प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तत्कालीन संस्कृतीचें चित्र.- या कथांत तत्कालीन संस्कृतीचें चित्र चांगलें दिसून येतें. कांहीं तरुण लोक आपआपल्या स्त्रियांसह मजा मारण्याकरितां जात असतां त्यांपैकीं एकानें स्वतःची स्त्री नसल्यामुळें आपल्याबरोबर एका कुमारीस घेतलें होतें. या कुमारीनें तरुणांच्या एकूण एक वस्तू घेऊन पळ काढला. हे तरुण तिच्या पाठीस लागले असतां वाटेंत त्यांची बुद्धाशीं गांठ पडली. तेव्हां त्यांनीं तुम्ही एक तरुण स्त्री पाहिली काय, असें बुद्धास विचारलें. बुद्धानें उत्तर केलें, तुम्ही एखाद्या स्त्रीचा शोध करण्यापेक्षां स्वतःचाच शोध करणें चांगलें नाहीं काय ? बुद्धानें या प्रसंगाचा उपयोग करून घेऊन त्या सर्वांस आपल्या मताचा उपदेश केला व ते सर्व भिक्षू झाले. नागराजांच्या व देवांच्या अद्भुत कथाहि या ग्रंथांत पुष्कळ आढळतात. परंतु या सर्व कथांमध्यें सारिपुत्त (सारिपुत्र) आणि मोग्गालान (मुद्गलायन) यांनां बुद्धानें आपल्या संप्रदायांत घेतल्याबद्दलची हकीकत फार चमत्कारिक आहे. हे दोघेहि पुढे बुद्धाचें प्रियशिष्य झाले. बुद्धाचीं पहिली प्रवचनें-म्हणजे त्याचें काशी येथील प्रवचन व अग्निप्रवचन-हींहि याच जुन्या भागांत येतात.
यानंतरच्या महावग्गाच्या एका प्रकरणांत बुद्ध आपल्या जन्मभूमीच्या गांवीं जाऊन तेथें त्यानें आपला पुत्र राहुन यास आपल्या संप्रदायामध्यें घेतल्याबद्दलची हकीकत सांगितली आहे. चुलवग्गामध्यें अनाथपिंडक या धनाढ्य व्यापा-याची एक गोष्ट आली असून त्यानें संघास एक उपवन अर्पण केल्याचें म्हटलें आहे. त्याप्रमाणेंच बुद्धाचा शत्रू व प्रतिपक्षी जो देवदत्त याचीहि कथा यांत आली आहे. यानेंच बौद्ध संप्रदायांत प्रथम मतभेद उत्पन्न केला. त्याचप्रमाणें, बुद्धाची दाई महाप्रजापती हिनें भिक्षुणींचा संघ स्थापन करण्याविषयीं बुद्धास केलेली विनवणी व तिची 'आनंदानें' केलेली तरफदारी याविषयींच्याहि कथा वर्णिलेल्या आहेत.