प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
कथावत्थु - बौद्ध संप्रदायाच्या इतिहासाच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे तिस्स मोग्गलिपुत्त याच्या नांवावर असलेला या संग्रहांतील सातवा ग्रंथ कथावत्थु हा होय. या ग्रंथाचीं एकंदर २३ प्रकरणें असून प्रत्येक प्रकरणामध्यें आठ ते बारा उपप्रकरणांत निरनिराळीं पाखंड मतें देऊन त्यांचें खंडन केलें आहे. त्यामध्यें आपणांला पुढें दिलेल्या प्रकारचे प्रश्न आढळतात. आत्म्याचें अस्तित्त्व आहे काय ? अर्हत पद प्राप्त झाल्यानंतर त्यापासून भ्रष्ट होणें शक्य आहे काय ? निर्वाण दोन प्रकारचे आहेत काय ? बुद्धाच्या दहा अमानुष शक्ती (दशबलें) त्याच्या श्रोत्यांनांहि प्राप्त होतात काय ? कौटुंबिक मनुष्याला अर्हत पद मिळतें काय ? ज्ञान हें विचारांत असून वेगळें असूनं शकतें काय ? प्रत्येक कर्माला फल असतें काय ? वगैरे. या सर्व प्रश्नांनां नकारार्थी उत्तर दिलें असून याच्या विरुद्ध असणारीं मतें पाखंडी म्हणून ठरविलीं आहेत. या पाखंडी मतांचें निरसन करण्याकरितां सुत्तपिटकांतील वचनांचे आधार दिले आहेत. हा ग्रंथ तृतीय संगीतीचा अध्यक्ष तिस्स मोग्गलिपुत्त यानें रचला असल्याबद्दल जी परंपरा आहे तो जर निश्चितपणें विश्वसनीय असेल तर या ग्रंथाचे महत्त्व विशेष मानिलें पाहिजे. कारण, या ग्रंथावरून आपणांला अशोककालीन सुत्तपिटकांची स्थिति, आणि तत्कालीन बौद्ध संप्रदायातील अध्यात्मविषयक कल्पना यांच्याबद्दल विश्वसनीय पुरावा मिळेल. सिंहली बखरी परंपरेनें चालत आल्या असून त्यांचें मुल स्वरूपच कायम राहिलें असावें असें ओल्डेनबर्गप्रमाणेंच विंटरनिट्झ याचें मत आहे. आणि यामुळें कथावत्थु हा ग्रंथ ख्रिस्तपूर्व तिस-या शतकांतील बौद्ध धर्माच्या स्वरूपाबद्दल पुरावा म्हणून मानण्यास हरकत नाहीं असें विंटरनिट्झ म्हणतो. त्याच्या मतें कोणाला या परंपरेबद्दल संशय असला तरीहि प्रस्तुत ग्रंथाचें महत्त्व कमी होत नाहीं. मात्र तशा स्थितींत कथावत्थु या ग्रंथाचा काल अनिश्चित राहून निरनिराळ्या पंथभेदांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षांत येण्याकरितां त्यांच्या संबंधी नेपाळीं, चिनी व तिबेटी ग्रंथांतून मिळणा-या माहितीची तुलना केली पाहिजे.
परंतु आपण जर परंपरा खरी धरून चाललों, तर आपणांला असेंहि गृहीत धरावें लागेल कीं, कथावत्थु ग्रंथाप्रमाणेंच अभिधम्मपिटकांतील इतर सहा ग्रंथहि ख्रिस्तपूर्व तिस-या शतकामध्यें अस्तित्वांत असून थेरवाद पंथाच्या धर्मग्रंथांमध्यें समाविष्ट झाले होते. तथापि हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, बौद्ध संप्रदायांतील निरनिराळे पंथ अभिधम्माचें महत्त्व सारखेंच मानीत नाहींत. हीनयान पंथांतील सौत्रांतिक पंथामध्यें अभिधम्मपिटकांतील सातहि ग्रंथांनां आधारभूत मानीत नाहींत. तसेंच सर्वास्तिवादीपंथामध्यें अभिधम्मपिटक संस्कृत भाषेंत असून त्याचेहि सात ग्रंथ आहेत; परंतु ते पाली अभिधम्मपिटकापेक्षां निराळे आहेत. यावरून आणि विनयपिटकामध्यें संगीतीबद्दल दिलेल्या हकीकतीमध्यें अभिधम्माचा उल्लेख नाहीं, तसेंच इतर कांहीं ठिकाणीं फक्त सुत्त आणि विनय या दोहोंचाच आधारग्रंथ म्हणून उल्लेख असून अभिधम्माचा उल्लेख आढळत नाहीं यावरून, अभिधम्म ग्रंथ साधारपणें सुत्तपिटक व विनयपिटक यांपेक्षां खात्रीनें अलीकडेच असले पाहिजेत असें दिसतें.
तथापि ज्या पंथांत अभिधम्मपिटक यास धर्मशास्त्रांत स्थान मिळालें आहे, त्यामध्यें त्याचें महत्त्व फार मानिलें आहे. मिलिंदपन्ह यामध्यें नागसेन याबद्दल असा चमत्कार सांगितला आहे कीं, तो इतका हुशार होता कीं, सुत्तांचें अध्ययन करण्यापूर्वींच त्याला अभिधम्माचे सात ग्रंथ शिकतां आले. ख्रिस्त शक २६२ या वर्षाच्या सुमारास खोदलेल्या सिंहलद्वीपांतील मिहिंतल येथील एका देवळाजवळच्या खडकावरील शिलालेखामध्यें तेथील मठांतील भिक्षूंकरितां नियम घालून दिले आहेत. त्यामध्यें असें म्हटलें आहे कीं, अभिधम्मपिटकाचा उपदेश करणा-यांकरितां १२, सुत्तपिटकाचे विवेचन करणा-यांकरितां ७ आणि विनयपिटकाचें पठन करणा-यांकरितां ५ याप्रमाणें खोल्या मुद्दाम राखून ठेविलेल्या आहेत.
अभिधम्म ग्रंथांचा अभ्यास विशेषतः ब्रह्मदेशामध्यें अद्यापपर्यंत चालू असून गेल्या शतकामध्यें या विषयावर अनेक ग्रंथ तयार झाले आहेत.