प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
खुद्दक निकाय.- खुद्दकनिकाय (क्षुद्रकनिकाय) याला नेहमीं सुत्तपिटकांतील पांचवा निकाय म्हणतात. परंतु केव्हां केव्हां याचा अभिधम्मपिटकामध्यें अंतर्भाव करतात. त्याला मिश्रसंग्रह हें नांव जास्त सयुक्तिक होईल. कारण, या संग्रहामध्यें आपणाला कित्येक किरकोळ ग्रंथांबरोबरच पाली धर्मशास्त्रांतील कांहीं मोठमोठे ग्रंथहि आढळतात. परंतु या संग्रहामध्यें असलेल्या ग्रंथांचे विषय व स्वरूप हीं परस्परांपासून फारच भिन्न त-हेची आहेत. एका विशेष मनांत भरणा-या सूत्रांत बौद्ध संप्रदायावर पुढे येणा-या संकटाबद्दलचें भविष्य वर्तविलेलें आढळतें, व हें सूत्र अनेक ठिकाणीं आढळतें. यांपैकीं एक संकट हें होतें कीं, पुढें भिक्षू लोकांनां बुद्धानें उपदेशिलेल्यां उदात्त, गंभीर व या जगाच्या अंतापलीकडे टिकणा-या शून्य वादावरील सूत्रांचे पठन करणें आवडेनासें होऊन त्यांनां पंडितांनीं व कवींनीं केलेल्या काव्यमय, सुंदर शब्द व सुंदर वाक्ये यांनीं अलंकृत अशा पाखंडी सूत्रांचें श्रवण करणें आवडूं लागेल. यावरून असें दिसतें कीं, प्रथमतः कविताबद्ध सूत्रांस मान्यता मिळाली नसून त्यांनां धर्मसूत्रांमध्यें जागा देण्याबद्दल वाद होता. व त्यानंतर ब-याच कालानें त्याचा सूत्रांमध्यें अंतर्भाव होऊन खुद्दनिकायामध्यें त्यांचा संग्रह करण्यांत आला. अशी कल्पना करण्याचें मुख्य कारण हेंच कीं, या संग्रहातील मुख्य विषय काव्यमय म्हणजे सुभाषितसंग्रह, म्हणीं, गाणीं, पद्यें, काल्पनिक कथा व कल्पित गोष्टी हे आहेत. नंतर या संग्रहामध्यें कांहीं इतर, काव्यमय नाहींत अशा ग्रंथांचाहि अंतर्भाव करण्यांत आला असावा. यांच्याहि कर्त्याबद्दलची माहिती तितकीच अनिश्चित असावी; व त्यांचा अधिकारहि सर्वमान्य नसावा. हा संग्रह बराच उत्तरकालीं पुरा करण्यांत आला असावा. या संग्रहामध्यें आलेले निरनिराळे भाग अगदीं निरनिराळ्या काळीं रचले गेले आहेत, व प्रारंभीं ते एकाच संग्रहाचे भाग समजले जात नसावेत. आणि जरी हा संग्रह बराच नंतर करण्यांत आला तरी यांतील कांहीं भाग फार प्राचीन काळीं रचला गेला असावा असें दिसतें. बौद्ध वाङ्मयामध्यें, भारतीय काव्यामध्यें प्रसिद्ध व महत्त्वाचीं गणलेलीं अशीं जीं काव्यें आहेत तीं सर्व याच संग्रहांत आढळतात. तथापि आपण या खुद्दकनिकायांतील सूत्रांचा विचार त्यांच्या कालाच्या अगर महत्त्वाच्या अनुरोधानें न करतां तीं सिंहलद्वीपांतील हस्तलिखितामध्यें ज्या क्रमानें आढळतात त्या क्रमानेंच करूं.