प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
अपदान.- जातकग्रंथ हा जरी बराच मोठा असून त्यामध्यें अनेक गोष्टी आल्या आहेत, तरी त्यामध्यें सर्वच कथा दिल्या आहेत असें नाहीं. जातकांमध्यें जशा बोधिसत्त्वाच्या व स्वतः बुद्धाच्या पूर्व जन्मांतील कथ सांगितल्या आहेत, तशाच खुद्दक निकायांतील अपदान (सं. अवदान) या भागामध्यें बुद्धाचे पुढें अर्हत झालेले शिष्य व शिष्यिणी यांच्या पद्यमय गोष्टीचा संग्रह आहे. या सर्व साधूंच्या गोष्टी आहेत. अपदान याचा अर्थ पराक्रमाचें कृत्य असा आहे. त्याप्रमाणेंच आत्मत्याग व भूतदया याची उत्कृष्ट उदाहरणें असाहि त्याचा अर्थ आहे. या अपदानामध्यें बौद्ध संस्कृत वाङ्मयांतील अवदानाप्रमाणें पराक्रमकथा म्हणजे साधूंच्या तात्त्विक कृत्यांबद्दलच्या गोष्टी आहेत. कांहीं ठिकाणीं बुद्धाकरितां केलेल्या एखाद्या नीच कामाचीहि गणना वरील कृत्यातच केलेली आढळते. आतांपर्यंत थेरी अपदानापैकीं (भिक्षुणीच्या चाळीस गोष्टी) कांहीं उतारे व थेर अपदानासंबंधीं कांहीं लेख मात्र विशेष पुढें आलेले दिसतात. थेर अपदान यामध्यें ५५ प्रकरणें असून प्रत्येकांत १० अपदानें आहेत. याखेरीज थेरांच्या ५५० आणखी गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी एकाच स्वरूपाच्या आहेत. प्रथम एखादा थेर अथवा थेरी आपण गौतमाच्या पूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या बुद्धाची कशी भक्ति केली हें सांगून, त्या बुद्धानें पुढें गौतम बुद्ध येऊन तुला उपदेश करील असें भविष्य सांगितल्याचें सांगते; व शेवटीं तें भविष्य खरें होऊन आपणाला अर्हत् पद कसें मिळालें त्याचें वर्णन करते. ही अपदानें बौद्ध धर्मशास्त्रांतील ग्रंथांपैकीं बरींच अलीकडील असावींत. एड. मूलर याच्या मताप्रमाणें कांहीं अपदानें बौद्ध संस्कृत वाङ्मयांतील अवदानांपेक्षां अलीकडचीं आहेत. सिलव्हेन लेव्ही म्हणतो कीं, थेरी गोतमी महापजापती हिचें अपदान अश्वघोषाच्या एका काव्यासारखें दिसतें. हा सर्व ग्रंथ अद्यापि प्रसिद्ध न झाल्यामुळें विंटरनिट्झ हा आपलें मत देण्याचें धाडस करीत नाहीं.