प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
घडलेल्या प्रसंगांचें वर्णन.- कांहीं प्रास्ताविक गोष्टीमध्यें वास्तविक घडलेल्या कांहीं प्रसंगांचें वर्णन असावें असें वाटतें. याचें उदाहरण आपणांला पुक्कुसाति याच्या गोष्टींत दृष्टीस पडतें. तो दीक्षा घेण्याच्या उद्देशानें वस्त्र व भिक्षापात्रें आणण्याकरितां जात असतां त्याला एका गाईनें ठार मारलें (नं. १४०). तेव्हां बुद्धानें सांगितलें कीं, तो भिक्षु झाला नसतांहि निर्वाणाप्रत गेला. त्याप्रमाणेंच छन्न हा भिक्षु फार आजारी पडला असतां त्यानें आपलें शीर तोडून आत्महत्त्या करून घेतली, व ही गोष्ट बुद्धास पसंत पडली (नं. १४४). आत्महत्त्या ही केवळ दुसरा जन्म मिळविण्याकरितां केली असतां दोषार्ह आहे, परंतु जो निर्वाणाप्रत जातो त्याला आत्महत्त्येचा दोष लागत नाहीं