प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

अभिधम्मपिटक.- पूर्वी अभिधम्म (श्रेष्ठ धर्म अथवा धर्माचीं श्रेष्ठ तत्त्वें) या शब्दाचे यूरोपस्थ पंडित मेटोफिजिक्स (अध्यात्म) या शब्दानें भाषांतर करीत असत. परंतु अभिधम्म याचा अध्यात्मज्ञानाशीं अथवा तत्त्वज्ञानाशीं सुत्तपिटकांत सांगितलेल्या धम्मापेक्षां यत्किंचितहि कमी अगर जास्त संबंध नाहीं. मिसेस -हीस डेव्हिड्स ही बौद्ध तत्त्वज्ञानाची इतकीं चिकित्सक व चहाती असूनहि तिनें असें म्हटलें आहे कीं, सर्व अभिधम्मपिटक जरी अस्तित्वांत नसतें तरी बौद्ध तत्त्वाविषयींच्या आपल्या ज्ञानामध्यें किंचितहि उणेपणा आला नसता. सुत्तपिटकांतील ग्रंथ आणि अभिधम्मपिटकांतील ग्रंथ यांमध्यें एवढाच फरक आहे कीं दुस-यामधील माहिती जास्त सविस्तर रुक्ष किंवा विद्वत्तादर्शक, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अधिक पांडित्यपूर्ण आहे. दोघांचाहि विषय एकच आहे. दोघांमध्येंहि कल्पकता व गांभीर्य यांचा अभाव दृष्टीस पडतो, व व्याख्या व वर्गीकरण यांची रेलचेल दिसते. या व्याख्यांचा कोशाच्या व बौद्धसांप्रदायिक परिभाषेचे यथार्थ ज्ञान मिळविण्याच्या कामीं उपयोग होईल म्हणावें तर त्यांमध्यें केवळ शब्दास समानार्थक प्रतिशब्द ठेवून दिलेले असल्यामुळें त्या बाबतींतहि निराशा होते. वर्गीकरणांचें नीतिशास्त्राची मानसशास्त्राच्या पायावर रचना करण्याचा प्रयत्न म्हणून कितीहि महत्त्व असलें, तरी त्यामध्यें सृष्टींतील व्यापारांविषयीं खोल दृष्टीनें व शोधक बुद्धीनें चिकित्सा केलेली क्वचितच आढळते. बहुतेक ठिकाणीं तर स्वतःच कल्पिलेल्या अथवा क्षुल्लक वर्गामध्यें निरनिराळ्या वस्तूच्या लांबलचक याद्या दिल्या आहेत, आणि त्यांमध्यें सर्वत्र कांहीं तरी सांप्रदायिक ठराविक तत्त्वेंच दृष्टीस पडतात-शोधक बुद्धीनें सशास्त्र पद्धतीनें केलेला एकहि शोध आढळत नाहीं. या ग्रंथाचें स्वरूप बहुतेक संवादात्मक आहे.

अभिधम्मांतील ग्रंथ सुत्तपिटकांतील ग्रंथांवरूनच रचलेले दिसतात. कांहीं सूत्रांची भाषापद्धति (मज्झिमनिकाय, १३७; व १४०) अभिधम्माप्रमाणेंच आहे, आणि अंगुत्तरनिकाय हें तर अभिधम्मपिटकाचें पूर्वगामींच दिसतें. विनयपिटकामध्यें अभिधम्मासंबंधीं उल्लेख केलेल्या मातिका (मातृकायाद्या) यांमध्येंच अभिधम्मपिटकाचे मूळ आढळतें.