प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

उदान.- धम्मपद या ग्रंथामध्यें प्रथम श्लोकांचाच संग्रह असून त्यांनां टीकारूपानें गद्यमय गोष्टींचा भाग मागून जोडण्यांत आला. या गोष्टींमध्यें विशिष्ट श्लोक कोणत्या विवक्षित प्रसंगीं म्हटला गेला तें सांगितलें आहे. परंतु उदान या भागामध्यें प्रथमपासूनच गद्य व पद्य भाग होते. या ग्रंथाचे आठ वग्ग असून प्रत्येक वग्गामध्यें दहा सुत्रें आहेत. या सुत्रांमध्यें बुद्धाच्या कालच्या लहान लहान गोष्टी असून, शेवटीं बुद्धानें त्या गोष्टींवरून स्फूर्ति होऊन म्हटलेलें वचन दिलेलें आहे. अशा स्फूर्तीनें उच्चारिलेल्या वचनाला उदान हें नांव आहे. हीं वचनें बहुधा पद्यमय असून त्रिष्टुभ् अथवा जगती छंदामध्यें आहेत. क्वचित् प्रसंगीं तीं गद्यमयहि आहेत. या उदानांमध्यें बौद्धांचें जीवितध्येय, बौद्ध भिक्षूंचा आयुष्यक्रम, त्यांच्या मनाला शांतीपासून होणारा आनंद, सर्व ऐहिक वस्तूंचा त्यांनीं केलेला त्याग, व निर्वाणापासून प्राप्त होणारें अनंत सुख यांची थोरवी वर्णन केली आहे.

परंतु या कथा ज्यांनीं श्लोक रचले त्यांनीच लिहिलेल्या असाव्या अशी मुळींच कल्पना होत नाहीं. या कथा बहुतेक पोरकट आहेत, व कांहीं ठिकाणीं तर यांतील कल्पनाहि मूर्खपणाच्या आहेत. यामुळें श्लोकांच्या स्वारस्याचा भंग होतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणीं बुद्धानें सारिपुत्त यास दुस-या एका भिक्षूस उपदेश करतांना पाहिलें व एवढ्याच गोष्टीवरून त्याला एक श्लोक म्हणण्याची स्फूर्ति झाली असें वर्णन आहे. तो श्लोक (७,५) असा : ''ज्या अर्थी तो सर्व वासनांपासून मुक्त झाला आहे, प्रवाह आटून गेला आहे आणि यापुढें वाहणार नाहीं, त्या अर्थी ज्याप्रमाणें मोडलेलें चक्र पुढें फिरणार नाहीं त्याप्रमाणें दुःखाचा अंत झाला आहे.'' बुद्धाचे पट्ट शिष्य सारिपुत्त व मोग्गलान यांच्याबद्दलची पुढील गोष्टहि अशाच प्रकारची आहे. श्रेष्ठ सारिपुत्त हा एकदां नुकतीच श्मश्रू करून चांदण्यामध्यें उघड्यावर ध्यान करण्यांत मग्न झाला होता. अशा वेळीं एका यक्षानें खोडसाळपणानें सहज त्याच्या डोक्यावर एक चापट मारली. या त्याच्या चापटीमुळें एखादा सात आठ हात उंच हत्ती सहज मरून पडला असता, अथवा एखाद्या गिरिशिखराचें पिष्ट झालें असतें; परंतु त्यानें चापटी मारली नाहीं तोंच तो जळालों जळलों म्हणून ओरडत खालीं नरकांत जाऊन पडला. हें सर्व वृत्त मोग्गलान यानें अंतर्दृष्टीनें पाहून तो धांवत सारिपुत्ताची चौकशीं करण्याकरितां आला. आणि त्यानें विचारलें कीं, मित्रा, तूं ठीक आहेस ना ? तुला समाधान वाटतें कां ? तुझें अंग कोठें दुखावलें आहे कां ? सारिपुत्तानें उत्तर दिलें, सर्व ठीक आहे, परंतु माझें डोकें थोडेसें दुखत आहे. हें ऐकून त्याच्या मित्रानें मोठें आश्चर्य प्रदर्शित केलें. सारिपुत्तानेंहि आपणा स्वतःस एक धुळीचा कणहि दिसला नसतां मोग्गलान यानें आपल्या अंतर्ज्ञानानें ही गोष्ट पाहिली याबद्दल विस्मय दाखविला. बुद्धानें हें संभाषण अंतर्ज्ञानानें जाणून पुढील श्लोक म्हटला [४, ४] : ''ज्याचें मन शिलेप्रमाणें घट्ट असून त्यांत चलबिचल होत नाहीं, वासना उत्पन्न करणारे सर्व पदार्थ पुढें असतांहि ज्याच्या मनाला कशाचीहि इच्छा होत नाहीं, ज्याला कोणत्याहि गोष्टींपासून राग येत नाहीं [असें ज्याचें मन आहे], त्याला केव्हांहि दुःख होणार नाहीं.'' या वरील गोष्टींत जर कांहीं विनोद असेल तर तो आपाततः आलेला आहे. दुस-या एका गोष्टीमध्यें एक साधु हवेमध्यें उडत जाऊन तेथें इतका जळून गेला कीं त्याचा कोळसा अथवा काजळहि उरलें नाहीं. अशा रीतीनें तो पूर्ण निर्वाणाप्रत गेला असें वर्णन करून त्यावरून बुद्धानें पुढील श्लोक म्हटला आहे (८, १०) : ''जेव्हां एखाद्या मोठ्या घणाच्या आघातानें ठिणगी उडून विझून जाते तेव्हां तींतील अग्नि कोठें जातो हें कोणासहि कळत नाहीं. त्याप्रमाणेंच जो मनुष्य पूर्णपणें मोकळा झालेला आहे, जो इंद्रियांच्या बंधनांतून व वासनेच्या प्रवाहांतून सुटून गेला आहे, ज्याला निर्वाणाचा आनंद प्राप्त झाला आहे, तो कोठें जातो हें कोणासहि कळत नाहीं.''  विंटरनिट्झच्या मतें वर दिलेली पोरकट गोष्ट बुद्धाच्या वचनांतील गांभीर्याशीं विसंगत आहे. कांहीं ठिकाणीं तर श्लोक आणि गोष्टी यांमध्यें मुळींच एकवाक्यता आढळत नाहीं. उदाहरणार्थ ५,५ आणि ७,१० पहा. यावरून विंटरनिट्झच्या मतें उदान या ग्रंथांतील श्लोक हेच कायते मूळ प्राचीन बौद्ध वाङ्‌मयामध्यें असून त्यांत आढळणा-या गद्य कथा मागून टीकाकारांनीं रचल्या असाव्यात, अथवा इतर ग्रंथांतून घेतल्या असाव्यात. यांतील कांहीं कथा बुद्धाच्या चरित्रांतील असून त्या विनयपिटकांतील महापरिनिब्बानसुत्ताच्या कांहीं भागांशीं (उदाहरणार्थ १,  ४; २, १; ६, १; ७, ९; ८, ५ व ६) शब्दशः जुळतात. त्यांचा धर्मशास्त्रांमध्यें संग्रह केला गेला याचें कारण धम्मपदावरील टीकेमध्यें सांगितलेल्या कथांपेक्षां त्या कदाचित् जुन्या असाव्यात, अथवा या सर्व वचनांनां प्रास्ताविक गोष्टी जोडून पूर्णता आणणें जरून वाटलें असावें.