानें गेला नाहीं, तर तो ध्येयाप्रत कधींहि जाणार नाहीं.
कांहीं दृष्टांत थेट तत्कालीन.- संप्रदायस्थापनेच्या कालांतील -बौद्धांच्या भाषेमध्येंच आढळतात. व ते प्रत्यक्ष बुद्धाच्या अगर त्याच्या निकट शिष्यांच्या तोंडचे दिसतात. जेव्हां ते सर्व दुःखांची उत्पत्ति वासनेपासून आहे असें म्हणतात तेव्हां ते तिला तन्हा (तृष्णा) असें नांव देतात; व हीच जन्मांतरास कारण आहे असें म्हणतात. त्यांच्या मतें हा जन्मजन्मांतरांचा फेरा म्हणजे संसार हा एक सागर असून त्याच्या पैलतीरावर निर्वाण आहे. वासना, पातक व या जगांतील सर्व धडपड हा एक महापूर असून जो निर्वाणाप्रत पोचेल तो या महापुरांतून पार पडेल. चांगल्या अथवा वाईट कृत्याच्या (कर्माच्या) परिणामास ते फल म्हणत. जेथें जेथें कर्माची कल्पना आली आहे, तेथें तेथें बीज आणि फल यांचा दृष्टांत डोळ्यापुढें असल्याप्रमाणें दिसतो. बुद्धाच्या उपदेशास सिंहगर्जनेची उपमा दिलेली आहे. अशा प्रकारच्या कल्पना ठिकठिकाणीं आलेल्या आहेत.
या निकायांखेरीज इतर ठिकाणींहि आढळून येणारा एक लोकांच्या आवडीचा रूढ दृष्टांत पुढें दिला आहे : ''हे भिक्षूहो, समजा कीं, एखाद्या मनुष्यानें एकच भोंक असलेलें एक जोखड समुद्रामध्यें टाकून दिलें, आणि पूर्वेकडील वारा पश्चिमेकडे, पश्चिमेकडील पूर्वेकडे याप्रमाणें चारहि दिशांनीं वारा त्या जोखडास परस्परविरुद्ध दिशांस नेत असला, व तेथें एक एकाक्ष असा प्राणी शंभर वर्षांतून एक वेळ पृष्ठभागावर येत असेल, तर त्याचें डोकें त्या जोखडाच्या छिद्रामध्यें जाईल असें तुम्हांला वाटतें काय ? अशी गोष्ट फार मोठ्या कालावधींत क्वचित् एखाद्या प्रसंगीं घडेल. ''परंतु त्या एकाक्ष प्राण्याचें डोकें त्या छिद्रामध्यें जाणें ही गोष्ट कदाचित् लवकर घडून येईल. पण जो मूर्ख मनूष्य एकदां नीच कोटीमध्यें जन्मास जाईल तो पुन्हां मनुष्यजन्मामध्यें येणार नाहीं. कारण, नीच कोटीमध्यें एकमेकांचा जीव घेण्यासाठीं धडपड चाललेली असून कोणतीहि चांगली गोष्ट तेथें घडत नाहीं.''
दृ ष्टा न्तां व रू न सां स्कृ ति क इ ति हा स.- हे दृष्टांत संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाचे आहेत. कारण, त्यांत आपणांला प्राचीन काळच्या भारतीय लोकांची, शिल्पकारांची, शेतक-यांची व व्यापा-यांची रहाणी पहावयास सांपडते. ब्राह्मणी वाङ्मय फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्गांबद्दलच असल्यामुळें त्यामध्यें या लोकांची माहिती फार थोडी आढळते. परंतु यांत आपणांस गाडीवान, सारथी, द्युतकार यांबद्दलचें किंवा तिळांचे तेल काढण्याच्या कृतीबद्दलचे दृष्टांत आढळतात. एका दृष्टांतामध्यें (मज्झिम १४०) सर्व सोनारकामाचें वर्णन आढळतें. दुस-या एकांत (मज्झिम १२५) हत्तीं माणसाळवण्याची सर्व कृति दिलेली आहे. तिस-या एकांत (माज्झिम १०१) विषारी बाण लागला असतां त्यावर उपाय करण्याची रीति वर्णन केली आहे.
सरते शेवटी या दृष्टांतांबद्दल एवढें म्हणतां येईल कीं, हे दृष्टांत म्हणजे जरी पुरावे म्हणून म्हटले जाणार नाहींत तरी या सृत्रांमध्यें उत्तम असा युक्तिवाद त्यांतच काय तो आढळतो. इतरत्र जेव्हां एखाद्या तत्त्वाचें विवेचन करावयाचें असतें तेव्हां आपणांला फक्त समानार्थक शब्द, ठरीव विषयविभाग व उदाहरणांची यादी दिलेली आढळते. ही गोष्ट अंगुत्तरनिकायामध्यें सर्वत्र आढळते.
आपला मुद्दा सिद्ध करण्याच्या या सूत्रांतील पद्धतीची तुलना प्लेटोच्या पद्धतीशीं कोणत्याहि बाबतींत करतां यावयाची नाहीं. आणि या सूत्रांमध्यें प्लेटोच्या संवादासारखे संवाद फारच थोडे आहेत, असें विंटरनिट्झनें आपलें मत दिलें आहे. कार्लफ्राइज यानें या भारतीय आणि ग्रीक संवादांमध्यें कांहीं ठिकाणीं असलेलें साम्य दाखविलें आहे ही गोष्ट खरी. परंतु या साम्यामध्यें कांहीं आवश्यक मुद्दयांचाच अभाव दृष्टीस पडतो, आणि हें साम्य या दोहोंचा कांहीं परस्परसंबंध असेल असें वाटण्याइतकें स्पष्ट नाहीं. पुष्कळशीं सूत्रें वास्तविक संवादरूपी नसून त्यांमध्यें भाषण करणारी व्यक्ति एकच-पुष्कळदां स्वतः बुद्धच-असते, व दुस-याचें काम फक्त होय किंवा नाहीं म्हणावयाचें अथवा आपली संमति दर्शविण्याचें असे. त्याप्रमाणेंच या निकायांतील जे उत्तम संवाद आहेत त्यांवरून आपणांला प्लेटोच्या संवादांची आठवण होण्यापेक्षां महाभारतामध्यें आढळणा-या इतिहाससंवादांचीच वारंवार आठवण होते.