प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

इतिवुत्तक.- उदानाप्रमाणेंच इतिवुत्तक (बुद्ध असें म्हणाला) यामध्येंहि गद्य आणि पद्य भाग आहेत, परंतु या दोन भागांतील संबंध अगदीं निराळा आहे. यांतील गद्यामध्यें कथा सांगितलेल्या नसून एकच कल्पना कांहीं गद्यामध्यें व कांहीं पद्यामध्यें सांगून एखाद्या तत्त्वाचें प्रतिपादन अगर उपदेश केलेला आहे. कांहीं ठिकाणीं एखादी कल्पना प्रथम गद्यामध्यें सांगून नंतर तीच पुन्हां फक्त वृत्ताला जुळण्यासारखे फेरफार करून पद्यामध्यें सांगितली आहे. असा प्रकार यांत असलेल्या ११२ सूत्रांपैकीं ५० सूत्रांमध्यें आढळतो. कांहीं ठिकाणीं गद्यामध्यें असलेला भाग प्रथम एकाच पद्यांत सांगून नंतर गद्यांत नसलेला मजकूरहि पुढील पद्यांत दिलेला आढळतो. कांहीं ठिकाणीं गद्य व पद्य भाग हे एकमेकांनां परिपोषक असून, प्रथम गद्यामध्यें पुढील पद्यांत येणा-या कल्पनेची प्रस्तावना केलेली असते; अथवा त्याच कल्पनेची एक बाजू गद्यांत दिलेली असून दुसरी बाजू पद्यांत दिलेली असते. या सर्व ठिकाणीं गद्य व पद्य भागांमध्यें एकच तत्त्व असून पद्यापेक्षां गद्यामध्येंच ती कल्पना जास्त स्पष्टपणें, मुद्देसूदपणानें व जास्त सुंदर रीतीनें मांडलेली आढळते. ठराविक वाक्यें, सांकेतिक शब्दसमुच्चय व पुनरुक्ति यांचा भरणा हा जो बौद्ध सूत्रांमध्यें असणारा विशेष प्रकार तो यामध्येंहि आढळतो. परंतु सामान्यतः या भागांत शब्दांचें भारूड जरा कमी आहे. यांतील सूत्रें बहुतेक लहान लहान आहेत. गद्य व पद्य या दोन्हीहि भागांतील भाषा नैसर्गिक व सरळ असून कल्पनांचें साम्राज्यहि कमीच आहे. यामध्यें मोठमोठे दृष्टांत आढळत नाहींत, परंतु कांहीं कल्पना फार सुंदर आहेत. उदाहरणार्थ, धर्मशील भिक्षूंनां सढळ हातानें दान करणा-या उदार मनुष्याला पर्वत आणि द-या यांवर वृष्टि करणा-या मेघाची उपमा दिली आहे (नं. ७५); दुष्टांच्या संगतीपासून साधू लोक दूर रहातात-कारण, अतिशय शुद्ध अशा भात्यालाहि विषारी बाणामुळें दोष लागतो (नं. ७६); इंद्रियें हीं द्वारें असून त्यांचें रक्षण चांगल्या प्रकारें केलें पाहिजे (नं. २८, २९); याहि कल्पना वरीलप्रमाणेंच सुंदर आहेत. एके ठिकाणीं बुद्धानें स्वतःला उत्तम वैद्य म्हटलें असून सर्व भिक्षूंनां आपलीं मुलें व वारस म्हटलें आहे (नं. १००). परंतु सर्व भूतांबद्दल दया दाखवावी म्हणून ज्या मेत्त सूत्रांमध्यें उपदेश केला आहे (नं. ४०), त्यांतील गद्य भागामधील कल्पना यांहीपेक्षां उच्च दर्जाच्या आहेत. ''हे भिक्षूंनो, जीवितास आवश्यक व पुण्य प्राप्त करून देणारीं जीं कृत्यें आहेत तीं सर्व मिळून सर्व भूतदयेच्या (मेत्ताच्या) सोळाव्या अंशाइतक्याहि किंमतीची नाहींत. कारण, भूतदयेपासून आत्म्याला मुक्ति मिळते, व मुक्तिदायक म्हणूनच भूतदया ही वरील सर्व गोष्टींपेक्षां अधिक उज्ज्वल आणि प्रकाशदायक आहे. ज्याप्रमाणें सर्व ता-यांचा प्रकाश एकत्र केला तरी तो चंद्राच्या सोळाव्या कलेपेक्षांहि अधिक होणार नाहीं - कारण, चंद्रकला ही त्यापेक्षां अधिक उज्ज्वल, प्रकाशमान व प्रकाशदायक आहे - त्याप्रमाणेंच जीवितास भूतदया ही प्रकाशदायक आहे. ज्याप्रमाणें वर्षाकालाच्या शेवटल्या महिन्यामध्यें आकाश स्वच्छ व निरभ्र असतें, आणि त्यामध्यें सूर्य वर येऊन अंतरिक्षांतील अंधकाराचा नाश करून आपले किरण पसरतो व आपल्या तेजानें स्वतः प्रकाशून दुस-यास प्रकाशमान करतो, त्याप्रमाणेंच जीवितास भूतदया ही प्रकाशदायक आहे. ज्याप्रमाणें रात्र संपून पहाट होते त्या वेळीं सकाळचा तारा (शुक्र) किरण टाकतो, प्रकाशतो व दुस-यास प्रकाशित करतो त्याप्रमाणेंच जीवितास भूतदया ही प्रकाशदायक आहे.''

तसेंच गद्यभागामध्यें कांहीं ठिकाणीं वक्त्याची भावना प्रतिबिंबित झालेली दिसते तशी ती पद्यामध्यें दिसत नाही. उदाहरणार्थ, नं. ३० इ. मध्यें बुद्ध म्हणतो कीं, मला दोन गोष्टींपासून दुःख होतें-जेव्हां एखाद्या मनुष्यानें कोणतेंहि सत्कृत्य केलें नसेल तेव्हां आणि जेव्हां एखाद्या मनुष्यानें एखादें दुष्कृत्य केलें असेल तेव्हां; तसाच मला दोन गोष्टींपासून आनंद होतो-जेव्हां एखाद्यानें कोणतेंहि दुष्कृत्य केलें नसेल तेव्हां, आणि एखाद्यानें सत्कृत्य केलें असेल तेव्हां. परंतु हींच कल्पना पद्यांमध्यें अशी वर्णन केली आहे : 'जो मनुष्य क्रिया, वाचा अथवा मन यांच्या योगानें दुष्कृत्य करील तो मरणानंतर नरकास जाईल. आणि जो सदगुणी मनुष्य क्रिया, वाचा अथवा मन यांच्या योगानें सत्कृत्य करील तो मरणानंतर स्वर्गास जाईल.' नं. ९२ मध्यें गद्य भागामध्यें बुद्धाचें एक फार सुंदर वचन आहे. तो म्हणतो : 'एखादा भिक्षु माझा पदर धरून जरी पावलावर पाऊल ठेवून माझ्यामागें आला; परंतु लोभी, रागीट व मत्सरी वगैरे प्रकारचा असला तर त्याच्या व माझ्यामध्यें फार अंतर राहील. परंतु एखादा भिक्षु जरी शेंकडों मैल दूर रहात असेल; पण लोभी, रागीट अथवा मत्सरी नसेल तर आमच्यामध्यें फार थोडें अंतर राहील.' हीच गोष्ट पुढील पोंचट व सर्वसामान्य अशा पद्यांमध्यें सांगितली आहे ती अशी:- 'लोभी, दुष्टबुद्धि व मत्सरी मनुष्य याच्यामध्यें, व शांति मिळालेल्या साधूमध्यें फार अंतर असतें. परंतु सदाचरणी, शांत व स्वार्थबुद्धीचा त्याग केलेल्या मनुष्यामध्यें व शांत अशा साधूमध्यें मुळींच अंतर नसतें.' हे वरील गद्य व पद्य भाग कोणीं तरी केवळ त्यांतील (दूर व जवळ) अंतर हा शब्द पाहून एका ठिकाणीं आणले असावेत.

अशींहि कांहीं ठिकाणें आढळतात कीं, गद्य भाग हें एक स्वतंत्रच सूत्र असून त्यानंतर येणा-या पद्यांशीं त्याचा बराच दूरचा-कित्येक वेळां केवळ शब्दसाम्याचाच-संबंध असतो. कांहीं ठिकाणीं तर गद्य व पद्य भागांचा कांहींच संबंध नसून, क्वचित ठिकाणीं ते परस्परविरुद्धहि असतात. अशा ठिकाणीं त्यांपैकीं गद्य अगर पद्य कोणता तरी एक भाग मूळांत नसून बराच नंतर घातला असावा. प्रथम एखादी कल्पना गद्यामध्यें सांगून नंतर तीच पद्यामध्यें मांडावयाची, अथवा एखाद्या तत्त्वाचें प्रतिपादन प्रथम गद्यामध्यें आरंभून पुढें पद्यामध्यें चालवावयाचें, ही पद्धति जुन्या बौद्ध ग्रंथांमध्यें आढळून येते. अशा स्वरूपांत असलेलीं सूत्रें जेव्हां इतिवुत्तकामध्यें संगृहीत करण्यांत आलीं तेव्हां इतरत्र जो गद्य अथवा पद्य भाग आढळला तोहि त्याच नमुन्याप्रमाणें लावून संग्रहांत सामील करण्यांत आला. हें काम कदाचित् पहिल्याच संग्रहकारानें केलें असावें, किंवा बहुत करून ब-याच नंतरच्या काळीं झालें असावें. ह्युएनत्संग यानें केलेल्या इतिवुत्तकाच्या भाषांतरामध्यें या संग्रहांतील शेवटचीं बरींचशीं सूत्रें आढळत नाहींत ही गोष्ट खरी आहे. त्याप्रमाणेंच या शेवटच्या सूत्रांतील कांहीं अंगुत्तर निकायामध्यें आढळतात, व हीं बहुत करून त्यांतूनच घेतलीं असावीत. तसेंच कांहीं श्लोक निरनिराळ्या गद्य भागाबरोबर दोन दोनदां आढळतात. या गोष्टीचा विचार केला असतां या लहानशा संग्रहामध्येंहि कांहीं जुना व कांहीं नंतरचा असे भाग एकत्र केले आहेत असें निःसंशय म्हणतां येते. या मागून घातलेल्या भागांमध्यें कांहीं ठिकाणीं गद्य भाग हा पद्यावरील टीकेसारखाच दिसतो. जुन्या व मूळ सूत्रांमध्यें मात्र गद्य भाग काल अथवा सौंदर्य यांपैकीं कोणत्याच दृष्टीनें कमी प्रतीचा ठरत नाहीं. मागाहून घातलेल्या भागामध्येंहि कांहीं जुना गद्य भाग अलीकडील पद्याशीं जोडला गेला असण्याचा संभव आहे.