प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

खंधकांतील कथांमध्यें बुद्धाबद्दलच्या अतिप्राचीन दंतकथांचे अवशेष.- सुत्तविभंगाप्रमाणें खंधकामध्येंहि प्रत्येक वचनास व नियमास आधार म्हणून कथा दिलेल्या आहेत; व त्या कथांमध्यें तें वचन अथवा तो नियम बुद्धानें केव्हां घातला हें सांगितलें आहे. या कथा अर्थातच कल्पित असून त्यांनां ऐतिहासिक महत्त्व मुळींच नाहीं; व त्या बहुतेक एकाच धर्तीच्या असल्यामुळें वाङ्‌मयाच्या दृष्टीनेंहि त्या निरुपयोगी आहेत. परंतु सुदैवानें ही गोष्ट सर्वच कथांनां लागू नाहीं. महावग्गाच्या पहिल्या कांहीं प्रकरणांत बुद्धाबद्दलच्या (बुद्धवंस) दंतकथेचे अतिप्राचीन अवशेष आढळतात. त्यामध्यें उत्कृष्ट जुन्या भाषेंत गौतम बुद्धाला बोधीची प्राप्ति कशी झाली, त्यानें आपल्या मतांचा प्रसार करण्याचा निश्चय कसा केला, व त्याला पहिले शिष्य कसे मिळाले ही हकीकत सांगितली आहे. उदाहरणार्थ, त्यांमध्यें यस (यश) या आर्य तरुणाची गोष्ट सांगितली आहे. ही कथा अशीः यस हा ऐषआरामांत वाढला असून त्याच्या रात्रीच्या रात्री नृत्यगायनांत जात असत. एकदां तो मध्यरात्रीं जागा झाला असतां सभोंवारच्या सुंदर स्त्रियांची ओंगळ स्थिति पाहून त्याला किळस आली. यामुळें त्याला ऐहिक सुखाबद्दल इतका तिटकारा आला कीं, चैनीचा मार्ग सोडून बुद्धाकडे येऊन तो भिक्षु होऊन राहिला. उत्तरकालीन बुद्धकथेमध्यें ही वरील गोष्ट सिद्धार्थाबद्दल - म्हणजे जो पुढें बुद्ध झाला त्याच्या स्वतःबद्दल - म्हणून सांगितली आहे.