प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
जातककथा. - ही गोष्ट विशेषतः खुद्दनिकायामध्यें समाविष्ट केलेल्या जातक अथवा बोधिसत्त (त्त्व) कथा (बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या गोष्टी) यांमध्यें जास्त स्पष्टपणें दिसून येते. बौद्ध ग्रंथामध्यें बोधिसत्त हें नांव जो पुढें बुद्ध व्हावयाचा असतो त्याला दिलेलें आहे. गौतमबुद्धाला बोधिसत्त हें नांव शाक्य वंशांत येऊन बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीच्या सर्व जन्मांमध्यें दिलेलें आढळतें. जातक कथांमध्यें बोधिसत्तानें आपल्या एखाद्या पूर्व जन्मामध्यें स्वतः केलेल्या, अथवा प्रेक्षक किंवा इतर कोणत्याहि प्रकारें त्याचा ज्यांत संबंध आलेला आहे, अशा गोष्टी दिलेल्या आहेत. यामुळें प्रत्येक जातकाचा आरंभ अमुक एका वेळीं (उदाहरणार्थ, ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां) बोधिसत्त अमक्याच्या पोटीं (उदाहरणार्थ, एखाद्या राणीच्या अथवा हत्तिणीच्या) जन्मास आला होता' अश रीतीनें होऊन नंतर गोष्ट सुरू होते. यामुळें लोकांमध्यें प्रचारांत असलेल्या अथवा लौकिक वाङ्मयामध्यें आढळणा-या कोणत्याहि गोष्टीला जातककथेचें रूप देणें शक्य होतें. त्या गोष्टीतील एखाद्या मनुष्याला, प्राण्याला अथवा देवतेला बोधिसत्त म्हटलें म्हणजे झालें. आणि याप्रमाणें कोणतीहि गोष्ट, मग ती लौकिक असो अथवा बौद्ध कल्पनांपासून कितीहि दूरची असो, तिला बौद्ध कथेचें रूप देतां येत असे. तथापि भारतीयांमध्यें कथा सांगण्याचा व ऐकण्याचा नाद जो इतका हाडींमांसीं खिळला आहे, त्याचा उपयोग आपल्याला अनुयायी मिळविण्याकडे जर भिक्षूंनीं करून घेतला नसता तर त्यांनां भारतीय म्हणून म्हणतांच आलें नसतें. ही गोष्ट बौद्ध भिक्षूंनींच केवळ नव्हे तर भरतखंडांतील सर्व संप्रदायांच्या उपदेशकांनीं केली आहे; आणि तीच गोष्ट कांहीं शतकांनंतर पाश्चात्त्य ख्रिस्ती भिक्षूंनींहि केली. या भिक्षूंनां पोप ग्रेगरी दि ग्रेट यानें 'दाखल्यासाठीं सांगितलेली गोष्ट पुराव्याप्रमाणें उपयोगीं पडते' असें सांगितलें होतें. भरतखंडांतील भिक्षूंनींहि याच तत्त्वाचा स्वीकार केला होता; आणि पुढें ख्रिस्ती उपदेशकांनीं जसें केलें त्याप्रमाणेंच बौद्ध भिक्षूंनींहि आपल्या कार्यासाठीं निरनिराळ्या त-हेच्या काल्पनिक गोष्टी, अद्भुत कथा व आख्यानें इत्यादिकांचा उपयोग केला. यामुळें जातककथांची कल्पना ख्रिस्ती लोकांस जेस्टा रोमॅनोरम अथवा वेसेलस्किस माँकस्लेटैन यावरून करतां येईल. या पुस्तकांतील गोष्टी निरनिराळ्या शतकांतील धर्मोपदेशकांच्या प्रवचनांतून एकत्र केल्या असून त्यांचे विषय फार विविध आहेत व त्यांमध्यें कांहीं पारमार्थिक किंवा आध्यात्मिक तर कांहीं केवळ लौकिक अथवा ऐहिक विषयासंबंधाच्या गोष्टी आहेत. प्राचीन कालच्या बौद्ध थेरांनीं प्रथमतः भिक्षूंनां गोष्टी सांगण्याबद्दल कदाचित् निषेध केला असेल. धर्मशास्त्रामध्यें कित्येक ठिकाणीं भिक्षूंनां राजे, चोर, मंत्री, शस्त्रास्त्रें, युद्ध, स्त्रिया, देव, यक्ष, जलपर्यटन इ. विषयांवर गोष्टी सांगण्याचा स्पष्ट निषेध केलेला आढळतो. तथापि लवकरच या बाबतींत सवलत मिळूं लागली, आणि एका बौद्ध संस्कृत ग्रंथामध्यें आपणांला असें वर्णन आढळतें कीं, बुद्ध सूत्रें, गाथा, आख्यानें व जातकें यांच्या साहाय्यानें उपदेश करीत असे. आणि तो फार सुरस आणि उपदेशपर गोष्टी सांगत असे आणि त्यामुळें लोकांनां पारमार्थिक ज्ञानापासून या जन्मांत सुख मिळून मरणोत्तरहि सुख मिळत असे. प्रथमतः सर्व गोष्टींनां जातकांचें रूप देण्याची आवश्यकता वाटली नसावी. कारण, आपणांला मधूनमधून कांहीं गोष्टी तशाच आढळतात; उदाहरणार्थ, विनय पिटकांतील दीघावु याच्या गोष्टीमध्यें नायकास बोधिसत्त्वाचें रूप दिलेलें आढळत नाहीं. या गोष्टीपासून ब-याच नंतर एक जातककथा निर्माण झाली. तथापि कांहीं वास्तविक जातककथा असून त्या सूत्रसंग्रहामध्यें आढळतात, आणि त्यांवरून बौद्ध भिक्षू मध्यकालीन ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणें आपल्या प्रवचनांतून गोष्टीचा उपयोग करीत असत असें दिसतें. जातककथांचा जेव्हां एका ग्रंथामध्यें संग्रह करण्यास प्रारंभ झाला, तेव्हां सर्व जातककथांचा धर्मशास्त्रामध्यें समावेश झाला होता असें नाहीं. आणि या ग्रंथापैकींहि कांहीं भागासच धर्मशासत्राची मान्यता मिळाली. ज्या जातककथा पद्यांमध्यें (गाथा) असत, त्यांनां पूर्णपणें संग्रहामध्यें जागा मिळाली. प्राचीन कालीं भारतवर्षामध्यें गद्य व गद्यमिश्रित कथा सांगण्याचा प्रघात फार होता असें दिसून येतें. गोष्टी तरी विशेषतः याच गद्यपद्यमिश्रित पद्धतींत असत. गद्य कथेला कांहीं पद्यें जोडून रसभरीत करण्याची व पद्यांतील भाग गद्यामध्यें स्पष्ट करण्याची चाल फार सार्वत्रिक होती. यक्षयक्षिणींच्या कल्पित कथांमध्यें ग्रिम याच्या ग्रंथामध्यें आढळून येतात त्याप्रमाणें प्रचलित गोष्टी व पद्यें घातलेलीं आढळतात. कल्पित कथा रचणारा एक दोन पद्यांमध्यें तिचें तात्पर्य देत असे. लावण्या व गाणीं रचणारे यांचीं गीतें संवादात्मक पद्यांमध्यें असून ते प्रारंभीं कांहीं प्रास्ताविक गद्य भाग घालीत असत; व मधून मधून गद्यामध्यें कांहीं आवश्यक ठिकाणीं खुलासा देत असत. यामुळें ज्या गोष्टींनां जातकांचे रूप देण्यांत आलें त्या, सर्वच नसल्या तरी बहुतेक, गद्यपद्यमिश्रित असत. परंतु धर्मशास्त्रामध्यें फक्त पद्यांचा म्ह. गाथांचाच समावेश करण्यांत आला. व तेवढ्याच खुद्दकनिकायामध्यें समाविष्ट करण्यांत आल्या. यामुळें धर्मशास्त्रामध्यें जो जातक ग्रंथ आहे, तो फक्त पद्यमय असून त्यामध्यें कांहीं पद्यमय कथा आहेत. परंतु कांहींचा गद्य गोष्टींशिवाय अर्थ लागत नाहीं. अशा ठिकाणीं गद्य भाग घालण्याचें काम उपदेशांवर पडून ते आपल्या इच्छेप्रमाणें वेळेनुसार तो घालीत असत. अखेरीस कांहीं कालानें - धर्मशास्त्रांत अंतर्भूत होणारा भाग निश्चित झाल्यानंतर ब-याच कालानें - टीकारूपानें हा गद्य भाग जोडून निश्चित करण्याचें काम सुरू झालें असावें. अशा टीकात्मक ग्रंथामध्यें प्रत्येक जातककथेचे पुढील भाग येतात:-
१ प्रथम प्रास्ताविक गोष्ट असून तिला पच्चुप्पन्नवत्थु (प्रत्युत्पन्नवस्तु – कथाप्रसंग) असें नांव असून, तीमध्यें बुद्धानें ती गोष्ट भिक्षूंनां केव्हां सांगितली त्या प्रसंगाचें वर्णन असतें.
२ नंतर एक गद्य कथा अतीतवत्थु (अतीतवस्तु) असून तीमध्यें ती कथा सांगितलेली असते.
३ तिस-या भागामध्यें गाथा (पद्यें) असून सामान्यतः त्या अतीतवत्थु किंवा क्वचित् पच्चुप्पन्नवत्थूमध्यें मोडतात.
४ चौथ्या भागांत (वेच्याकरण) गाथांनां व्याकरणदृष्ट्या शब्दार्थसूचक टीपा दिलेल्या असतात.
५ पांचव्या भागांत (समोधान) मागील कथेंतील पुरुषांशीं प्रस्तुत कथेंतील व्यक्तींचें साम्य दाखविलेलें असतें.
जा त क क थां ची र च ना व इ ति हा स.- या जातक कथांवरील जातकठ्ठ - कथा नांवाच्या टीकात्मक ग्रंथाचें सिंहली भाषेंत भाषांतर झालें होतें; परंतु तें केव्हां झालें हें निश्चित नाहीं, व मूळांतील गाथा (पद्यें) भाषांतरकर्त्यानें पालींतच ठेविल्या होत्या. या सिंहली ग्रंथाचें बहुधा ख्रिस्ती शकाच्या पांचव्या शतकामध्यें जातकठ्ठवण्णन (जातकार्थवर्णन) या नांवानें पुनः पाली भाषेमध्यें भाषांतर झालें, आणि हेंच भाषांतर व्ही फॉसबोल या डेन विद्वानानें संपादन केल्यामुळें सर्वांनां माहीत होऊन भाषांतररूपानें त्याचा सर्वत्र प्रसार झालेला आहे.
या जातकठ्ठवण्णन ग्रंथाच्या इतिहासावरूनच असें म्हणतां येईल कीं, जातककथांतील गद्य भाग गाथांइतका जुना हीं हे सिद्ध होते. धर्मशास्त्राच्या प्राचीनत्वाबद्दल जे मुद्दे पुढें आणितां येतात, ते तेथें लागू पडत नाहींत. आणि गाथा कांहिंहि फरक न होतां मूळापासून पालींतच राहिल्या आहेत, व गद्य भागाचें प्रथम पालींतून सिंहलीमध्यें व पुन्हां सिंहलींतून पालीमध्यें याप्रमाणें दोनदां भाषांतर झालें आहे. हें पहिलें व दुसरें भाषांतर होत असतांना मुळामध्यें पुष्कळ फरक झाले असतील व कांहीं भाग अधिकहि आला असेल; किंवा संग्रहकारानें अथवा या जातककथांच्या एखाद्या संपादकानें सुद्धां यांतील गद्यामध्यें फेरफार करणें अथवा भर घालणें शक्य आहे. पुष्कळ ठिकाणीं गद्यभाग अलीकडील आहे, हें अगदीं उघड दिसतें. त्यामध्यें सिंहलद्वीपाचा उल्लेख आढळतो. गाथा व गद्य यांमध्यें कांहीं ठिकाणीं विरोधहि दृष्टीस पडतो.
गाथांची भाषाहि गद्यापेक्षां बरीच जुनी आहे. याचें कारण गाथांचें भाषांतर व पुनर्भाषांतर झालें नाहीं हें एक होय. प्रत्युत्पन्नवस्तु आणि अतीतवस्तु यांमधील फरक फॉसबोल याच्या आवृत्तीवरून कळून येत नाहीं. ते दोन्हीहि भाग एकाच टीकाकारानें रचल्यासारखे दिसतात. तथापि, या टीकाकारानें जुन्या व चांगल्या सामुग्रीचा उपयोग केलेला असावा. कारण, लहान लहान कल्पित कथा व काल्पनिक अद्भुत गोष्टी यांमधील गद्य भाग उत्कृष्ट साधला आहे. परंतु इतर जातकांमधील - विशेषतः ज्यांमध्यें गद्य भागाची जरूर भासत नाहीं अशा गोष्टींतील - गद्य फारच कमी दर्जाचें, नीरस व कांहीं कांहीं ठिकाणीं गाथाशीं विसंगतहि दिसतें. एकाच टीकाकारानें कांहीं गोष्टी चातुर्यानें व विनोदयुक्त अशा लिहून कांहीं अगदीं नीरस व निर्जीव भाषेंत लिहिल्या आहेत, असें आपणांला म्हणतां येणार नाहीं. तेव्हां आपणांला असें गृहीत धरलें पाहिजे कीं, ज्या गोष्टी चांगल्या वठल्या आहेत तेथें त्याला मूळच्या चांगल्या गोष्टी व परंपरा उपलब्ध असाव्या. याप्रमाणें गद्यांतहि कांहीं जुना भाग राखला गेला असवा.
ख्रि. पू. ति स -या श त कां त जा त क क थां चें अ स्ति त्व.- आणि वास्तविक गोष्टहि अशीच आहे. कांहीं जातक कथा व त्यांतील गद्य भाग हीं बौद्ध परंपरेमध्यें ख्रिस्तपूर्व तिस-या शतकांत अस्तित्वांत होती, ही गोष्ट भरहुत आणि सांची येथील स्तूपांसभोवतीं असलेल्या दगडी भिंतीवरील कोरीव चित्रांवरून सिद्ध होते. ही गोष्ट जातकांच्या इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाची आहे. हीं बहुमोल बौद्ध स्मारकें अंकितलेखशास्त्रवेत्त्यांच्या मतें ख्रिस्तपूर्व तिस-या किंवा दुस-या शतकांतील असून, त्यांवर आपणांला जातककथांतील प्रसंग खोदलेले आढळतात. त्यांमध्यें कांहीं प्रसंग केवळ गद्य कथांमध्येंच वर्णन केलेले आहेत. भरहुत येथें तर त्या चित्रांवर जातकांचीं नांवेंहि खोदलेलीं आहेत. या चित्रांवरून एवढें सिद्ध होतें कीं, सध्यांच्या जातक ग्रंथांमध्यें आढळणा-या कांहीं गोष्टी ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या अखेरीच्या कालींहि जातक या नांवानेंच संबोधिल्या जात असून, त्या बोधिसत्त्वाच्या गोष्टी म्हणूनच प्रसिद्ध असत. त्याप्रमाणेंच त्यांवरून असेंहि सिद्ध होतें कीं, त्या वेळीं प्रचलित असलेल्या पुष्कळ लौकिक गोष्टींनां बौद्ध भिक्षूंनीं सांप्रदायिक रूप दिलें होतें. यावरून त्या गोष्टी फार प्राचीन कालापासून प्रचलित असून बुद्धपूर्वकालीन असाव्यात.
ग द्य भा गा चें उ त्त र का ली न त्व.- यामुळें कांहीं प्रसिद्ध संशोधकांनीं जातक कथांमध्यें आपणांला बुद्धकालीन अथवा त्याच्या पूर्वीच्याहि कालच्या गद्य वाङ्मयाचें व संस्कृतीचें चित्र दृष्टीस पडतें असें जें गृहीत धरलें आहे, तें कांहीं थोड्या बाबतींत खरें आहे. यांतील कांहीं पद्यें व कांहीं गद्य कथा मात्र इतक्या जुन्या असाव्यात. तथापि कांहीं म्हणी व परंपरागत कथा बुद्धपूर्वकालीन साधूंच्या काव्यांतील असल्या तरी, एकंदर गाथांचा भरणा ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाहून जुना आहे असें म्हणणेंच मूळीं वाजवी होणार नाहीं; मग सिद्ध करणें तर दूरचे राहिलें. गद्य भाग बहुतेक ख्रिस्ती शकानंतरचाच आहे असें खात्रीनें म्हणता येईल.
तथापि जातक ग्रंथांच्या स्वरूपामध्यें जे वेळोवेळीं फरक घडून आले, त्यांत गाथांनां हात लागला नाहीं असें म्हणतां यावयाचें नाहीं. कांहीं ठिकाणीं त्यांच्या क्रमामध्यें फरक झालेला आहे, व कांहीं ठिकाणीं मागाहून भरहि पडली आहे. जातकगाथांचा साकल्यानें विचार केला असतां, त्या सर्व एकट्यानें रचल्या असतील - म्हणजे त्यांचा संग्रह करूनच नव्हे, तर त्यांतील कांहीं स्वतःरचून, कांहींच्या स्वरूपांत बदल करून अथवा कांहींत भर घालून त्या सर्वांवर आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा कोणीं एकट्यानें उठविला असेल - असें म्हणणें शक्य नाहीं. जातकांतील विषयांच्या विविधतेकडेच केवळ दृष्टि टाकली असतां आपणांला असें आढळून येईल कीं, इतकें विषयवैचित्र्य व इतके विविध महत्त्वाचे भाग एकट्याच्या कल्पनेंतून निघणें अशक्य आहे. या जातकगाथांचा संग्रहकार एक असूं शकेल, परंतु कर्ता एक असणें शक्य नाहीं. तथापि या संग्रहकारानें, इतर भारतीय संग्रहकारांप्रमाणें मधून मधून नवीन भर घालण्यास अथवा कांहीं भागांची पुन्हां मांडणी करण्यास मागें पुढें पाहिलें नसेल.
यावरून या जातकांची महाभारताप्रमाणेंच अवस्था आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्यांतील प्रत्येक प्रकरण, प्रत्येक कथा, एवढेंच नव्हे तर कांहीं ठिकाणीं प्रत्येक पद्य घेऊन त्याच्या रचनेचा काल स्वतंत्रपणें निश्चित केला पाहिजे. परंतु जातकठ्ठवण्णन या स्वरूपांत आढळून येणारा हा गोष्टींचा संग्रह भरतखंडांतील कल्पित कथा, अद्भुत गोष्टी व इतर परंपरागत कथा यांचा सर्वांत जुना संग्रह आहे, असें जें ठिकाठिकाणीं म्हणण्यांत येतें तें खरें दिसत नाहीं.
तथापि, केवळ भारतीय वाङ्मयाच्या इतिहासाच्या दृष्टीनेंच नव्हे तर सर्व जगांतील वाङ्मयाच्या इतिहासाच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाच्या अशा बौद्ध कथांच्या संग्रहासंबंधानें जेव्हां आपण विचार करूं लागतों, तेव्हां आपणांस सध्यां उपलब्ध असलेल्या जातककठ्ठवण्णन या एवढ्या एकाच ग्रंथापासून आरंभ करावा लागतो. यापैकीं प्रत्युत्पन्नवस्तु हा भाग बाजूलाच ठेवावा लागतो. यांतील कथाभाग अतीतवस्तु या भागाप्रमाणेंच असून त्यापैकीं कांहीं भाग केवळ मूर्खपणाचा, गचाळ व मागाहून घातलेला आहे. ज्या ज्या कांहीं यांत चांगल्या गोष्टी आहेत, त्या त्या विनयपिटक, सुत्तनिपात, अपदान इ. ग्रंथांतून व कांहीं इतर टीकाग्रंथांतून घेतल्या आहेत. यापेक्षां मुख्य जातककथा अथवा अतीतवस्तु हा भाग जास्त महत्त्वाचा दिसतो.
जा त क क थां चें स्व रू प.- या संग्रहांतील जातककथा संख्येनें पांचशेंहून अधिक असून त्यांमध्यें गोष्टीचें सर्व प्रकार व स्वरूपें आढळतात. स्वरूपाविषयीं पाहतां आपणाला पांच प्रकार आढळतात:- १ गद्य कथा व मधूनमधून पद्यमय कल्पित कथा, किंवा सुभाषित दिलेलें आढळतें. या कथानकांतील गद्य व पद्य यांचा संयोग फार सुंदर होऊन दोहोंमिळून कथानकास पूर्णता येते. अशा ठिकाणीं जातककठ्ठवण्णनाच्या गद्य भागासहि पूर्वींच्या परंपरेचा आधार चांगला होता असें दिसतें. २(अ) संवादरूपीं आख्यानें व (आ) पद्यरूपी संवाद व कथानक यांचें मिश्रण. अशा कथानकांतील जातकठ्ठवण्णनामध्यें आढळून येणारा गद्य भाग अनवश्यक, नीरस व टीकाकारानें घुसडून दिल्याप्रमाणें व कांहीं ठिकाणीं गाथांच्या अर्थाला विरोधात्मक असा दृष्टीस पडतो. ३ मोठमोठीं कथानकें. हीं प्रथम गद्यांत आरंभ होऊन पुढें पद्यमय वर्णन असेलेलीं, अथवा मधून मधून गद्य कथानक असून कांहीं कथानकात्मक व कांहीं संवादरूपीं पद्यें असलेलीं अशीं आढळतात. या ठिकाणीं गद्य भाग अवश्यक असतो; परंतु जातकठ्इवण्णनांतील गद्य मूळच्या गद्याची वास्तविक नक्कल नसून टीकाकारांनीं त्यांत पुष्कळ भर घातली आहे, व त्याचें स्वरूपहि बदलून टाकलें आहे.
जातककथांतील विषय पुढें दिल्याप्रमाणें आहेत:-
(१) कल्पित कथा. या सर्वसामान्य भारतीय कल्पित कथांप्रमाणें नीतिविषयक आहेत. यांपैकीं कांहींचें धोरण वैराग्यपर आहे; आणि त्यांतील फारच थोड्या वास्तविक बौद्ध आहेत. (२) अद्भुत कथा. यांमध्यें कांहीं प्राण्यांच्याहि गोष्टी असून त्यांचें सामान्य स्वरूप यूरोपांत प्रचलित असलेल्या यक्षिणींच्या कथांप्रमाणें आहे, व त्यांत बौद्धसांप्रदायिक असें कांहीं नाहीं. त्यांपैकीं फारच थोड्यांस बौद्धसांप्रदायिक वळण दिलेलें दिसतें, व कांहीं बौद्धांनीं नवीन रचलेल्या दिसतात. (३) लहान लहान कथानकें, विनोदी कथा व प्रहसनें. यांवर बौद्ध संप्रदायाची मुळींच झांक पडलेली दिसत नाहीं. (४) कादंब-या व अद्भुत कथा व कांहीं साहसकथा. यांमध्यें मधून मधून उपकथाहि आढळतात. या कथांतील नायक बोधिसत्त्व आहे. याखेरीज बौद्धसांप्रदायिक असें कांहीं एक त्यांत आढळत नाहीं. (५) नीतिकथा. (६) म्हणी व सुभाषितें. (७) आध्यात्मिक कथा. या सर्व कथांतील कांहीं अंशालाच बौद्धसांप्रदायिक म्हणतां येईल; बाकीचा बहुतेक भाग सर्वसामान्य भारतीय वैराग्यपर काव्यांतून घेतलेला आढळतो. टीका सोडून दिली तर जातककथांतील अर्ध्यापेक्षां अधिक भाग बौद्धांनीं न रचलेला आहे असें म्हटल्यास चूक होणार नाहीं. या गोष्टीचें कारण उघडच आहे.
बौद्ध भिक्षूंमध्यें सर्व वर्गाचें लोक येत असत. त्यामुळें त्यांच्यामध्यें निरनिराळ्या प्रकारचे लोक असून कांहींनां मजूर, कारागीर, वाणी, उदमी वगैरे प्रकारच्या लोकांत प्रचलित असलेल्या गोष्टी माहीत असत; कांहींनां वीर पुरुषांचे पोवाडे व लावण्या येत असत; व कांहींनीं आध्यात्मिक कथा व ब्राह्मण आणि ॠषी यांच्याबद्दलच्या अद्भुत कथा ऐकिलेल्या असत. जेव्हां ते भिक्षू होत असत, तेव्हां ते या गोष्टींचा आध्यात्मिक परंपरांशीं व भिक्षूंच्या कथांशीं संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत असत; आणि याच गोष्टींमुळें भारतीय वाङ्मयाच्या इतिहासामध्यें या जातककथांचें महत्त्व फार आहे. बौद्ध भिक्षूंनीं व उपदेशकांनीं त्यांनां स्वतःला त्यांच्या श्रोत्यांस जें जें आवडलें तें तें या जातकांमध्यें एखाद्या मोठ्या पोत्यांत पुष्कह वस्तू भराव्या त्याप्रमाणें कोंबून ठेविलें आहे. याच कारणामुळें विषय व स्वरूप यांप्रमाणेंच जातकांचा विस्तारहि फार विचित्र आहे. यांमध्यें ज्यांचें छापील अर्धेंहि पृष्ठ होणार नाहीं अशा लहान लहान गोष्टींशेजारींच लांब लांब स्वतंत्र ग्रंथ होतील एवढ्या मोठ्या कथा दिलेल्या आहेत.
क ल्पि त क था.- पहिल्या प्रकरणामध्यें लहान लहान जातकें असून त्यांत कल्पित कथा आहेत. त्यांमध्यें आपणांला, पवित्र तापसाचें ढोंग करून उंदीर खाणा-या ढोंगी मांजराची गोष्ट आढळते. तशा तंत्राख्यायिक, पंचतंत्र व हितोपदेश या गोष्टींच्या पुस्तकांमध्यें आढळून येणा-या पुष्कळ कल्पित कथा आढळतात. त्याप्रमाणेंच पौरस्त्य व पाश्चात्त्य देशांमध्यें सारख्याच प्रचलित असल्यामुळें ज्यांचें मूलस्थान शोधून काढणें कठिण आहे अशाहि अनेक कल्पित कथा या ठिकाणीं आपणांला दिसून येतात. कोणी सिंह आणि बैल हे मित्र असून कोल्ह्यानें त्यांच्यामध्यें वैमनस्य आणिल्यानें त्यांनीं एकमेकांस ठार मारिलें, ही गोष्ट जातक नं. ३४९ यांत सांगितली असून ती तंत्राख्यायिक या ग्रंथांतील पहिल्या भागांत सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेंच आहे. तंत्राख्यायिकांतील चवथ्या भागांत सांगितलेली माकडानें सुसरीस फसविल्याबद्दलची गोष्ट जातकांमध्यें अनेक ठिकाणीं निरनिराळ्या प्रकारांनीं सांगितली आहे. जातक नंबर १८९ या गोष्टींतील गाढवानें इसापनीतींतल्याप्रमाणें सिंहाचें कातडें पांघरलें होतें असें सांगितलें आहे. तंत्राख्यायिकांतील गोष्टींत त्याच ठिकाणीं चित्त्याचें कातडें, व पंचतंत्र आणि हितोपदेश यांमध्यें वाघाचें कातडें दिलें आहे. दुस-या प्रसिद्ध कल्पित कथा म्हटल्या म्हणजे कोल्ह्यानें कोंबड्याच्या आवाजाची स्तुति करून भक्ष्य मिळविल्याची गोष्ट; का बैलाला डुकरास चांगलें अन्न खावयास मिळतें म्हणून प्रथम त्याचा हेवा वाटतो, परंतु त्या डुकराला केवळ कापण्याकरितां पोशीत आहेत हें त्याला मागाहून कळून येतें ही गोष्ट; का बगळ्यानें एका सुंदर तलावांत घेऊन जातों म्हणून थाप मारून माशांस एकीकडे नेऊन खाऊन टाकिलें; परंतु शेवटीं खेंकड्यानें त्याचा प्राण घेऊन त्याला प्रायश्चित दिलें ही गोष्ट; का स्वेच्छाचारी स्त्रियेच्या वर्तणुकीवर नजर ठेवण्याकरितां ठेविलेला पक्षी आपल्या अविचारामुळें प्राणास मुकतो ही गोष्ट; त्याप्रमाणेंच एका नाचणा-या मोरानें आपल्या उद्धट वर्तनामुळें आपली निश्चित वधू पक्षिराजाची कन्या गमावली, इत्यादि गोष्टी आढळतात. ही शेवटची गोष्ट ज्या अर्थी ख्रिस्तपूर्व तिस-या शतकामध्यें भरहुत येथील स्तूपावर खोदलेली आढळते, त्या अर्थी ती त्या वेळीं जातकांमध्यें असली पाहिजे. याच स्तूपावर जातक नं. ३८३ यामध्यें असलेल्या गोष्टींचें चित्र खोदलें आहे. या गोष्टींत चार पद्यांमध्यें एका मांजरानें एका कोंबड्याला त्याची बायको होण्याचें मिष दाखवून त्याला आपल्या आटोक्यांत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे, परंतु त्या कोंबड्यानें तिचें कपट ओळखून तिला हांकून दिलें आहे. यावरून तीन पद्यांमध्यें बौद्धांचें तत्त्व सांगितलें आहे. त्या मांजरीप्रमाणेंच कपटी स्त्रिया पुरुषांनां नादीं लावण्याच्या वेळीं वर्तन करतात, परंतु जसें त्या कोंबड्यानें त्या मांजराचें कांहीं चालूं दिलें नाहीं, तसेंच साधू पुरुष त्यांनां फसत नाहींत. निव्वळ बौद्धांनीं रचलेल्या कल्पित कथांपैकीं नं. २७८ ही एक आहे. हींत बोधिसत्त्व रेड्याच्या जन्मास गेला असून त्या जन्मांतहि त्यानें अतिशय शांति दाखविली आहे. एक चेष्टेखोर माकड त्याच्या पाठीवर बसून त्याच्या फार खोड्या करतें, त्याचीं शिंगें धरतें व नाना त-हेच्या चेष्टा करतें. तेंच माकड नंतर दुस-या रेड्याजवळ चेष्टां करूं लागलें असतां तो त्याचा प्राण घेतो. अशा रीतीनें - टीकेंतील गद्यांत म्हटल्याप्रमाणें बोधिसत्वाची शांति कायम राहते, परंतु त्या माकडास शिक्षा मिळते.
प्रा णि क था.- या जातक ग्रंथामध्यें आढळणा-या प्राणिविषयक गोष्टीहि कल्पित कथांप्रमाणेंच असून त्यांमध्यें कांहीं उदाहरणें दिलीं आहेत. सब्बदाठ (सर्वदंत) या कोल्ह्याच्या गोष्टीमध्यें थोडा सुरस विनोद आढळतो. त्याला सर्व चतुष्पाद जनावरांनां अंकित करण्याचा मंत्र चुकून ऐकावयास सांपडून तो त्याचा उपयोग करतो. तो गर्वानें बनारसच्या राजाशीं युद्ध करण्याचा निश्चय करतो. एका सिंहाला दोन हत्तींच्या पाठीवर उभें करून त्याच्या पाठीवर एका कोल्हीला राणी करून तिच्यासह आपण बसून मोठ्या दिमाखानें तो बनारसवर चाल करून जातों; आणि मोठ्या आढ्यतेनें त्या राजाला राज्य स्वाधीन करण्याबद्दल निरोप पाठवितो. सर्व लोक भयभीत होतात, परंतु राजाच्या उपाध्यायाच्या युक्तीमुळें (हा उपाध्याय बोधिसत्त्वच असतो) त्या कोल्ह्याच्या सर्व पशुसैन्याचा नाश होतो. नंतर बोधिसत्त्व त्या लोकांनां वेशीच्या बाहेर त्या पशूंचें मांस घेऊन जाण्याकरितां बोलावितो. (हें त्याचें बोलावणें बौद्धांच्या तत्त्वाच्या अगदीं विरुद्ध दिसतें.). तेव्हां लोकांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर येऊन ते मांस घेऊन जातात; व जें त्यांनां खातां आलें नाहीं तें वाळवून ठेवितात. याप्रमाणें त्या जातक कथेमध्यें शेवटीं सांगितलें आहे कीं, मांस वाळविण्याची चाल या वेळेपासूनच पडली.
तथापि निव्वळ प्राण्यांच्या गोष्टींपेक्षां मनुष्यें व प्राणी यांच्या मिश्र गोष्टी जास्त आहेत, व त्यांमध्यें मनुष्यापेक्षां प्राण्यांचेच स्वभाव जास्त चांगले दाखविलेले आहेत. उदाहरणार्थ, एका प्रसिद्ध विद्वानाकडून वेदांचे अध्ययन करविलेल्या शहाण्या तित्तिराची गोष्ट घ्या. त्याकडे पुष्कळ तरुण शिकण्याकरितां येतात. त्यांत वाघ, सिंह इत्यादि त्याचे मित्र असतात. त्यांनां राहण्यास सोन्याचा पिंजरा असून त्यावर एक सरडा राखण करतो. एके दिवशीं एक दुष्ट बैरागी, जो पूर्व आयुष्यामध्यें द्वारपाल, फेरीवाला, गारुडी, पारधी, दांडपट्टेवाला, फांसेपारधी, व्यापारी, जुगारी व मांगाचा हस्तक अशा प्रकारचे धंदे करणारा होता, तो त्या सरड्यास व तित्तिरास ठार मारतो; परंतु लागलीच वाघ त्याला मारून प्रायश्चित देतो. अशा त-हेच्या काल्पनिक गोष्टी सर्व जगांतील वाङ्मयांमध्यें पसरल्या असून त्यांमध्यें मनुष्याची कृतघ्नता व इतर प्राण्यांची कृतज्ञता दृष्टीस पडते.
अशा त-हेच्या गोष्टी या संग्रहांमध्यें फार आहेत. त्यांपैकीं नंबर ७३ ही फार सुंदर आहे. एकदां एका राजाला एक दुष्ट पुत्र होता. त्याचें नांव कितवराज असें होतें. तो विषारी सर्पाप्रमाणें होता. तो कोणाजवळहि चांगलें बोलत नसल्यामुळें तो सर्वांच्या मनांत सलत असे. एकदां वादळ सुटलें असतां त्याला पोहण्याची इच्छा झाली. तेव्हां लोकांनीं तो बुडून जावा म्हणून त्याला नदीवर आणिलें. परंतु तो एक सर्प, उंदीर व पोपट यांच्यासह त्या प्रवाहांतून बचावून एका झाडाच्या खोडावर बसतो. त्या चौघांनांहि एक साधु बाहेर काढून आपल्या घरी नेतो. त्यांपैकीं प्राणी अशक्त असल्यामुळें तो साधु प्रथम त्यांची शुश्रूषा करून नंतर राजपुत्राकडे वळतो; परंतु या गोष्टींचा राजपुत्राला फार राग येतो. ते तीनहि प्राणी त्या साधूचे उपकार फेडण्याचें वचन देतात. राजपुत्रहि तसेंच वचन देतो, परंतु मनांत मात्र त्या साधूचा सूड घेण्याचा विचार करतो. कांहीं दिवसांनीं त्या चौघांचीहि पराक्षा करावी असें त्या साधूच्या मनांत येतें. तेव्हां ते तीनहि प्राणी आपलें वचन पूर्ण करतात; परंतु राजपुत्र मध्यंतरी राजा झाल्यामुळें तो त्या साधूला ओळखतांच त्याला चाबूक मारण्यास हुकूम करतो, व नंतर फांशी देण्यास फर्मावतो. तो साधु चाबकाच्या प्रत्येक फटक्याबरोबर पुढील शब्द उच्चारतो : ''पुष्कळ मनुष्यांपेक्षां पाण्यानें वाहून आलेला लांकडाचा ठोकळा अधिक चांगला असतो ही म्हण अगदीं बरोबर आहे.'' लोकांनीं त्याला तूं असें कां म्हणतोस म्हणून विचारल्यावरून तो सर्व हकीकत सांगतो. तेव्हां जमलेले सर्व लोक त्या दुष्ट राजाला पकडून ठार मारतात; व त्याच्या जागीं त्या साधूला राजा नेमतात.
पुढील कृतघ्न बायकोची गोष्टहि सर्वत्र प्रचारांत आढळते. एका मनुष्यानें स्वतःचें रक्त प्यावयास देऊन आपल्या बायकोचा जीव वांचविला होता. परंतु तिचें एका कुबड्यावर मन बसतें, व सर्वस्वीं त्याच्या स्वाधीन होण्याकरितां ती आपल्या नव-यास कड्यावरून खालीं ढकलून देते. तथापि एक सरडा त्याचा जीव वांचवितो, व तो मनुष्य पुढें कांहीं चमत्कारामुळें राजा होतो. तेव्हां त्याची आणि त्याच्या कपटी स्त्रियेची व तिच्या कुबड्याची गांठ पडून तो त्यांनां शिक्षा करतो. हीच गोष्ट थोड्या फार फरकानें दशकुमारचरित्रांत 'किं क्रूरं स्त्रीहृदयं' या वचनाच्या स्पष्टीकरणार्थ आणली आहे.
एका मंत्रामुळें सर्व पशूंची भाषा अवगत झालेल्या राजाची गोष्टहि बरीच सार्वत्रिक झाली आहे. या राजाला तो मंत्र कोणालाहि सांगावयाचा नव्हता; कारण त्यामुळें त्याला मरण आलें असतें. एके दिवशीं त्याला मुंग्या आणि डांस यांच्यामधील गमतीच्या संवादामुळें हंसूं आलें. राणीनें त्याला हंसण्याचें कारण विचारलें, व तो मंत्र सांगण्याविषयीं विनवणी केली. त्या राजानें मंत्र सांगितला असतां आपणास मृत्यु येईल असें सांगितलें तरी तिचा हट्ट थांबेना. तेव्हां तो राजा तिच्या चौकसपणास बळी पडणार, इतक्यांत देवांचा राजा शक्र हा बोकडाच्या रूपानें तेथें आला; आणि त्यानें त्या राजास आपल्या राणीस खूप चोपून काढण्यास सांगितलें. त्या राजानें त्याच्या सांगण्याप्रमाणें केलें, तेव्हां राणीनें आपला हट्ट सोडला.
पुढें दिलेल्या तीन भावांच्या गोष्टीवरून जर्मन वाचकांस जर्मन भाषेंतील ''टेबला, तूं पूर्ण हो'' या नांवाच्या व इतर कल्पित कथांची आठवण झाल्यावांचून राहणार नाहीं, असें विंटरनिट्झनें म्हटलें आहे. या तीन भावापैकीं पहिल्याजवळ एक कु-हाड असून तिच्या स्पर्शाबरोबर सर्पण तयार होत असे; दुस-याजवळ एक ढोलकें असून त्यामुळें तो सर्व शत्रूंनां जिंकीत असे; तिस-या जवळ एक चरबी असून ती ओतल्याबरोबर दुधाचा प्रवाह निघत असे. अशा त-हेचीच दुसरी एका तरुणाची गोष्ट आहे. त्यानें आपली सर्व दौलत उधळून टाकली होती. त्याच्या मृत पित्यास पुढील जन्मीं इंद्रपद मिळाल्यामुळें त्यानें त्यास एक भांडें दिलें. त्यांतून त्याला पाहिजे तें मिळत असे. परंतु तें देतांना त्यानें त्याला असें बजविलें कीं, या भांड्याचें तूं चांगलें जतन कर; कारण जोंपर्यंत हें भांडें आहे तोंपर्यंतच तुला विपुल द्रव्य मिळेल. एके दिवशीं मद्याच्या धुंदीमध्यें तो मुलगा तें भाडें वर फेकून झेलूं लागला. असे करतां करतां तें जमिनीवर पडून फुटून गेलें. तेव्हांपासून त्याच्या वैभवास उतरती कळा लागली; व पुढें त्याला इतकी गरिबी आली कीं, तो अखेरीस भिका-याप्रमाणें चिंध्या पांघरलेला असा एका भिंतीशीं टेकून बसला असतां मरण पावला.
जरी पुष्कळ कल्पित कथा भरतखंडांतून पाश्चात्त्य देशांत गेल्या, तरी इतर देशांतूनहि कांहीं गोष्टी हिंदुस्थानामध्यें आल्या असल्या पाहिजेत असें विंटरनिट्झ म्हणतो. पुढें दिलेली गोष्ट, विशेषतः खलाशांच्या गोष्टींमध्यें जी गलबतें फुटल्याचीं व इतर दर्यावरील साहसांचीं वर्णनें आहेत त्यांमध्यें आढळून येते. फुटलेल्या गलबतांतील खलाशांस यक्षिणी प्रथम फुसलावून नेऊन आरंभीं त्यांच्यावर प्रेम करतात, व अखेरीस त्यांनां मारून खातात. या गोष्टीवरून यूरोपीय वाचकांस सायरेन या जलदेवतांची व सर्स आणि कॅलिप्सो यांच्यासारख्या प्राण्यांची आठवण होते.
मित्तविंदक जातकामध्यें काल्पनिक कथा व नीतिकथा यांचें मिश्रण आढळतें. या गोष्टींत नायक दर्यावरील अनेक साहसांतून पार पडतो. तो महासागरांतील बेटामध्यें असणा-या भव्य प्रासादांत यक्षिणीशीं विलास करतो; व शेवटीं, एका ठिकाणीं सांगितल्याप्रमाणें त्याच्या अतितृष्णेमुळें, किंवा दुस-या ठिकाणीं सांगितल्याप्रमाणें आपल्या आईला त्रास दिल्यामुळें तो नरकांत जातो. तेथें तीक्ष्ण पातीं असलेलें एक चक्र त्याच्या डोक्यावर सतत भ्रमण करीत रहातें.
ह्याप्रमाणेंच नरमांसभक्षक लोकांच्या काल्पनिक कथांमध्यें प्रचलित काल्पनिक कथांप्रमाणेंच नैतिक कथांचेंहि स्वरूप आढळतें. या नरमांसभक्षक लोकांच्या काल्पनिक कथांमध्यें शिवलीलामृतांत उल्लेखिलेल्या कल्माषपाद राजाचा संबंध येतो. ब्राह्मणी कथांमध्यें हा कल्माषपाद शापामुळें राक्षस झाला होता असें वर्णन आढळतें. परंतु पुढें दिलेल्या प्रसंगामध्यें या बौद्ध कथेंतील रहस्यांची परमावधि झालेली दिसते. तो प्रसंग असा : सुतसोभ ह्या नांवाचा एक सात्विक राजा त्या राक्षसाच्या तडाख्यांत सांपडतो; परंतु एका ब्राह्मणास दिलेलें वचन पुरें करण्याकरितां तो राक्षस त्यास जाऊं देतो. तो राजा आपल्या वचनाप्रमाणें त्या राक्षसाकडे पुन्हां परत येतो. ही त्या राजाची सत्याबद्दलची प्रीति पाहून त्या राक्षसाच्या अंतःकरणास चटका बसतो व तो बौद्ध होतो.
या कल्पित कथांमध्यें नाग, गरुड, यक्ष, किन्नर वगैरे सर्व आढळतात. कांहीं जातकांतून ब-याच मोठाल्या कल्पित कथा आहेत. जातक नं. ५०४ यामध्यें एका किन्नर मिथुनानें त्यांचा एक रात्र वियोग झाल्यामुळें शोक केल्याचें वर्णन आहे. नं. ४८५ मध्यें अशी गोष्ट आहे कीं, एका किन्नर स्त्रीचा पति एका राजानें बाणानें मारिल्यामुळें तिनें इतका शोक केला कीं, तिला अमृताची प्राप्ति होऊन तिनें आपल्या पतीस उठविलें. या दोन गोष्टी भावपूर्ण व नाट्यमय अशा काल्पनिक कथा असून त्यांमध्यें भावाचा परिपोष चांगला झालेला दिसतो. या गद्य व गद्यमिश्रित पद्य काल्पनिक कथांमध्यें जातक नं. ४३२ ही बरीच मोठी गोष्ट आहे. या गोष्टींत बोधिसत्त्व एका अश्वमुखी नरभक्षक यक्षिणीच्या पोटीं जन्मास आल्याची कथा आहे. जातक नं. ५४३ याचीं आठ प्रकरणें असल्यामुळें त्याला एक स्वतंत्र ग्रंथच म्हणतां येईल. ही एक गद्यपद्यमिश्रित लांबलचक गोष्ट आहे. तीमध्यें नाग लोक व गरुड लोक यांचें वर्णन असून, त्यामध्यें प्रचलित काल्पनिक कथांतील अनेक प्रसंगांचें व बौद्धसांप्रदायिक तत्त्वांचें मिश्रण केलेलें आहे. विधुरपंडित जातक हें सहा खंडांचें एक महाकाव्यच आहे. त्यामध्यें कुरु राजाचा मंत्री विधुर याचें चरित्र आहे. या विधुराचा जातकामध्यें अनेक ठिकाणीं संबंध आलेला आहे. हा विधुर हा दुसरा कोणी नसून महाभारतामध्यें वर्णन केलेल्या धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ व त्याला चांगली सल्ला देणारा विदुरच होय. त्याला अनेक कल्पित कथा, दृष्टांत व सुभाषितें माहीत होतीं असें म्हटलें आहे. या नांवाच्या उल्लेखावरून व या जातकामध्यें केलेल्या अक्षक्रीडेच्या हुबेहूब वर्णनावरून, या जातकाचा महाभारताशीं कांहीं तरी संबंध असावा असें वाटतें, व या दृष्टीनें हें जातक विशेष महत्त्वाचें आहे. त्याप्रमाणेंच काल्पनिक कथा व काव्य या दृष्टीनेंहि त्याचें अंगभूत महत्त्व कमी नाहीं.
वि नो द प र क था.- आतांपर्यंत वर्णन केलेल्या कल्पित कथा व अद्भुत कथा, व यांपेक्षांहि या जातक ग्रंथांत आढळणारीं अनेक लहान लहान व अनेक प्रसंगीं गमतीचीं अशीं कथानकें यांचा बौद्ध संप्रदायाशीं मूळचा कांहीं एक संबंध दिसत नाहीं. ज्याप्रमाणें सध्यां आपणांला मूर्खपणाच्या चेष्टांचे हंसूं येतें, त्याप्रमाणें पूर्वीच्या लोकांनांहि मूर्खपणाच्या गोष्टींचें हंसूं येत असे. हें पुढें दिलेल्या गोष्टीवरून दिसून येईल. एका मुलानें आपल्या निजलेल्या बापाच्या डोक्यावरील डांसास मारण्याकरितां इतक्या जोरानें प्रहार केला कीं, त्याच्या बापाचे डोकें फूटून गेलें. अशा प्रकारची एक माकडाची गोष्ट थोड्या फार फरकानें पंचतंत्रांतहि आली आहे. तसेंच कांहीं माकडांनां झाडांस पाणी घालावयास सांगितल्यावरून त्यांनीं प्रत्येक झाड उपटून पाहून कोणत्या झाडास पाणी कमी लागतें व कोणत्यास जास्त लागतें तें ठरविलें. या गोष्टींतील मूर्खपणाचें काम पुरोहित व भिक्षू यांच्याकडेहि दिल्याचें प्रसंग थोडे नाहींत. उदाहरणार्थ पुढील गोष्ट पहा. दोन एडक्यांची टक्कर चालली आहे इतक्यांत एक ब्राह्मण भिक्षु भिक्षा मागण्याकरितां येतो. त्यांपैकीं एका एडक्यास मागें उडी मारतांना पाहून त्याची अशी कल्पना होते कीं, त्या एडक्याला कसें वागावें हें चांगलें समजतें; व तो आपणांला मान देण्याकरितांच मागें सरला. त्याला एका वाण्याने सांगितलें कीं, तो फक्त पुन्हां टक्कर मारण्याकरितां मागें जात आहे. इतक्यांत तो एडका हि धांवत धांवत पुढें येतो, व त्या भिक्षूला धडक मारून खालीं पाडतो. तेव्हां तो मोठ्यानें धांवा धांवा, एक साधु मरत आहे असें ओरडतो. महापिंगल या दुष्ट राजाच्या गोष्टींतहि थोडासा शोकरसपूर्ण विनोद आहे (नं. २४०). हा राजा फार दुष्ट होता. तो जेव्हां मरण पावला तेव्हां सर्व बनारस शहराला आनंद झाला, परंतु एक द्वारपाल मात्र शोक करूं लागला. बोधिसत्त्वानें त्याला शोकाचें कारण विचारिलें असतां तो उत्तर करतो : 'मला महापिंगल मेला म्हणून दुःख होत नाहीं; कारण तो राजवाड्यांतून खालीं येतांना व वर जातांना प्रत्येक वेळी मला घणाप्रमाणें डोक्यावर आठ तडाखे मारीत असे. पण मला अशी भीति वाटते कीं, तो यमलोकीं गेल्यावर तेथें यमालाहि असेंच करील, आणि त्याला यम पुन्हां पृथ्वीवर धाडील. मग मला पुन्हां पहिल्यासारखे तडाखे मिळूं लागतील, म्हणून मी रडत आहे.' बोधिसत्त्वानें त्याचें शांतवन करून म्हटलें कीं, मेलेला मनुष्य परत येणार नाहीं. त्याला पार जाळून टाकिलें आहे. त्याची चिता विझवून टाकिली आहे, व भोंवतालची जमीनहि साफ केली आहे.
पुढील गोष्टींत व्याजोक्तीचा चांगला मासला पहावयास सांपडतो. एक माकड कांहीं कालपर्यंत एका राजाजवळ असून पुढें तें त्यानें सोडून दिलें. तें आपल्या सोबत्यांत गेलें तेव्हां त्यांनीं त्याला विचारिलें : 'तूं मनुष्यें कशीं वागतात हें इतके दिवस पाहिलें असशील; तेव्हां त्याचें वर्णन करून आम्हांला सांग' नंतर तें माकड पुढील अर्थाच्या दोन पद्यांमध्यें मनुष्याच्या चरित्राचें वर्णन करतें.
'मनुष्यें रात्रंदिवस सोनें माझें, जिंदगी झाली, अस ओरडत असतात. मनुष्यांनां त्यांच्या वेडामध्यें सत्य काय तें कळत नाहीं. प्रत्येक घरांत दोन धनी असतात. त्यांपैकीं एकाला दाढी नसते, परंतु लोंबणारे स्तन व लांब वेणी असून कानांत मोठालीं सुंकलीं असतात. त्याला पुष्कळ द्रव्य देऊन विकत घेतात, तरी तो सर्वांनां त्रास देतो.'
हे ऐकून ती सर्व माकडे पुढें कांहीं एक ऐकण्याची इच्छा न करतां कानांवर हात ठेवून पळून जातात (जातक नं. २१९).
ग्री क वा ङ्म यां त आ ढ ळ णा री गो ष्ट.- पुढील गोष्ट, तिचा ग्रीक वाङ्मयाशीं संबंध असल्यामुळें महत्त्वाची आहे. एका स्त्रीचा नवरा, पुत्र व भाऊ अशा तिघांनां फांशी द्यावयाचे होतें. राजानें त्यांपैकीं एकाचा जीव तिला माफ केला. तेव्हां तिनें आपल्या भावाची निवड केली. याचे कारण तिनें असें दिलें कीं, तिला दुसरा नवरा सहज करतां येईल, किंवा त्याप्रमाणेंच तिला पुत्रहि होऊं शकेल; परंतु भाऊ केव्हांहि मिळणार नाहीं. हीच गोष्ट हिरोडोटस यानें इंटाफरनीझ याच्या बायकोविषयीं सांगितली आहे; आणि तेथेंहि साफोक्लीझ या राजाला अँटिगोनी हिनें असेंच उत्तर दिलें आहे. हीच कल्पना रामायणामध्यें 'सख्या भावापेक्षां जगांतील दुसरी कोणतीहि वस्तु सहज मिळूं शकते' असें जें एक जुनें सुभाषित आले आहे त्यामध्येंहि आढळून येते. यावरून ही गोष्ट हिंदुस्थान व ग्रीस या दोनहि देशांमध्यें फार प्राचीन कालापासून चालत आली असावी असें दिसते. परंतु तिजमध्यें भारतीय अथवा ग्रीक असे विशेष कांहीं नसल्यामुळें ती मूळ कोठून निघाली हे निश्चित करणें कठिण आहे. तथापि ती दोन ठिकाणीं स्वतंत्र रीतीनें उत्पन्न झाली नसावी हे निश्चित आहे, असें बिचा-या विंटरनिट्झला वाटतें !
चा तु र्या च्या गो ष्टी.- लोकांनां मूर्खाच्या नकलांप्रमाणेंच आवडणा-या व त्यांच्याप्रमाणें सर्व देशांच्या वाङ्मयांमध्यें आढळून येणा-या ज्या चातुर्याच्या गोष्टी असतात, त्यांच्या वर्गांत या वरील गोष्टी मोडतात. या चातुर्यकथांध्यें अतिशय बुद्धिमत्ता व कौशल्य दर्शविणा-या गोष्टी व प्रश्नोत्तरें - विशेषतः कोडीं व त्यांचीं उत्तरें - कांहीं कठिण कूटांचीं चातुर्यदर्शक उत्तरें, कांहीं शहाणपणाचे निवाडे, अथवा कांहीं आश्चर्यकारक कलाकौशल्याची कामें इ. प्रकार आढळतात. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी जातक कथांमध्यें आढळून येतात, व त्यांपैकीं पुष्कळ सार्वदेशीय वाङ्मयामध्यें दिसतात. अशा त-हेची सॉलोमनप्रमाणे शहाणपणाचे निवाडे देणा-या एका न्यायाधीशाचा गोष्ट आहे. ती अशी : एका मनुष्याकडून चुकून एका घोड्याचा पाय मोडला, व तसाच एका गरोदर स्त्रीचा गर्भपातहि झाला. अशाच आणखीहि कांहीं गोष्टी त्या मनुष्याच्या हातून त्याचा कोणत्याहि प्रकारें वाईट हेतु नसतां घडल्या होत्या. अशा स्थितींत त्या न्यायाधिशानें एकंदर वस्तुस्थिति लक्षांत घेऊन त्या इसमास निर्दोष ठरून सोडून दिलें. त्याचप्रमाणें त्यानें त्याला अनेक प्राणी व मनुष्यें यांनीं विचारलेल्या कित्येक कोड्यांचीं समर्पक उत्तरेंहि दिलीं.
एका हरकामी कारागिरीबद्दल कुसजातक (नं. ५३१) यामध्यें एक गोष्ट सांगितली आहे. कुस हा ओक्काक राजाचा पुत्र असून अतिशय हुशार व शहाणा परंतु तितकाच कुरूप होता. त्याला लग्न करण्याची इच्छा झाली असतां त्यानें एक सोन्याची स्त्रीची प्रतिमा करून सांगितलें कीं, या सुवर्णप्रतिमेप्रमाणें जी सुंदर असेल तिच्याशीं मी लग्न करीन. ती प्रतिमा गांवोगांव पाठविण्यांत आली, व अखेरीस मद्द देशाच्या राजाची कन्या प्रभावती ही त्या प्रतिमेप्रमाणें सुंदर असल्याचें आढळून येऊन तिचें कुस याजबरोबर लग्न लागलें. तो राजपुत्र कुरूप असल्यामुळें त्याच्या आईनें लग्नसमयीं अशी अट घातली कीं, प्रथम गर्भधारणेपर्यंत त्या जोडप्याची भेट फक्त रात्रींच व्हावी. परंतु त्यांनां एकमेकांस पाहण्याची जिज्ञासा आवरून धरितां न आल्यामुळें त्यांनीं अनेक युक्त्या योजून सरते शेवटीं एकमेकांस अवलोकन केलें. त्याचा परिणाम असा झाला कीं, त्या राजकन्येला असला कुरूप नवरा न आवडून ती आपल्या पित्याकडे रहावयास गेली. इकडे कुस याला आपल्या पत्नीचा ध्यास लागून त्यानें तिला कसेंहि करून परत आणण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणें तो ती राजकन्या जेथें रहात होती त्या सागल गांवीं गेला, व तेथें त्यानें तेथील राजाची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न चालविला. प्रथम त्याने एका सारंगीवर सुंदर पद्यें वाजविण्याचें काम केलें; नंतर कुंभार होऊन कांहीं अत्त्युत्तम चित्रें तयार केलीं; पुढें बुरूड होऊन कांहीं बहुमोल पंखे विणले; पुन्हां माळी होऊन एक सुंदर हार तयार केला; व शेवटीं आचारी होऊन त्यानें एक असा पदार्थ तयार केला कीं, त्याचा घमघमाट सर्व शहरांत पसरला. त्यानें प्रत्येक वेळीं राजकन्येची गांठ घेतली, परंतु तिनें त्याचा तिरस्कार करून प्रत्येक वेळीं त्याला धुडकावून लाविलें. नंतर सक्क (इंद्र) यानें सात राजांनां प्रभावतीला मागणी घालण्याकरितां पाठविलें. तेव्हां राजाला काळजी पडली कीं, जर त्यानें त्यांपैकीं एकाला आपली मुलगी दिली, तर बाकीचे सर्व त्याच्या विरुद्ध उठतील. त्यानें आपल्या मुलीस सांगितलें कीं, मी आतां तुझें सात तुकडे करून एक एक त्या राजांस वांटून देतों. हें ऐकतांच राजकन्येची पांचावर धारण बसून ती राजवाड्यांत आचारी म्हणून राहिलेल्या कुस राजपुत्राकडे गेली, व तेथेंच त्या स्वयंपाक घरामध्यें तिनें त्याला साष्टांग नमस्कार घातला. कुस हा इतका वेळ जो कारागीर म्हणून होता, तो आतां एकदम योद्धा बनला, व त्यानें त्या सर्वांचा पराजय करून त्यांस कैद केलें. परंतु कुस हा जसा बुद्धिमान होता, तसाच दयाळूहि होता. त्यानें त्या राजाच्या दुस-या सात कुमारिका होत्या, त्यांबरोबर त्या सात राजांचीं लग्नें लावून दिली, आणि आपण स्वतः प्रभावतीस घेऊन परत आल्या शहरीं गेला. प्रस्तुत कथेवरून व नलदमयंती आख्यानावरून त्यक्त पतिकांचे पुनर्विवाह राजघराण्यांतहि होत असत अशी कल्पना होते.
दुस-या एका लहान गोष्टीमध्यें बोधिसत्त्व लोहाराच्या जन्मांस असल्याचे वर्णन आहे. तेथें असतांना त्यानें अतिशय कुशलतेनें सूक्ष्म डबींत घातलेल्या अशा कांहीं सुया तयार केल्या कीं, इतर लोहारांनां त्या डब्याच सुयांसारख्या वाटल्या. या आपल्या कौशल्यानें त्यानें एका लोहाराचा मुलगी आपणास बायको मिळविली.
म हा उ म्म ग जा त क.- महाउम्मगजातक (नं. ५४६) यामध्यें तर अशा त-हेच्या विलक्षण चातुर्याच्या व कौशल्याच्या गोष्टींचा संग्रहच आहे. हें एक मोठें अद्भुत कथानक असून त्यामध्यें अनेक लहान लहान गोष्टी, कूट प्रश्न व आख्यायिका यांचा भरणा आहे. अशा त-हेच्या गोष्टीचे ग्रंथ आपणांला अद्यापहि हिंदुस्थानांत आढळतात; व त्यांचें अरबी भाषेतल्या गोष्टींतील अहिकार याच्या शहाणपणाच्या गोष्टीशी व प्लन्युडस याच्या इसापचरित्राशीं साम्य असल्यामुळें हे जातक आपणांस विशेष महत्त्वाचें आहे. या जातकांतील नायक महोसध हा आहे. तो लहानपणींच आपल्या शहाणपणाचा व पुढें आपण फार हुशार न्यायाधीश होणार या गोष्टीचा प्रत्यय दाखवितो. सॉलोमन राजाप्रमाणें हाहि एका मुलाबद्दल भांडणा-या दोन बायकांचा तंटा मातृप्रेमाची कसोटी लावून तोडतो. तो जमिनीवर एक रेघ ओढून तीवर त्या मुलास आडवे ठेवतो, व दोन्ही स्त्रियांस एकानें हात व एकाने पाय याप्रमाणे धरून दोन्ही बाजूंस ओढावयास सांगतो. जा त्या मुलास आपणांकडे त्या रेघेच्या अलीकडे ओढून घेईल तिचें ते मूल होईल असें तो ठरवितो. त्या ओढू लागतांच ते मूल रडूं लागतें, व त्याबरोबर त्याची खरी आई त्यास सोडून देते. अशा रीतीनें या तंट्याचा निकाल लागतो.
राजानें कोणतेहि कोडे अथवा कूट प्रश्न घातला तरी महोसध याजवळ त्याचे उत्तर तयार असे. तो एक काठी पाण्यांत टाकून व तिची कोणती बाजू जड आहे ते पाहून, ज्या झाडापासून ती काठी केली होती त्याचा बुंधा कोणत्या बाजूस होता व शेंडा कोणत्या बाजूस होता हें ठरवितो. त्याप्रमाणेंच एखाद्या अलीकडील मानववंशशास्त्रवेत्त्याप्रमाणें दोन कवट्यांवरील रेषांचे निरीक्षण करून त्यांपैकीं पुरुषाची कोणती व स्त्रीची कोणती हें ठरवितो. त्याला सर्प कोणता व सर्पीण कोणती हें ओळखतां येतें. एकदां राजानें पायांवर शिंगे असलेला, डोक्यावर वशिंड असलेला, व तीन वेळ आवाज करून नंतर ओरडणारा असा पांढरा बैल मागितला असतां, त्याला पांढरा कोंबडा पाहिजे आहे हें महोसध याखेरीज कोणालाहि ओळखतां येत नाहीं. एकदां राजानें अशा त-हेचा भात शिजवून मागितला कीं, तो तांदूळ, पाणी, भांडे, विस्तव अगर सर्पण यांच्याखेरीज शिजवला गेला पाहिजे; व तो पुरुष अगर स्त्री यांच्याखेरीज कोणी तरी आणून दिला पाहिजे. परंतु महोसध हेंहि करून दाखवितो. एकदां राजानें गोफणीकरितां वाळूची दोरी मागितली असतां महासंघ तीहि आणून देण्याचे कबूल करतो. मात्र नमुन्याकरितां जुन्या गोफणीच्या वाळूच्या दोरीचा तुकडा मागतो. त्याला सरड्यासारख्या प्राण्यांचे विचारहि कळत असत. तो आपल्या शहाणपणामुळें राजाचा मंत्री होतो, व आपल्याकरितां स्वतःप्रमाणें सर्व कूट प्रश्नांचीं उत्तरें देणा-या अतिशय चतुर पत्नीची निवड करतो. तिच्यामुळें इतर मंत्री महोसध याचा हेवा करतात. परंतु ती मोठ्या चातुर्यानें त्यांनीं आणिलेल्या संकटांतून पार पडून त्यांनां वाटेस लावते. महोसध हा बाहेरील शत्रूंशीं युद्ध करण्याच्या कामीं सल्ला देण्यामध्येंहि अतिशय चातुर्य प्रगट करतो. त्याचप्रमाणें तो शिल्प कामांतहि फार कौशल्य दाखवितो. त्यानें बांधलेल्या विवराचें वर्णन वाचून आपणांला अजिंठा येथील लेण्यांची आठवण होते. हें अद्भुत कथानक म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच असून त्याच्या शेवटीं महोसध - हा अर्थात् बोधिसत्त्वच होता - याची स्तुति केली आहे. या सर्व गोष्टीमध्यें महोसध हा बोधिसत्त्व असल्यामुळेंच इतका हुषार व चतुर होता, या एका मुद्दयाखेरीज बौद्धसांप्रदायिक असें कांहीं एक आढळत नाहीं.
सं प्र दा या शीं सं बं ध न स ले ल्या गो ष्टी.- याप्रमाणेंच जातक ग्रंथामध्यें आढळणा-या चोरांच्या वगैरे गोष्टींमध्ये बौद्धसांप्रदायिक असा भाग क्वचितच आढळतो. या गोष्टींत दरवडेखोर, उनाड लोक, जुगारी, वेश्या वगैरे मुख्य पात्रे असतात. या सर्व गोष्टी संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाच्या आहेत. बोधिसत्त्व स्वतः दोनदां दरवडेखोराच्या रूपांत आढळतो. यांपैकीं एका गोष्टीचे तात्पर्य असें : एका ब्राह्मणाने मंत्राच्या योगानें रत्नांचा पाऊस पाडला, व तो रत्नें गोळा करण्याकरितां चोरांच्या दोन टोळ्या आपसांत लढूं लागल्या; शेवटीं त्यांपैकीं दोघेजण शिल्लक राहिले, पण ते दोघेहि एकट्यालाच सर्व द्रव्य मिळावें या हेतूनें एकमेकांशीं लढून मरण पावले. ही गोष्ट चॉसर याच्या फेरीवाल्याच्या गोष्टीतील चोरांच्या गोष्टीप्रमाणेंच आहे.
स्त्रि यां च्या क प टी स्व भा वा वि ष यीं गो ष्टी.- स्त्रियांच्या कपटी स्वभावाविषयीं अनेक गोष्टी आहेत. हा विषय सर्व भरतखंडांतील गोष्टींनां जणूं काय पुरून उरलेलाच दिसतो. जातक नंबर ६१ ते ६६ यांमध्यें अशा त-हेच्या गोष्टीची एक मालिकाच दिली आहे. त्याप्रमाणेंच जातक नं. ५३६ मध्ये असल्या गोष्टींचा व त्यांच्याविषयीं वचनांच्या एक मोठा संग्रह एकाच कथानकांत गुंतवून दिलेला आहे. थोडथोड्या फरकानें व नवीन नवीन खुबीदार गोष्टी रचून असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे कीं, स्त्रियांची नेहमीं व्यभिचाराकडे प्रवृत्ति असते, मात्र त्यांनां कोणी तरी मोह पाडणारा भेटला पाहिजे. अशा प्रकारची एका ब्राह्मणाची फारच खुबीदार गोष्ट आहे त्या ब्राह्मणाने आपल्या मनाची खात्री करण्याकरितां एका मुलीला जनमापासून आपल्या घरीं वाढविलें, व पुढें ती मोठी झाल्यावर तिच्याशीं लग्न लाविलें. त्यानें तिला पांच तटांच्या आंत पहा-यांत ठेविलें होतें तरी अखेरीस तिनें त्याला फसविलें. तथापि तिनें आपली गैरवर्तणूक कबूल केली नाहीं; इतकेंच नवहे तर आपलें पातिव्रत्य सिद्ध करण्याकरितां दिव्य करतांना लबाडी करून आपलें म्हणणें खरेंहि करून दाखविलें. अशा त-हेच्या गोष्टी भारतवर्षामध्यें सर्वकाल लोकांच्या अतिशय आवडीच्या असत; व त्यांनां थोडेंसे बौद्धसांप्रदायिक वळण देऊन बौद्ध प्रवचनांमध्यें घालण्याचें काम फारसें कठिण नव्हतें. कारण, अशा गोष्टींपासून स्त्रियांसंबंधानें वारंवार तिरस्कार दाखविणा-या बौद्धसांप्रदायिकांनां प्रत्येक स्त्री ही पुरुषाला कशी जाळ्याप्रमाणें बंधनकारक व भयप्रद आहे, व तिच्या मोहापासून मनुष्यानें आपलें काळजीपूर्वक रक्षण कसें केलें पाहिजे हें चांगलें दाखवितां येत असे. अशा रीतीनें या गोष्टीमुळें भिक्षूंच्या जात्याला जणू काय अधिक वैरणच मिळत असे.
नी ति प र क था.- कांहीं ठिकाणीं असल्या अश्लील गोष्टीनंतर जातक ग्रंथांतील नीतिपर कथांस आरंभ होतो. जातक नं. ५२७ ही एक कथागीतासारखी बरींच नीतिपर कथा आहे. तींतील प्रसंग इतके नाट्यमय आहेत कीं, एखाद्याला तें लहानसें नाटकच वाटेल. एका राजाच्या दृष्टीस त्याचा सेनापति अहिपारक याची अतिशय लावण्यवती स्त्री पडली, व त्यामुळें त्याला तिच्याबद्दल अतिशय कामवासना उत्पन्न झाली. परंतु ती दुस-याची स्त्री असल्यानें आपणाला दुष्प्राप्य आहे असें त्याला लवकरच कळून आलें; तेव्हां त्यानें आपली दुःखकहाणी मोठ्या शोकाकुल अंतःकरणानें अहिपारक यास सांगितली. अहिपारक याने ते ऐकून व राजाच्या प्रकृतीची धास्ती वाटून, जरी तो आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम करीत असे तरी, तिला तो राजाच्या स्वाधीन करण्यास तयार झाला. परंतु राजानें ते पातक करण्याचें साफ नाकारलें. अशा रीतीनें एका अतिशय उत्कृष्ट व नाट्यमय अशा संवादामध्यें तो राजा आणि सेनापति यांनीं औदार्यामध्यें एकमेकांहून थोरपणा दाखविल्याचें वर्णन आहे. सरते शेवटीं सदगुणाचा जय होतो व राजा सर्वसंगपरित्याग करतो. राजास कामार्ततेनें, सेनापतीस स्वामिनिष्ठेनें आणि सेनापतीच्या पत्नीस अग्निप्रवेशाने मृत्यु आणून हीच कथा वेतालपंचविशींत पुनरुद्धृत केली आहे.
कांहीं नीतिपर कथा त्याप्रमाणेंच कांहीं कल्पित गोष्टी यांमध्यें शिक्षण देण्याचा हेतु स्पष्ट दिसत असून त्या लहान मुलांकरितांच रचलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, नं. ४८४ मध्यें बोधिसत्त्व एका शहाण्या पोपटाच्या रूपामध्यें आढळतो. तो शेतामध्यें स्वतः तांदूळ खातो, व कांहीं चोचींत धरून घरीं नेतो. असें करण्याचें कारण विचारिले असतां तो उत्तर करतो कीं, मी ॠण फेडतो, कर्ज देतो व संचय करतो. त्याचा अर्थ असा कीं, तो घरीं आपल्या मातापितरांस अन्न नेत असे, पिलांस पोशीत असे व इतर अशक्त पक्ष्यांस खावयास देत असे.
'शांतवन कथा' ह्याहि एक प्रकारच्या नीतिपर कथाच आहेत. अशा प्रकारच्या थोड्या गोष्टी आपणांला महाभारतामध्यें आढळतात. यांपैकीं दोन गोष्टींतील विषय पुढें दिला आहे (नं. ३५२).
एका मनुष्याला पितृवियोगाचा शोक आवरेना. तेव्हां त्याचा मुलगा एका गाईपुढें उभा राहून तिला चारा व पाणी देतो, आणि तोंडानें म्हणतो कीं, या ठिकाणीं निदान डोके, पाय, शेपटी वगैरे अवयव आहेत तेव्हां ही गाय पुन्हां उभी राहूं शकेल; परंतु माझ्या आजोबाचे डोकें, हात, पाय वगैरे कांहीच शिल्लक नसतां तुम्ही त्याच्या समाधीजवळ उभे राहून एकसारखे विलाप करीत आहोत, तेव्हां तुमची बुद्धि नष्ट झाली आहे असे दिसते. ते ऐकून बापानें आपला शोक थांबविला.
नं. ४५५ मध्यें कृष्ण (कण्ह) हा आपल्या पुत्राच्या मरणाबद्दल अतिशय शोक करीत आहे असें दाखविलें आहे. त्या वेळीं त्याचा भाऊ घट हा वेड्याचें सोंग घेऊन रस्त्यांतून मला ससा पाहिजे म्हणून ओरडत सुटला. कृष्णानें त्याला काय पाहिजे म्हणून विचारिलें तेव्हां मला चंद्रांतील ससा पाहिजे असें घटानें उत्तर केलें. तूं मागितलेली वस्तु मिळणें अशक्य आहे असें कृष्णानें त्याला समजावून सांगितलें. तेव्हां घट म्हणाला कीं, तर मग पुष्कळ दिवसांपूर्वीं मृत झालेला पुत्र परत येणें अशक्य असून तूंहि त्याच्याबद्दल व्यर्थ शोक कां करीत आहेस ? हे शब्द ऐकून कृष्णानें आपलें दुःख टाकून दिलें.
मृतांच्या वियोगापासून होणा-या दुःखाचें शांतवन करणें हें जे वरील गोष्टीचे काय तेंच दसरथ जातक (४६१) यांतील रामाच्या श्लोकांनीं होतें. हें जातक प्राचीन कालीं प्रचलित असलेल्या एखाद्या रामाच्या पोवाड्यावरून घेतलें असावें.
सुभाषितांचा संग्रह.- उपर्युक्त जातकावरील गद्य टीका सोडून दिली, तर यांमध्यें कथानक मुळींच नसून कांहीं सुभाषितपर श्लोक मात्र राहतात. त्याप्रमाणेंच जातक नं. ५१२ हाहि एक सुभाषितांचा संग्रह आहे. जरी त्यामधील गद्यामध्यें मद्याच्या व्यसनाचा आरंभ कसा झाला याबद्दल गोष्ट दिली आहे, तरी तो एखाद्या अज्ञ टीकाकारानें पदरचीच घालून दिल्याप्रमाणें दिसते. यांपैकीं मादक पेय पिण्यापासून होणारे भयंकर परिणाम एका राजाच्या मनावर ठसविण्याकरितां त्यांचें ज्या सुभाषितांतून वर्णन केलेलें आहे, तीं मात्र फार जुनीं असावींत. या सुभाषितांस सून कोणत्याहि मद्यनिषेधवास आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं. परंतु या पद्यांच्या शेवटीं 'तेव्हां एक शिसा भरून ती दारू विकत घेईन' अशा अर्थाचे जें उपरोधिक पालुपद आहे, तें एखाद्या जुन्या दारूबाजाच्या लावणींतून घेतलें असावें.
या बोधपर काव्यामध्येंच कुरु देशचा राजा युधिठ्ठिल (युधिष्ठिर) आणि त्याचा सुज्ञ मंत्री विदुर यांमध्यें खरा ब्राह्मण कोण याबद्दल झालेला संवाद मोडतो. हा संवाद वस्तुतः सुत्तनिपातामध्यें शोभला असता. टीकाकाराने महामंगल जातक (नं. ४५३) याचा संबंध मंगलसुत्ताशीं जोडला आहे. परंतु वास्तविक पाहिलें असतां त्या संग्रहामधील सुभाषितांमध्यें कोणतें श्रेष्ठ मंगल आहे याचें उत्तर नसून, सुख कशांत आहे याचेंच उत्तर दिलेलें आहे. या सर्व सुभाषितांचें स्वरूपहि बौद्ध नसून त्यांत ब्राह्मणी जीवितध्येयाचेंच वर्णन आहे. त्याप्रमाणेंच नं. ४७३ या जातकामध्यें खरा मित्र कसा ओळखावा याबद्दल जीं सुभाषिते आहेत तींहि मूळचीं बौद्ध नसून उलट संस्कृत बोधपर लघु काव्यासारखीं आहेत.
इ ति हा स सं वा द.- जातक ग्रंथांतील व विशेषतः त्याच्या शेवटल्या पुस्तकांतील बराचसा भाग परंपरागत कथांनीं भरलेला आहे. यांपैकीं बहुतेक, कांहीं कांहीं उपनिषदांतल्याप्रमाणें - विशेषतः महाभारतांतील इतिहाससंवादाप्रमाणें - केवळ विशिष्ट वचनांनां अनुरूप असे कथाभाग बसवून तयार केलेला आहे. जातक नं. ५४४ मधील अतिशय मनोरंजक संवाद अशा प्रकारचाच असून त्यांतील कांहीं भागाचा उतारा पुढें दिला आहे:-
विदेह देशाचा राजा अंगति हा आपल्या तीन मंत्र्यांनां बोलावून त्यांचा सल्ला विचारतो. त्यांच्यापैकीं सेनापति अलात हा युद्ध करावें असें सांगतों; सुनाम हा सांगतो कीं, युद्ध करण्याची कांहीं जरूर नसून नृत्य गीतादि करून सुखांत असावें; आणि तिसरा विजय याचें म्हणणें असें कीं, एखाद्या सात्त्विक साधूचें अथवा ब्रह्मणाचें प्रवचन ऐकावें. अलात याच्या सांगण्यावरून राजा गुण नामक एका नग्न साधूस बोलावितो. हा साधु पुढें दिल्याप्रमाणें कांहीं जडवादांतील तत्त्वांचें प्रतिपादन करतो. 'कर्माचें अस्तित्व नाहीं. पूर्वज, मातापिता, गुरु वगैरे सर्व झूट आहे. सर्व प्राणी सारखे असून त्यांचें भवितव्य ठरलेलें आहे. दानधर्म करण्यापासून कांहीं फायदा नाहीं. इह लोकांतील कृत्यांबद्दल परलोकामध्यें चांगलें अगर वाईट फळ मिळतें या म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं.' अलात याचें मत या तत्त्वांप्रमाणेंच असून तो म्हणतो : 'मला माझ्या पूर्वजन्मांचें स्मरण आहे. मी खाटीक, शिकारी वगैरे अनेक जन्म घेतले असून सध्यां कुलीन घराण्यांत माझा जन्म होऊन मला सेनापतिपद मिळालें आहे.' तेथें बीजक या नांवाचा एक दास होता तोहि वरील गोष्टीस आपली संमति देऊन म्हणतो कीं, 'मी पूर्वजन्मीं सज्जन व उदार असूनहि या जन्मीं वेश्येच्या पोटीं येऊन दास झालों आहे. या आयुष्यक्रमाच्या द्यूतामध्यें मी हार जात आहें; व अलात हा एखाद्या चांगल्या खेळाडूप्रमाणें जिंकतो आहे.'
या भाषणांवरून अंगति राजाची खात्री होऊन तो चैनीमध्यें आयुष्य घालवूं लागला, आणि सुखोपभोगाशिवाय कोणत्याहि गोष्टीचा विचार करीनासा झाला. त्यानें आपला सर्व राज्यकारभार दुस-याच्या स्वाधीन केला. तेव्हां त्याची सदगुणी व सात्त्विक मुलगी रुजा हिनें त्याला येणेंप्रमाणें ख-या तत्त्वाचा उपदेश केला : 'जो वाईट मनुष्याची संगति धरतो तो स्वतः वाईट होतो. ज्याप्रमाणें फाजील जड माल भरल्यामुळें एखाद्या व्यापा-याचें गलबत बुडून जातें, त्याप्रमाणें जो मनुष्य हळू हळू आपल्यावर पापांचे मोठें ओझें करून घेतो तो नरकांत बुडतो.' नंतर ती आपल्या पूर्व जन्मांची हकीकत सांगते. एका जन्मांत ती एक तरुण मनुष्य असून तिनें पुष्कळ हलकट स्त्रियांस नादीं लाविलें होतें. नंतर तिला मनुष्यकोटींतील, प्राणिकोटींतील आणि नरकांतील अनेक जन्मांमध्यें भयंकर हाल सोसावे लागले. पुढें नारद स्वर्गांतून येऊन रुजा हिच्या प्रमाणेंच कर्म व परलोक यांच्या अस्तित्वाबद्दल राजाची खात्री करतो. परंतु राजा म्हणतो : 'जर परलोक असेल तर मला आज शंभर सुवर्णमुद्रा दे म्हणजे मी परलोकांत एक हजार देईन.' नारद उत्तर करतो : ' मीं तुला खरोखर शंभर सुवर्णमुद्रा दिल्या असत्या; परंतु तूं नरकांत गेल्यानंतर मला त्या परत देशील याबद्दल जामीन कोण राहणार आहे ? या जगांतहि मनुष्य फक्त खात्रीच्याच इसमास द्रव्य उसनें देतो.' यानंतर नारद नरक व तेथील हालअपेष्टा यांचें सविस्तर वर्णन करतो. आणि शेवटीं शरीराला रथाची उपमा देऊन आपल्या प्रवचनानें राजाची खात्री करून त्याला बौद्धसांप्रदायिक बनवितो.
जातक नं. ५३० हा एक यासारखाच इतिहाससंवाद आहे. परंतु तो एखाद्या जुन्या पुराणांतील उता-याप्रमाणें दिसतो. यामध्यें राजा ब्रह्मदत्त याला त्याचा पूर्वींचा कुलोपाध्याय संकिच्च हा आल्याची वर्दी मिळते. तेव्हां तो त्याचा सत्कार करून त्याला पापी लोकांचें परलोकांत काय होतें असा प्रश्न विचारतो. तेव्हां संकिच्च हा एका प्रवचनामध्यें नरकाचें सविस्तर वर्णन करतो. या संवादांतील भाषणें मुख्यतः पुन्हां एका दोन मित्रांच्या गोष्टीमध्यें आलीं आहेत. हे दोन मित्र चांडाल, काळवीट, पाणगरुड इत्यादि अनेक जन्मांत जाऊन शेवटीं एकजण एका उपाध्यायाच्या पोटीं चित्त या नांवानें व दुसरा राजाच्या पोटीं संभूत या नांवानें जन्मला होता (नं. ४९८). त्यांच्या संवादामध्यें चित्त हा आपल्या मरणाचें व पूर्वजन्माचें स्मरण करून यतिधर्माची स्तुति करतो; आणि आपला जुना मित्र जो राजा त्याला असें सांगतो कीं, तुला जर सर्वस्वाचा त्याग करतां येत नसेल, तर निदान न्यायानें राज्य करीत जा; आणि जो तूं आतां राजा आहेस तो एकदां दीन आणि दरिद्री होतास, हें सदैव ध्यानांत असूं दे.
या सर्व गोष्टी पूर्वीं सांगितलेल्या आध्यात्मिक कथागीतांच्या स्वरूपांत आहेत. यांमधील अनेक गीतांत कांहीं राजांनीं एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून कांहीं विचार मनांत आल्यामुळें राज्य सोडून सर्वस्वाचा त्याग करून हिमालयामध्यें जाऊन यतिवेषानें परमेश्वरचिंतनांत आयुष्य घालविल्याची उदाहरणें आहेत. एका राजानें सर्व फळें गळून गेलेलें एक आंब्याचे झाड पाहिलें. त्यावरून त्याला सर्व ऐहिक वस्तूंच्या क्षणिकत्वाची आठवण झाली, व त्यानें सर्वस्वाचा त्याग केला. दुस-या एकाला, एका मुलीच्या हातांतील बांगड्यांचा आवाज ऐकून मनुष्याला एकांतामध्येंच शांति मिळते ही गोष्ट ध्यानांत आली. तिस-याला, एका मांसाच्या तुकड्याकरितां गिधाडें एकमेकांशीं भांडतांना व एकमेकांनां फाडतांना पाहून लोभ हा किती तिरस्करणीय आहे ही गोष्ट पटली. चौथ्या एकानें एक मत्त बैल एका गाईपाठीमागें लागला असतां दुस-या कामोत्सुक बैलानें भोंसकून ठार मारिलेला पाहून विषयवासनेचा द्वेष करण्याचा धडा घेतला. या सर्व गोष्टींचा परिणाम एकच दाखविला आहे. मखदेव या राजाची गोष्टहि याच संग्रहांत आहे (नं. ९). या राजानें पहिला पिकलेला केस दिसतांच सर्वस्वाचा त्याग केला.
तथापि या सर्व गीतांमध्यें महाजनक जातक हें अतिशय सुंदर आहे (नं. ५३९). या काव्याचा नायक विदेह देशचा राजा जनक हा आहे. याचा उल्लेख उपनिषदे व महाभारत यांमध्यें आलेला आहे. या जातकामध्यें त्याचें प्रसिद्ध वचन दिलें आहे तें असें : 'जरी सर्व मिथिला दग्ध झाली तरी माझें कांहीं एक जळून जात नाहीं.' हें वाक्य त्यानें, राणीनें त्याला परत आणण्यासाठीं जेव्हां जळत असलेल्या मिथिला नगरीकडे बोट दाखविलें तेव्हां उच्चारिलेलें आहे. त्यानें जगाचा त्याग करण्याचा निश्चय कसा केला; तो प्रथम राजवाड्याच्या गच्चीवर ध्यानामध्यें कसा गढून जात असे; पुढें लवकरच राज्याभिषेकाचें सुवर्णपात्र टाकून देऊन मृत्पात्र घेऊन एकांतांतच गेलें पाहिजे अशी त्याची कशी खात्री झाली; त्याच्या स्त्रियांनीं त्याला परत आणण्याचा कसा प्रयत्न केला; परंतु त्याचा निश्चय उत्तरोत्तर कसा बळावत गेला; व सरते शेवटीं त्याच्यापुढें कोणाचेंहि चालेनासें होऊन तो एकांतांत कसा गेला; या सर्व गोष्टींचें इतक्या जोरदार भाषेंत वर्णन केलें आहे कीं, असें वर्णन त्या गोष्टींवर कर्त्याचा पूर्ण विश्वास असून त्याची कवित्वशक्तीहि दांडगी असल्याखेरीज होणें नाहीं.
प्र च लि त दं त क थां व रू न घे त ले ल्या गो ष्टी.- या सर्व गोष्टी प्राचीन काळीं भरतखंडामध्यें प्रचलित असलेल्या दंतकथांवरून घेतलेल्या आहेत. याच दंतकथांवरून महाभारतांत व इतर पुराणांमध्यें ब-याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. ॠष्यशृंगावरील कविता याच दंतकथांपैकीं असून ती जातकग्रंथामध्यें आढळते, आणि नलिनिका जातक (नं. ५२६) यामध्यें तिचें बरेंच प्राचीन स्वरूप दृष्टीस पडतें. तीच गोष्ट पुन्हां जातक नं. ५२३ मध्यें दिलेली आढळतें. या गोष्टींत पूर्वीं ज्याप्रमाणें ॠष्यशृंग याला शांतेनें मोह पाडला होता, त्याप्रमाणें अलंबुसा या अप्सरेनें इसिसिंग (हें ॠष्यशृंग याचें पाली रूप आहे) या तरुण साधूस मोह पाडल्याची कथा आहे. या जातकाच्या प्रास्ताविक गद्य भागामध्यें इसिसिंग याचा मृगापासून जन्म झाल्याबद्दलची हकीकत दिली आहे. हा प्रास्ताविक भागहि बराच जुना असला पाहिजे. कारण भरहुत येथें खोदलेल्या एका चित्रामध्यें एका मृगापासून जन्मलेल्या लहान अर्भकास एक साधु (इसिसिंग याचा पिता) उचलून घेत आहे, असें एक चित्र आहे.
परंतु याच गोष्टीमध्यें कांहीं अशा गोष्टी आहेत कीं, त्या बौद्धांनीच रचल्या असाव्यात हें नाकबूल करतां यावयाचें नाहीं असें विटरनिंट्झ याचें मत आहे. यांपैकीं सर्वांत सुंदर अशी गोष्ट म्हटली म्हणजे साम या सात्विक तरुणाबद्दलचें कथागीत (नं. ५४०) होय. त्याचा थोडक्यांत सारांश असा : साम हा एक सात्विक असा साधूचा मुलगा असून तो आपल्या अंध मातापितरांबरोबर अरण्यांत राहून त्यांची सेवा करीत असे. एकदां तो त्यांच्या करितां पाणी आणावयास गेला असतां शिकारीस आलेला बनारसचा राजा पिलियक्ख याचा एक विषारी बाण चुकून त्यास लागला. परंतु त्याच्या तोंडांतून शाप अथवा कोणतीहि अभद्र वाणी निघाली नाहीं. मात्र आपल्या बिचा-या मातापितरांचा आधार तुटल्यामुळें त्यांचें कसें होईल याबद्दल शोकोद्गार निघाले. त्या राजाला पश्चात्ताप होऊन त्यानें त्याचें शांतवन केलें, आणि त्याच्या आईबापांची काळजी घेण्याचें कबूल केलें. सामानें त्याला आपल्या आईबापांची झोपडी कोठे होती तें दाखविलें आणि त्याचे आभार मानिले. नंतर तो बेशुद्ध झाला. राजाला अतिशय वाईट वाटून तो शोक करूं लागला. तेव्हां एका वनदेवतेनें त्याचें शांतवन केलें; आणि त्याला सांगितलें कीं, जर तूं सामाच्या मातापितरांची पुत्राप्रमाणें सेवा करशील तर या घोर पातकापासून तुझी सुटका होईल. नंतर तो राजा शोक करीत पाण्याचें भांडें घेऊन सामाच्या मातापितरांच्या झोपडीकडे गेला. त्या राजाची चाहूल ऐकून त्या वृद्ध पित्याला आपण मार्गप्रतिक्षा करीत असलेला आपला पुत्र हा नव्हे, असें कळून आलें. तथापि पिलियक्ख यानें आपण कोण आहों हें सांगितलें तेव्हां त्या वुद्ध अंध मनुष्यानें त्याचें स्वागत करून त्याला खावयास कांहीं फळें व प्यावयास पाणी दिलें. राजानें त्याला हीं फळें कोठून आणिलीं असें विचारिलें. कारण, त्याला स्वतःला तीं आणणें शक्य नव्हतें. तेव्हां त्या वुद्ध गृहस्थानें उत्तर दिलें कीं, आमचा एक तरुण व सुंदर मुलगा आहे तो आमच्या करितां फळें व पाणीं आणतो. पुढें तो राजा त्यांनां त्यांचा कर्तव्यनिष्ठ मुलगा आपल्या हातून मेला असल्याबद्दलची भयंकर बातमी सांगतो. ती ऐकून बाप शांत परंतु शोकपूर्ण उद्गारानें आपलें दुःख व्यक्त करतो; परंतु आई मोठ्यानें शोक करून आपला नवरा राजाचें कांहींच पारिपत्य करीत नाहीं याबद्दल आश्चर्य व्यक्त करते. राजा त्या दोघांचेंहि शांतवन करून मला तुम्ही आपल्या पुत्राच्या ठिकाणीं समजा, मी तुमची सामाच्या प्रमाणेंच काळजी घेईल असें सांगतो. परंतु ते दोघेहि त्याला आपल्या पुत्राच्या प्रेताकडे नेण्याची विनंति करतात, व राजा ती निरुपायानें मान्य करतो. त्या प्रेताजवळ जाऊन तीं मातापितरें हृदयद्रावक असा शोक करतात. परंतु त्याच त्यांच्या शोकाद्गाराचा मंत्राप्रमाणें परिणाम होतो. आई म्हणते, जर साम यानें नेहमीं सदाचरणामध्यें आयुष्य घालविलें ही गोष्ट खरी असेल, तर हे विष नाहींसें होऊन तो पुन्हां चांगल्या स्थितीमध्यें आमच्या पुढें उभा राहो. हीच गोष्ट बाप आपल्या संबंधानें व आपल्या स्त्रियेच्या संबंधानें उच्चारतो. वनदेवताहि अशाच प्रकारचे उद्गार काढते. तेव्हां साम पुन्हां जिवंत होऊन आपल्या मातापितरांसमोर पूर्ववत् उभा राहतो. आणि आश्चर्यचकित झालेल्या राजाचे स्वागत करतो. तो आपल्या मातापितरांस सांगतो कीं, मला फक्त मूर्च्छा आली होती; कारण जे आपल्या मातापित्यांस मान देतात, त्यांनां या जगामध्यें देवांचे साहाय्य मिळतें आणि मरणानंतर स्वर्ग मिळतो. नंतर राजा सामास शरण येतो, आणि साम त्याला राजानें कसें सदाचरणी असावें याबद्दल उपदेश करतो. रामायणांतील श्रावणापेक्षां आमचा बौद्ध साम किती चांगला हें दाखविण्याकरितां बौद्धांनीं ही कथा मुद्दाम फेरफार करून तयार केली नसेलना असा - विद्वान ग्रंथकार विंटरनिट्झ जरी या गोष्टीचें जनकत्व सर्वस्वीं बौद्धांसच देतो तरी - आम्हांस संशय येतो.
केवळ बौद्ध लोकांनींच रचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांमध्यें अतिशय नम्रता, दाक्षिण्य व आत्मत्याग हे गुण सामान्य जनांपेक्षां अधिक आढळतात, हा त्यांचा विशेष आहे.
जातक नंबर ४४० मध्यें कण्ह राजाची गोष्ट सांगितली आहे. त्यानें आपलें सर्वस्व देऊन टाकून यति होण्याकरितां हिमालयाची वाट धरली. सक्क हा त्याच्या सर्व कामना पूर्ण करण्यास तयार झाला; परंतु त्यानें कोणतीहि इच्छा न धरतां शांति, द्वेष, वासना व विषय यांपासून सुटका व सर्वांमध्यें अतिशय उत्तम असा पुढील वर मागितला : ''हे जगदीश्वरा इंद्रा, जर तूं मला वर देणार असशील तर हा दे कीं, माझ्याकरितां कोणत्याहि प्राण्याला मानसिक अथवा शारीरिक पीडा होऊं नये. हीच माझी इच्छा आहे आणि माझ्या करितां सर्वांत चांगली गोष्ट तूं हीच करावी.''
आपल्या शत्रूवर प्रेम करावें हें तत्त्व नं. १५१ या गोष्टीमध्यें सांगितलेलें आहे. एका अरुंद खिंडीमध्यें दोन राजांची समोरासमोर गांठ पडली. ते दोघेहि सारखेच न्यायी, वृद्ध, विख्यात व सामर्थ्यवान् असल्यामुळें त्यांच्यापैकीं कोणी बाजूस होऊन दुस-यास वाट द्यावी हा प्रश्न उत्पन्न होतो. त्यांपैकीं एक उपकाराची फेड उपकारानें करतो एवढेंच नव्हे, तर अपकाराबद्दलहि उपकारच करतो, असें दिसून आल्यामुळें त्याला पहिला मान देण्यांत आला.
प्रा ण्यां चें कृ त ज्ञ त्व व म नु ष्या चे कृ त घ्न त्व द र्श वि णा -या क था.- यांपैकीं अनेक गोष्टीमध्यें बोधिसत्त्व चांगल्या व उदार सत्त्वाच्या प्राण्यांच्या रूपांत आढळतो. यांनां आपण प्राण्यांच्या गोष्टी म्हणूं. अशा प्रकारच्या गोष्टींमध्यें एका मृगाच्या आत्मयज्ञाची गोष्ट दिलेली आहे. हा मृग एका गरोदर हरिणीसाठीं आपला जीव द्यावयास तयार झाला, आणि या गोष्टीमुळेंच राजाच्या अंतःकरणास चटका बसून पुढें त्या मृगाच्या विनंतीवरून राजानें तो कळप सोडून दिला; एवढेंच नव्हे तर त्यानें शिकार करणेंच अजीबात सोडून दिलें. ही कथा थोडक्या फरकानें शिवलीलामृतांत आणून तिचा उपयोग शिवोपासनेकडे केला आहे.
एका सशाने आपल्या पाहुण्यास मांस खाऊं घालण्याकरितां स्वतःसच भाजून घेतलें (नं. ३१६). एका वानरांच्या मुख्यानें आपला कळप वांचावा म्हणून स्वतःच्या शरीराचा गंगानदीवर पूल केला. एका वानरानें एका खोल विवरांत पडलेल्या मनुष्यास बाहेर काढलें; परंतु पुढें त्या मनुष्यास वानराचें मांस खाण्याकरितां त्याच वानरास मारण्याची इच्छा झाली आणि त्यामुळें त्याला कुष्ट रोग उत्पन्न झाला (नं. ५१६). एका हत्तीनें एका जंगलामध्यें रस्ता चुकलेल्या मनुष्यास बाहेर येण्याचा मार्ग दाखविला व त्याला आपले दांत बक्षीस दिले. परंतु त्या लोभी मनुष्यानें हत्तीच्या दांतांची मुळेहि कापून काढिलीं, त्यामुळें हत्तीला अतिशय वेदना झाल्या. तेव्हां त्या मनुष्याला जमिनीचें गिळून टाकले व तेथून तो नरकांत गेला (नं. ७२).
वर दिलेल्या प्राण्यांच्या गोष्टींपैकीं शेवटल्या दोन गोष्टींवरून असें दिसतें कीं, कृतज्ञ प्राणी व कृतघ्न मनुष्यें यांविषयींच्या बहुतेक काल्पनिक कथा बौद्धांनींच रचल्या असणें संभवनीय आहे.
वे स्सं त र जा त का चें क था न क.- या सर्व गोष्टींमध्यें विशेष प्रसिद्ध आणि बौद्ध लोकांस सर्वांत जास्त आवडणारी गोष्ट या जातकग्रंथांतील शेवटची वेस्सतर जातक (नं. ५४७) ही असावी. हें जातक म्हणजे वास्तविक एक महाकाव्यच आहे. कारण, त्यांतील गद्य हें फक्त टीकात्मक असून टीकाकारानें तीच कथा किती नीरस व बोजड रीतीनें दिली आहे हें स्पष्ट दिसतें. तथापि या काव्यामध्यें नायकाचें शौर्य अथवा विजय यांचें वर्णन केलें नसून त्याच्या औदार्याची स्तुति केली आहे. वैस्संतर या राजपुत्राने कोणीं कोणतीहि गोष्ट मागितली तरी नाहीं म्हणावयाचें नाही अशी प्रतिज्ञा केली होती. तो म्हणतो, ''माझें हृदय आणि नेत्र, माझें मांस आणि रक्त, किंवा माझें सर्व शरीर जरी कोणीं मजजवळ मागितलें तरी मी देऊन टाकीन.'' त्यानें आपल्या राज्याच्या कल्याणाचा कांहींहि विचान न करतां एक अद्धुत हत्ती देऊन टाकल्यामुळें त्याला हद्दपार करण्यांत आलें. तेथें त्याजबरोबर त्याची मद्दी नामक स्त्री व त्याचीं दोन लहान मुले गेलीं. त्यांच्या हवालीं एक चार घोड्यांचा रथ करून त्यांनां बाहेर घालवून देण्यांत आलें. लवकरच त्यांनां एक भिक्षुक ब्राह्मण भेटतो व त्याला वेस्संतर रथ व घोडे देऊन टाकतो. नंतर वेस्संतर व त्याची स्त्री मुलांनां घेऊन पायीं चालत चालत रानामध्यें एका आश्रमापाशीं येतात व तेथें राहूं लागतात. येथें सक्क हा एका कुरूप व दुष्ट ब्राह्मणाच्या रूपानें येऊन तीं मुलें आपल्या सेवेकरितां मागून नेतो. सरते शेवटीं तो त्याची बायकोहि मागतो. परंतु वेस्संतर जेवहां तिलाहि देण्यास तयार होतो तेव्हां सक्क आपलें रूप प्रगट करतो आणि नंतर सर्व सुखी होतात. ही गोष्ट ७८६ पद्यांमध्यें सांगितली असून महाकाव्याप्रमाणेंच ती विस्तृत आहे. वेस्संतर हा वनात जावयास निघतो त्या प्रसंगाच्या वर्णनावरून रामायणांतील रामवनवासाची आठवण होते. त्याचप्रमाणें अरण्याचें, आश्रमाचें इ. जीं मोठमोठीं सृष्टिवर्णनें आहेत तींहि रामायणासारखींच आहेत. ब्राह्मणाला मुलें दिल्याचा प्रसंग, त्या दुष्ट ब्राह्मणानें त्यांनां निष्ठुरपणानें वागविल्याचा प्रसंग, त्या लहान मुलांच्या तक्रारी, त्यांच्या आईचें दुःख व त्यांचा तिनें केलेला व्यर्थ शोध इत्यादि प्रसंगांचें वर्णन कवीनें विस्तृत व बहारीचें केलेलें आहे. या प्रसंगांचें वर्णन वाचताना अथवा तिबेट व ब्रह्मदेश यांमध्यें या कथाभागावर रचलेलीं नाटकें पाहताना श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत असत त्यांत कांहीं नवल नाहीं. वरील गोष्टीपेक्षां हरिश्चंद्राची गोष्ट अर्थातच जास्त उठावदार दिसते, पण विंटरनिट्झच्या लक्षांत या दोन गोष्टींतील साम्य आलें नसावें असे वाटतें.
जा त कां ची बौ द्ध सं प्र दा यां ती ल सा र्व त्रि क लो कप्रि य ता.- वेस्संतर जातक या गोष्टींतील नायक पूर्वीं सांगितलेल्या बौद्ध कथांतल्याप्रमाणें बोधिसत्त्व हाच असून त्याच्या ठिकाणीं अनेक पारमिता (पूर्ण गुण) वास करीत होत. त्याच्या ठायीं पूर्वजन्मस्मरण, अमानुष शारीरिक व मानसिक सामर्थ्य इत्यादि गुण होते असें वर्णन आहे. बोधिसत्त्वाचें हें अमानुषत्व हीनयान पंथांतील जिचें प्रस्तुत पाली तिपिटक हें धर्मशास्त्र आहे त्या थेरवाद शाखेच्या ग्रंथांमध्यें जातक ग्रंथांखेरीज इतरत्र प्रामुख्यानें पुढें आणिलेलें नाहीं; परंतु महायान पंथामध्यें मात्र याचा बराच देव्हारा माजविला आहे. अर्थात् जातकग्रंथांचा महायानामध्यें समावेश होतो यांत कांहीं विशेष नाहीं. यावरून हीं जातकें ज्या प्रदेशामध्यें हनियान पंथ चालत असें त्या प्रदेशांत प्रथम रचलीं गेलीं नसून महायान पंथाच्याच प्रदेशांत रचलीं गेलीं कीं काय असा प्रश्न उद्भवतो. जातकें सर्व बौद्ध पंथांच्या धर्मग्रंथांमध्यें आढळतात, व प्रारंभींहि तीं अमुकच एका पंथाचीं म्हणून समजलीं जात नसावींत. बौद्ध संप्रदायाच्या निरनिराळ्या पंथांच्या लौकिक धर्मामध्यें विशेष मतभेद नसल्यामुळें व त्या संप्रदायाचा प्रसार करतांना या जातकांचा विशेष उपयोग होत असल्यामुळें तीं बौद्ध संप्रदायाबरोबरच सर्व लोकांमध्यें प्रसार पावलीं. अद्यापहि बौद्ध लोकांमध्यें जातकाइतका आवडीचा ग्रंथ दुसरा नाहीं. आजकालसुद्धां सिंहली लोक जातककथा ऐकावयास मनापासून, आनंदानें व मुळींच कंटाळा न येतां रात्रीच्या रात्री बसतात. ब्रह्मदेशामध्यें अनेंक शतकांपासून आतांपर्यंत जातककथा या विद्वान् व अविद्वान् , भिक्षू व श्रावक यांनां सारख्याच आनंददायक वाटत आल्या आहेत; आणि जेथें जेथें बौद्ध संप्रदायाचा प्रसार झाला त्या सर्व ठिकाणीं हीच स्थिति आहे. ए. शीफनेर याच्या ग्रंथावरून तिबेटी वाङ्मयामध्यें बौद्ध कथांचा केवढा संग्रह आहे याची आपणांला कल्पना होते. त्याचप्रमाणें एड. शाव्हन्स याच्या ग्रंथावरून चिनी बौद्ध वाङ्मयामध्यें गोष्टींचा किती भरणा आहे तें आपल्या ध्यानांत येतें.
सं स्कृ ति प्र सा र व सं स्कृ ति वि नि म य.- या जातकांनीं सर्व वाङ्मयांमध्यें भर घातली आहे, आणि त्यामुळें सर्व जगाच्या वाङ्मयामध्यें त्यांनां बरेंच महत्त्व आलें आहे. तथापि भारतीय अभ्यासाचा प्रारंभींचा अभ्यासक बेनफी याच्या मताप्रमाणें जगांतील सर्व काल्पनिक कथांचा उगम बौद्ध कथांपासूनच झाला आहे असें आपणांला म्हणतां यावयाचें नाहीं. एवढें मात्र निर्विवाद आहे कीं, ब्राह्मण, जैन वगैरे पंथांनीं भारतीय कथांमध्यें कितीहि भर टाकली असली, तरी त्यांचा भरतखंडाच्या बाहेर प्रसार करून भारतीय संस्कृति व वाङ्मय यांचा पौरस्त्य व पाश्चात्त्य देशांमध्यें सर्वत्र प्रसार बौद्ध संप्रदायानेंच केला. बौद्ध संप्रदायानें भरतखंडांतील लोकांचा इतर लोकांशीं पूर्वीपेक्षां जास्त संबंध घडवून आणिला. अशा वेळीं बौद्धांनीं जसा आपल्या गोष्टीचा प्रसार त्यांच्यामध्यें केला तशा त्यांच्याहि गोष्टी त्यांनीं आपल्यामध्यें आणिल्या असल्याचा संभव आहे. ही गोष्ट विशेषतः ग्रीक, इराणी व सेमाइट या बुद्धिमान् लोकांच्या संबंधीं खरी दिसते. बहुतकरून अलेक्झांडरच्या स्वारीनंतर जे ग्रीक कारागीर भरतखंडांत आले आणि ज्यांनीं बौद्ध स्मारकांवर कलाकौशल्याचीं कामें केलीं, त्यांनीं आपणांबरोबर कांहीं तद्देशीय गोष्टी अथवा गोष्टींचीं कथानकें आणिलीं असलीं पाहिजेत. बौद्ध स्मारकांवर ज्या अर्थीं कांहीं जातकांचीं चित्रें कोरलेलीं आहेत त्या अर्थीं ही गोष्ट जास्त संभवनीय दिसते. कारण, या जातकांमुळें वाङ्मयाप्रमाणेंच भारतीय व इतर देशांतील कलांचीहि वाढ झाली आहे. त्या काळचीं चित्रें हीं भरतखंडांतील चित्रांमध्यें अतिशय प्राचीन असून अद्यापहि बौद्ध देशांमध्यें तीं शिल्पकामाचे व चित्रांचे नमुने म्हणून लोकांच्या फार आवडीचीं आहेत. आपणांला तीं ख्रिस्तपूर्व तिस-या शतकामध्यें भरहुत आणि सांची येथील दगडी भिंतीवर आढळतात. ख्रिस्ती शकाच्या दुस-या शतकामध्यें तीं अमरावती येथें आणि त्याच्या अलीकडील अजिंठा येथील लेण्यांत दृष्टीस पडतात. इ. स. ४१२ ह्या वर्षी फा हीआन या नांवाचा चिनी बौद्ध प्रवासी सिंहलद्वीपांत आला होता. त्या वेळीं सिंहलद्वीपाच्या राजानें एका उत्सवप्रसंगीं, मिरवणुकीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस पांच हजार जातककथांतील प्रसंग मनुष्यांच्या रंगीत आकृती करून दाखविले होते असें त्यानें वर्णन केलें आहे. जातककथांमध्यें वर्णिलेल्या बोधिसत्त्वानें केलेल्या चमत्कारांच्या स्मरणार्थ भरतखंडामध्यें ठिकठिकाणीं उभारलेल्या स्तूपांचें वर्णन ह्युएन त्संग यानें केलें आहे. जावा बेटांत बोरोबुदोर येथील प्रर्वतप्राय देवालयावर जातक कथांतील शेंकडों प्रसंगांचीं चित्रें खोदलीं आहेत (९ वें शतक). त्याप्रमाणेंच ब्रह्मदेशांत पेगन येथें (१३ वें शतक) आणि सयाम देशांत सुखोदय येथें (१४ वें शतक) हि वरील प्रकारचींच चित्रें आढळतात. पाली जातकसंग्रहाचा जो अनुक्रम आहे तोच या चित्रांचा अनुक्रम आहे असें एल. कोरनेरोनें म्हटलें आहे (मुसी गिमे, १९०८).
जा त कां त र्ग त सं स्कृ ती चा इ ति हा स.- या जातकांचें वाङ्मय व कलाकौशल्य यांप्रमाणेंच संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीनेंहि अतिशय महत्त्व आहे. यांवरून जरी आपणांला बुद्धकालीन संस्कृतीची यथार्थ कल्पना यावयाची नाहीं, तरी ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या कालची कांहींशी व विशेषतः ख्रिस्ती शकानंतरची सांस्कृतिक स्थिति आपणांस या जातकांमध्यें-मुख्यत्वेंकरून त्यांतील गद्य भागांमध्यें पहावयास मिळेल. मध्यंतरींच्या कालामध्यें भरतखंडांतील राहणीमध्यें इतका थोडा फरक झाला होता कीं, जातकांमध्यें वर्णन केलेलें आयुष्यक्रमाचें चित्र बरेंच प्राचीन कालचें मानावयास हरकत नाहीं. कसेंहि असलें तरी आपणांला या जातकग्रंथांतील कथांवरून भरतखंडांतील लोकस्थितीची कांहीशी कल्पना करतां येते, आणि ही माहिती भारतीय वाङ्मयांतील इतर ग्रंथांमध्यें फारच थोडी आढळते यांत शंका नाहीं.
जातकग्रंथाचें याप्रमाणें अनेक प्रकारचें महत्त्व असल्यामुळें त्याचें येथें विस्तृत विवेचन करणें आवश्यक होतें. आतां तिपिटकांतील ज्या इतर ग्रंथांचें आपणांला वर्णन द्यावयाचें आहे, तें थोडक्यांत देऊं.