प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

गोष्टीरूप सुत्तें.- परंतु कांहीं सुत्तें संवादरूपी अथवा प्रवचनरूपी नसून केवळ गोष्टीरूप आहेत. याप्रमाणे नं. ८६ हें एक जुन्या त-हेचें आख्यान असून त्यामध्यें अंगुलिमाल या नांवाच्या एका भयंकर दरवडेखोराची हकीकत गद्यपद्यमिश्रित आहे. हा पुढें भिक्षु होऊन अर्हतपदापर्यंत पोहोंचला. हें सुत्त हा जुन्या बौद्ध काव्याचा एक चांगला नमुना असून यांतील कविता फार चांगली आहे. दुस-या एका सुत्तांत (नं. ८३) मखदेव या राजाची कथा सांगितली आहे (ही पुन्हां जातकांतहि आली आहे). या राजानें पहिला शुभ्र केस दिसूं लागतांच राज्याचा त्याग करून भिक्षुवृत्ति स्वीकारिली. अशा सुत्तांमध्यें रठ्ठपाल (राष्ट्रपाल) सुत्त (नं. ८२) हें विशेष प्रसिद्ध आहे. यामध्यें पोवाड्याच्या चालींत एक गोष्ट सांगितली आहे. तिचा सारांश असा:-

रठ्ठपाल या तरुण राजपुत्रास भिक्षु होण्याची इच्छा झाली परंतु त्याचे आईबाप त्यास तसें करण्यास संमति देईनात. तेव्हां अन्नत्याग करून त्यानें त्यांस संमति देण्यास भाग पाडलें. कांहीं वर्षांनीं तो भिक्षुवेषानें आपल्या गांवीं परत येऊन आपल्या पित्याच्या दाराशीं भिक्षा मागूं लागला. त्याच्या बापानें त्याला न ओळखल्यामुळें तो त्यास दुरुत्तरें बोलून घालवूं लागला. तो म्हणाला कीं, याच भिक्षूंनीं थापा मारून माझ्या मुलाला संसाराचा त्याग करावयास लावलें. इतक्यांत कांहीं खरकटें टाकावयास त्या भिक्षूची लहानपणची दाई बाहेर आली व तिच्या जवळ त्या भिक्षूनें तें खरकटें खाण्याकरितां मागितलें. तेव्हां तिनें त्या भिक्षूला ओळखून ती गोष्ट आपल्या धन्यास सांगितली. धन्यानें बाहेर येऊन त्या भिक्षूला घरांत बोलाविलें, पण त्या भिक्षूनें आज माझे जेवण झालें आहे असें म्हणून घरांत येण्याचें नाकारलें; व दुस-या दिवशीं येण्याचें कबलू करून तो निघून गेला. दुस-या दिवशीं बापानें त्याच्याकरितां चांगलें जेवण बनवून त्याला देण्याकरितां सोन्यादागिन्यांच्या राशी तयार करून ठेविल्या, व रठ्ठपालाच्या पूर्वींच्या बायकोसहि उंची वस्त्रें परिधान करून हजर राहण्यास सांगितलें. दुस-या दिवशीं मुलगा आला तेव्हां बापानें त्याचा आदरसत्कार करून त्यास तीं सर्व रत्‍नें व द्रव्य देऊं केलें. परंतु रठ्ठपाल म्हणाला, 'बाबा, तुम्हांला जर माझें म्हणणें ऐकावयाचें असेल तर हे सर्व दागदागिने गाडींत घालून गंगानदीमध्यें खोल पाण्यांत नेऊन बुडवा. कां कीं, यांच्यापासून केवळ दुःख, क्लेश, दैन्य व त्रास मात्र उत्पन्न होतो.' त्याच्या बायकोनें त्याच्या पायीं पडून त्याची पुष्कळ विनवणी केली; परंतु तिकडे बिलकुल लक्ष न देतां जेवण झाल्यावर तो निघून गेला. नंतर त्यास कुरुपेशाचा राजा भेटला. तो त्यास म्हणाला. 'जे गृहस्थ वृद्ध झाले आहेत, आजारी पडले आहेत, दरिद्री आहेत अगर ज्यांचे आप्त निधन पावले आहेत ते भिक्षू होतात; परंतु जो तरुण, सुखी व निरोगी आहे त्यानें या संसाराचा त्याग कां करावा हें समजत नाही.' तेव्हां रठ्ठपालानें जीविताची अशाश्वतता व कामाची अतृप्तता यांबद्दल त्या राजाशीं संवाद करून बौद्ध तत्त्वांची सत्यता त्याला पटवून दिली. हा संवाद सॉक्रेटिसाच्या संवादाप्रमाणें वाटतो.