प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे भाग. - परंतु मज्झिम निकाय यांतील सुत्तांवरून आपणांला प्राचीन बौद्ध संप्रदाय व बुद्ध आणि त्याचा पहिला शिष्यवर्ग यांच्या उपदेशाची पद्धति कळते. एवढेंच नव्हे तर त्या प्राचीन कालांतील आयुष्यक्रमाबद्दलची कांहीं मजेदार माहितीहि मिळते. ही माहिती केवळ भिक्षूंच्या रहाणीबद्दलच (नंबर ५, २१, २२ इत्यादि) मिळत नसून इतर लोकांबद्दलहि मिळते. उदाहरणार्थ, नं, ५१ वरून आपणांस ब्राह्मणांच्या यज्ञाबद्दल व त्या वेळचे यज्ञ, संस्कार व पुरोहितवर्ग यांच्यामधील परस्परसंबंधांबद्दल कित्येक उपयुक्त गोष्टी कळतात. भारतवर्षांत प्राचीन काळीं प्रचारांत असलेल्या निरनिराळ्या यतींच्या धर्माचे उल्लेखहि कोठें कोठें आढळून येतात. नं. १२ व १४ मध्यें आपणांस यतीच्या ओंगळ क्रियांचें उत्कृष्ट उदाहरण आढळते. नं. ४०, ४५, ५१ आणि ६० यांवरून आपणांस निरनिराळ्या पंथांच्या चमत्कारिक साधुंची माहिती मिळते. त्या वेळीं 'श्वयति' व 'वृषभयति' अशा प्रकारचे साधू असून ते अगदीं हुबेहुब कुत्रे व बैल यांच्याप्रमाणें खात, पीत व रहात असत. अशा यतीचें पुढे काय होईल असा बुद्धाला प्रश्न विचारला असतां, फार झालें तर 'श्वयति' हा कुत्र्याच्या व 'वृषभयति' हा बैलाच्या जन्मास जाईल किंवा ते दोघेहि नरकांत जातील, असें बुद्धानें उत्तर दिलें आहे. कांहीं सुत्तांवरून बौद्ध व जैन संप्रदायांच्या परस्परसंबंधाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळते. ही माहिती विशेषः उपालिसुत्तांत (नं. ५६) व नं. ५७, १०१ आणि १०४ ह्या सुत्तांत आली आहे. त्या वेळच्या खुळ्या समजुती, लोकभ्रत, सामाजिक गोष्टी व कायदेपद्धती यांचेहि उल्लेख मधून मधून आढळतात. उदाहरणार्थ, नं. १३ मध्यें त्या वेळच्या क्रूर शिक्षा दिल्या आहेत. सुत्त नं. ३८ मध्यें मुलांचा जन्म व त्यांचें शिक्षण याबद्दलच्या विचित्र कल्पना आढळतात. त्याप्रमाणेंच नं. २८ आणि नं. ३७ यांमध्यें सून आणि सासरा यांचे परस्परसंबंध कसे असत हें दृष्टीस पडतें.