प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

थेरगाथा व थेरीगाथा.- खुद्दकनिकायांतील निरनिराळे ग्रंथ कसे अव्यवस्थित रीतीनें एकत्र केलें आहेत हें या वरील दोन नीरस व रुक्ष काव्यांशेजारीं लागलीच थेरगाथा व थेरीगाथा हीं दोन सौंदर्य व जोरदारपणा या गुणांमुळें सरस असलेलीं अशीं काव्यें ग्रथित केलीं आहेत यावरून दिसतें. हीं दोन काव्यें ॠग्वेदांतील सूक्तांपासून तों कालिदास व अमरु यांच्या पद्यांपावेतों कोणत्याहि उत्कृष्ट काव्याच्या तोडीचीं आहेत. थेर आणि थेरी गाथा हे दोन काव्यांचें संग्रह आहेत. पहिल्यामध्यें १०७ काव्यें असून त्यांत १२७९ पद्यें (गाथा) आणि दुस-यांत ७३ काव्यें असून ५२२ पद्यें आहेत. हीं कांहीं थेर व थेरी (वुद्ध भिक्षू व भिक्षुणी) यांनीं रचलीं असून रचणा-यांचीं नावें दिलेली आहेत. हीं नांवें आपणांला हस्तलिखितांतून व धम्मपाल याच्या टीकेंतहि आढळतात. ही टीका ख्रिस्ती शकाच्या ५ व्या शतकाच्या सुमारास रचली असून तिच्यामध्यें या थेर व थेरी यांच्या चरित्रविषयक गोष्टीहि दिल्या आहेत. या गोष्टी कांहीं अंशीं पद्यांवरून जमविलेल्या आहेत, व कांहीं इतर कथाग्रंथांतून अथवा कल्पनेनें रचून घातल्या आहेत. त्या खरोखर घडलेल्या गोष्टी आहेत असें नाहीं. त्याप्रमाणेंच हीं सर्व काव्यें त्याच (नांवें दिलेल्या) थेर अथवा थेरी यांनीं रचल्याबद्दल जी परंपरा आहे तीहि खरी मानतां येत नाहीं. परंतु हीं सर्व काव्यें एकानेंच केली नसून अनेकांनीं केलीं आहेत; व त्यांपैकीं कांहीं थेरांनीं व थेरींनीं केलीं आहेत. येथपर्यंत ही परंपरा बरोबर आहे. निरनिराळ्या कर्त्यांच्या नांवावर असलेलीं कांहीं काव्यें एकानेंच केलीं असतील किंवा एकाच्याच नांवावर असलेलीं काव्यें अनेकांनीं केलीं असतील. त्याप्रमाणेंच भिक्षूंच्या काव्यांतील कांहीं काव्यें भिक्षुणींनीं केलीं असतील व भिक्षुणींच्या काव्यांतील कांहीं भिक्षूंनीं केलीं असतील. परंतु हीं सर्व एकाच्याच मेंदूंतून खास निघालीं नाहींत. कांहीं गोष्टींत विशिष्ट शब्दसमूह वारंवार आढळतो आणि त्यांतील रहस्यहि बहुतांशीं एकच आहे असें दिसतें. तरी यावरून केवळ त्यांवर बौद्ध कल्पनांचा ठसा उठला आहे एवढीच गोष्ट सिद्ध होते. के. ई. न्यूमन याच्या मताप्रमाणें या सर्व काव्यांवर एकाच व्यक्तीच्या कल्पनांचा ठसा आहे असें म्हणतां येत नाहीं.

भिक्षुणीगीतांतील बहुतेक गाणीं स्त्रियांनींच रचिली असावींत याबद्दल संशय नाहीं. स्त्रीहृदयांतून निघालेलीं हीं गाणीं पुरुषांनीं रचिली असतील असें न म्हणण्याइतकीं बौद्ध भिक्षुवर्गास भिक्षुणींबद्दल कळकळ कधींच वाटत नसे. या गोष्टींच्या प्रतययाकरितां गौतमानें आपल्या दाईच्या भिक्षुणीसंघ स्थापन करण्याच्या मार्गांत किती अडचणी घातल्या याबद्दल जी परंपरागत माहिती आहे व स्त्रियांचा कैवार घेतल्याबद्दल आनंद यास सांप्रदायिक ग्रंथामध्यें ठिकठिकाणीं दूषणें दिलीं आहेत त्यांकडे पहावें. याच कारणामुळें वस्तुस्थिति जर इतकी विरुद्ध नसती तर या काव्यांचें कर्तृत्व भिक्षुणींकडे देण्यास त्यांचें मन केव्हांहि तयार झालें नसतें. या भिक्षू व भिक्षुणी यांच्या गीतांतील भाषा, भाव आणि त्यांचा खरा रोख यांमधील फरक मिसेस र्‍हीस डेव्हिड्स यांनीं चांगला दाखविला आहे. हे दोन्ही संग्रह जो एकामागून एक वाचील त्याला असें आढळून येईल कीं, भिक्षुगीतांमध्यें न आढळणारी वैयक्तिक आत्मविषयक छटा भिक्षुणीगीतांमध्यें वारंवार दिसून येते. भिक्षुगीतांमध्यें मनाचे निरनिराळे विकार अथवा अनुभव वर्णन केलेले असतात, तर भिक्षुणीगीतांमध्यें ठिकठिकाणीं त्यांनां बाहेरच्या जगाचे आलेले अनुभव दृष्टीस पडतात. भिक्षुगीतांत सृष्टिवर्णन अधिक आढळतें तर भिक्षुणीगीतांत आयुष्याचें चित्र दृष्टीस पडतें.

यां ती ल आ ध्या त्मि क व नै ति क त त्त्वें.- दोन्ही संग्रहांमध्यें आध्यात्मिक ध्येय व नैतिक तत्त्वें यांचे उद्धाटन केलें आहे. या सर्व भिक्षूंनां व भिक्षुणींनां मनाच्या अत्यंत शांतीपेक्षां कोणतीहि गोष्ट अधिक वाटत नाहीं. या शांतीमुळें साधूंचा देवांनां हेवा वाटतो. हिची प्राप्ति राग, द्वेष व भ्रम यांचा नाश केल्यानें आणि सर्व विषयवासनांचा त्याग केल्यानें होते; आणि हिच्यामुळें पुनर्जन्माच्या अभावाबद्दलची जाणीव झाल्यामुळें सर्व दुःखांचा शेवट होऊन अत्युच्च सुख जें निर्वाण त्याचा अनुभव मिळतो. ज्या भिक्षूला सुख व दुःख या दोहोंचीहि जाणीव होत नाहीं, व ज्याला भूक अथवा थंडी यांची बाधा होत नाहीं तो सुखी होय. ज्या भिक्षुणीला स्वतःबद्दल पुढें दिल्याप्रमाणें म्हणतां येईल ती सुखी होय (थेरीगाथा ७६) : ''ऐहिक अथवा पार लौकिक सुखाची इच्छा नष्ट झाली आहे; विषय आणि विभ्रम यांचा मी त्याग केला आहे, मला शांति व सर्वश्रेष्ठ सुख जें निर्वाण त्याची प्राप्ति झाली आहे.'' हीं ध्येयें व मुख्य जीं चार नैतिक तत्त्वें - आर्यचतुर्विधिमार्ग, सर्वभूतदय (मेत्त), अहिंसा व आत्मनिग्रह हीं धम्मपदांतील वचनें व सुत्तनिपातांतील पद्यें याप्रमाणेंच या काव्यांतहि एकत्र वर्णन केलीं आहेत. ही भिक्षू व भिक्षुणी यांचीं गीतें, त्यांच्या स्वतःबद्दलचेच उद्गार व स्वतःचेच अनुभव असल्यामुळें वरील दोहोंपासून भिन्न आहेत. एका भिक्षूनें मोठ्या प्रौढानें त्याची बायको व मुलगा त्याच्या शांतीचा भंग करीत असल्यामुळें त्यानें त्यांचें बंधन कसें तोडून टाकिलें हें सांगितलें आहे (थेरगाथा २९९ इ.) दुस-यानें आपल्या बायकोपासून, देंठापासून ज्याप्रमाणें कळी वेगळी होते त्याप्रमाणें हळू हळू परंतु कायमची सुटका करून घेतल्यामुळें त्याला मिळालेल्या सुखाचें वर्णन केलें आहे (थेरगाथा ७२). तिस-यानें एका वेश्येचे पाश आपण कसे तोडून टाकिले तें सांगितलें आहे (थेरगाथा ४५९ व पुढील). भिक्षुगीतांमध्यें ठिकठिकाणीं स्त्रियांची निंदा करून त्यांनां भुरळ पाडणा-या, बंधनकारक व भिक्षूला त्याच्या पवित्र जीवितक्रमापासून भ्रष्ट करण्याचा सतत प्रयत्न करणा-या असें म्हटलें आहे. एकजण म्हणतो, कितीहि बायका आल्या तरी त्या मला मोहूं शकणार नाहींत (थेरगाथा १२११). स्त्री हें सर्व दुःखाचें कारण आहे. जो तिच्यापासून निश्चयानें दूर रहातो तोच विजयी होतो (थेरगाथा ७३८ व पु.). एका भिक्षूनें एका स्त्रीच्या कुजत असलेल्या प्रेतास पाहिल्यामुळें आपणांला सन्मार्गाकडे जावयाची प्रेरणा कशी झाली, याचें मोठें किळसवाणें वर्णन दिलें आहे (थेरगाथा ३१५ व पु. आणि ३९३ व पु.). या ओंगळ वर्णनाच्या उलट कांहीं सुंदर वर्णनेंहि आहेत. एका ठिकाणीं एका भिक्षूनें आपल्या आईनें आपणाला सत्याची ओळख कशी करून दिली तें सांगून तिचे सुंदर शब्दांनीं आभार मानिले आहेत. दुस-या एका भिक्षूनें आपण भिक्षु झालों परंतु या जगास कायमचे सोडून गेलों नाहीं असें म्हणून आईचें सांत्वन केलें आहे (थेरगाथा ४४). एकानें आपण गळलेलीं फुलें वेंचून त्यांवर किती गरीबीनें निर्वाह करीत असूं व नंतर आपण बुद्धाकडे येऊन मुक्तीचा मार्ग कसा शोधून काढला हें सांगितलें आहे (थेरगाथा ६२० व पु.). दुस-या एकानें आपण राजपुरोहिताचे पुत्र असून किती श्रीमंतींत रहात असूं, व पुढें बुद्धाचें दर्शन होऊन आपणाला दीक्षा कशी मिळाली याचें वर्णन केलें आहे (थेरगाथा ४२३ व पु.). एका भिक्षु झालेल्या राजानें आपल्या पूर्वीच्या ऐश्वर्यसंपन्न दरबाराची व त्या वेळच्या भिक्षुवृत्तीची तुलना केली आहे (थेरगाथा ४८२ व पु.). पूर्वीं दरोडेखोर असून नंतर भिक्षु झालेल्या लोकांनींहि आपल्या पूर्वचरित्राचें वर्णन केलें आहे. तथापि भिक्षुगीतांमध्यें अशा त-हेच्या बाह्य परिस्थितीचें वर्णन कमीच आहे. बहुतकरून त्यांमध्यें भिक्षूंच्या अंतःस्थितीचें लहान लहान कवितांमध्यें वर्णन केलें आहे. तथापि थेर तलपुट याच्या गीतांमध्यें एक मोठें काव्य असून त्यामध्यें पवित्र ध्येय मिळविण्याचा प्रयत्न करणा-या भिक्षूंचें आत्मगत भाषण दिलें आहे.

वर सांगितल्याप्रमाणें भिक्षुगीतांपेक्षां भिक्षुगीतांमध्यें आयुष्यांतील प्रसंगांचें वर्णन जास्त आढळतें. अपत्यवियोगाच्या दुःखानें वेडी झालेली एक बाई भटकत फिरत असतांना बुद्धानें तिचें समाधान करून तिला उपदेश केला व तिला संघांत घेतलें. अशा त-हेची पुत्रवियोगामुळें संघांत प्रविष्ट झालेल्या स्त्रियांचीं उदाहरणें ठिकठिकाणीं बरींच आढळतात. एका गीतांत वर्णन आहे कीं, एका गरीब विधवेवर दारोदार भिक्षा मागावयाची पाळी आली असतां, ती सहज भिक्षुणींकडे आली, व त्यांनीं मोठ्या मायेनें तिचें स्वागत करून तिला उपदेश केला तेव्हां ती आपण होऊनच भिक्षुणी झाली व तिचा गुरु पटाचार याच्या उपदेशानें तिला निर्वाणाचा मार्ग सांपडला. ठिकठिकाणीं आपणांला पूर्वी वेश्या असलेल्या भिक्षुणींचें वृत्त आढळतें; व त्या वेश्यावृत्तींतील आयुष्यक्रम व भिक्षुणींवृत्तींतील शांति व पावित्र्य यांमधील विरोध फारच गमतीचा दिसतो. एक ठिकाणीं, आनंदोत्सव व समारंभ चालले असतां त्यांतील थाटाचा पोषाख केलेली एक सुंदर तरुणी मठामध्यें येऊन बुद्धाचा उपदेश ऐकून भिक्षुणी झाल्याचें वर्णन आहे. येथेंहि त्या समारंभांतील आनंद व निर्वाणाची शांति यांमधील विरोध फार बहारीचा आहे. याप्रमाणेंच आपणांला उच्च कुलांतील तरुण मुली, वयातील स्त्रिया, एक दहा मुलांची आई अशा स्त्रियांनीं बुद्धाचा अथवा त्याच्या एखाद्या भिक्षुणीचा उपदेश ऐकून निर्वाणाचा मार्ग शोधून तो प्राप्त करून घेतल्याचीं उदाहरणें आढळतात. भिक्षुणी होण्याच्या निश्चयापासून एखाद्या मुलीला परावृत्त करण्याचा व्यर्थ प्रयत्न तिचे आप्त करतांना दिसतात. एका श्रीमंत मनुष्याच्या सुंदर मुलीला धनवान् मनुष्यांचे मुलगे व राजपुत्र मागणी घालीत होते; व एकानें तर तिच्या वजनाच्या आठपट सोनें व शिवाय जवाहीर देतों म्हणून तिच्या बापाकडे निरोप पाठविला होता; परंतु तिने बुद्धाचा उपदेश ऐकला असल्यामुळें भिक्षुणीचा मार्ग पतकरला. कांहीं कथानकें फार करुणरसपूर्ण आहेत. किसागोतमी रस्त्यामध्यें आजारी होऊन पडली असतां तिचा नवरा, पुत्र व कन्या, तशींच तिचीं मातापितरें व भाऊ भरून जातात; परंतु ती निराश होत नाहीं, व ज्ञानाची प्राप्ति करून घेऊन मुक्त होते. या करुणरसपूर्ण गोष्टीनंतर एक आनंदपर्यवसायी गोष्ट दिली आहे. हींच एका स्त्रीला दीक्षा मिळून ती तांदूळ सडण्यापासून व अप्रिय अशा नव-यापासून मुक्त झाल्यामुळें तिला झालेला आनंद वर्णन केला आहे. ती म्हणते, माझी तीन वांकड्या गोष्टींपासून सुटका झाली आहे. उखळी, मुसळ आणि कुबडा नवरा.

यां व रू न नि घ णा रें स मा ज चि त्र.- या आयुष्यांतील प्रसंगांच्या वर्णनांचें त्या वेळच्या समाजस्थितीचें व विशेषतः प्राचीन कालीं भरतखंडामध्यें स्त्रियांचा सामाजिक दर्जा काय होता याचें ज्ञान होण्याच्या कामीं किती महत्त्व आहे हें उघड आहे. त्याचप्रमाणें या प्रसंगांमुळें या सर्वत्र एकच कल्पना आढळून येणा-या कवितांमध्यें किती स्वारस्य उत्पन्न होतें हें सांगावयास नको. भिक्षुगीतें त्यांत मधून मधून आढळणा-या सृष्टिवर्णनामुळें कंटाळवाणी होत नाहींत. रामायणामध्यें आढळून येणारी व भारतीय काव्यामध्यें प्रामुख्यानें वास करणारी ही निसर्गप्रीति, जिचें अद्यापहि आपण महाकाव्यामध्यें, लावण्यामध्यें अथवा प्रेमगीतांमध्यें व उपदेशपर चुटक्यांमध्यें कौतुक करतों, तिला सर्व जगाचा त्याग करणारे हे भिक्षूहि पारखे नव्हते. ज्यामध्यें एकाकी ॠषि ध्यानस्थ बसला आहे अशा एखाद्या अरण्याचें अथवा गिरिप्रदेशाचें वर्णन करीत असतां त्यांची लेखणी एखाद्या भिक्षूपेक्षां कवीप्रमाणें मोठ्या आनंदानें व मंद गतीनें चालते. मोठ्यानें मेघगर्जना हात आहे, व कृष्णमेघांतून जोरानें वृष्टि होत आहे अशा प्रसंगीं सर्वमुक्त असा भिक्षु आपल्या कपारीमध्यें बसला आहे असें वर्णन आढळतें. आणि ज्या साधूला सुख व दुःख हीं दोन्हीहि सारखींच आहेत, त्यालाहि वसंत ॠतूचें वर्णन केल्याशिवाय रहावत नाहीं. ही निसर्गप्रीति अनेक सुंदर दृष्टांतांतहि दिसून येते. साधूला अचल शिलेची अथवा हत्तीची उपमा दिलेली आढळते. ज्या भिक्षूला आपल्या छाटीबद्दल गर्व वाटतो त्याला सिंहाचें कातडें पांघरलेल्या माकडाची उपमा दिली आहे. आत्मनिग्रही भिक्षूला आपल्या गुहेंत बसलेल्या सिंहाची उपमा दिली आहे. एका भिक्षुणीगीतामध्यें मोठ्या कौशल्यानें उपमांचें ग्रथन केलेलें आढळतें (थेरीगाथा ११२ व पु.) ज्याप्रमाणें एखादा शेतकरी शेत नांगरतो, बीं पेरतो आणि नंतर पिकाची कापणी करतो, त्याप्रमाणें भिक्षुणी निर्वाण प्राप्‍तीची इच्छा करते. एखाद्या शिलेवर पाय धुतले असतां पाणी खालीं वाहून जातें ही गोष्ट पाहून ती विचार करूं लागते; व ज्याप्रमाणें एखादा उमदा घोडा वठणीस आणावा त्याप्रमाणें ती आपल्या मनाचा निग्रह करते. नंतर ती मठांत येऊन हातांत दिवा घेते आणि सुईनें त्याची वात आंत ओढते, आणि जसा त्या दिव्याचा प्रकाश नाहींसा होतो तशी तिला निर्वाणाची प्राप्ति होते. या चातुर्याने एकत्र गुंफलेल्या उपमांकडे पाहून व विशेषतः मधून मधून आढळणा-या श्लेष चमत्कारांकडे पाहून अलंकारिक काव्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं. पूर्वायुष्यांत वेश्या असलेल्या अंबपालीनें केलेल्या एका गाण्याची रचना फारच चातुर्याची आहे (थेरगाथा २५२ व पु.). या गाण्यांत पद्याच्या पहिल्या दोन चरणांमध्यें ती आपल्या शरीराच्या सौंदर्याचें वर्णन करते व तिस-या चरणामध्यें तारुण्यांत इतक्या सुंदर असलेल्या शरीराचें वृद्धावस्थेंत काय झालें आहे तें सांगते. या गाण्याच्या शेवटीं ''सत्य वक्तयाचा शब्द खोटा होणार नाहीं'' या अर्थाचें पालूपद असतें. हीं गाणीं संवादरूपांत फार आढळतात. उदाहरणार्थ एका भिक्षुणीगीतामध्यें (थेरीगाथा २७१ व पु.) कन्या व पिता यांमधील संवाद दिला असून कन्येनें भिक्षुवृत्तीपासून होणारें हित दाखवून देऊन पित्याला भिक्षु केलें आहे. दुस-या एका गाण्यामध्यें (थेरीगाथा २९१ व पु.) एक मनुष्य प्रथम भिक्षु असून नंतर व्याध झाला आहे, व पुढें एक पुत्र झाल्यानंतर त्याला पुन्हां भिक्षु होण्याची इच्छा झाली आहे. त्याचा आणि त्याच्या स्त्रीचा संवाद दिला आहे. त्याची स्त्री त्याला त्याच्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते; व तो तिला सोडून गेला तर मुलास मारून टाकण्याचा धाक घालते. परंतु त्याचा निश्चय पक्का असून तो म्हणतो, जरी तूं या मुलाला कोल्ह्याकुत्र्यांपुढें खाण्याकरितां टाकून दिलेंस तरी, हे नीच स्त्रिये, त्या मुलाकरितांहि तूं मला मागें फिरवूं शकणार नाहींस. ही एक प्रकारची लावणीच आहे. या भिक्षुगीतांत व भिक्षुणीगीतांत - विशेषतः दुस-यामध्यें - अशा त-हेच्या लावण्या कथानकात्मक पद्यांसहित अथवा तशाच पुष्कळ आढळतात. अशा त-हेचा एक मोठा हुबेहूब वर्णन असणारा पोवाडा भिक्षुणीगीतांमध्यें आढळतो (थेरीगाथा ३१२ ते ३३७). एक ब्राह्मण आपल्या स्त्रियेस आश्चर्यचकित होऊन विचारतो : ''आतां तुझीं सात मुलें मेलीं असतांहि तूं कशी रडतांना दिसत नाहींस ? पूर्वीं तर तूं रात्रंदिवस त्यांच्याकरितां रडत होतीस.'' तिनें उत्तर दिलें : ''मी जन्ममरणापासून कसें मुक्त व्हावें हें बुद्धापासून शिकलें आहे.'' हें ऐकून तो ब्राह्मण बुद्धाकडे जाऊन भिक्षु झाला. त्यानें आपल्या स्त्रीस आपल्या गाडीवानाबरोबर आपण भिक्षु झालों असा निरोप पाठविला. या आनंदाच्या बातमीबद्दल ती स्त्री त्या गाडीवानास घोडा, गाडी व एक हजार सुवर्णमुद्रा देऊं लागली, परंतु तो म्हणाला : ''तो घोडा, गाडी व द्रव्य तसेंच राहूं दे, मी सुद्धां भिक्षु होण्याकरितां जात आहें.'' नंतर त्या स्त्रीच्या मनांत आलें कीं, हें सर्व घरदार व द्रव्य वगैरे आपल्या मुलीस देऊन टाकावें. परंतु तिनेंहि या सर्वांचा त्याग करून भिक्षुणी होण्याचा आपला निश्चय आहे असें सांगितलें. सुभा या भिक्षुणीचें गीत या सर्वांत उत्तम आहे. तिची प्रेमयाचना करीत एक शठ तिच्या पाठोपाठ अरण्यांत आला. त्यानें तिच्या सौंदर्याची वाखाणणी करून व अरण्यांतील भीतीचें वर्णन करून तिला विषयसुखाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिनें त्याचा धिक्कार करून म्हटलें : ''तूं ज्या ठिकाणीं मार्ग अथवा पाऊलवाटहि नाहीं तेथें जाण्याची इच्छा करीत आहेस; तुला चंद्राचें खेळणें करावेंसें वाटतें; तुला हिमालयावरून उडी मारावीशी वाटते; तुला बुद्धाच्या मुलीच्या प्राप्‍तीची इच्छा आहे. मीं सर्व ऐहिक वासना निखा-याप्रमाणें अथवा विषाप्रमाणें आपणापासून दूर केल्या आहेत.''  तिनें शरीराच्या नश्वरतेचें, व डोळा केवळ मांसाचा गोळा आहे अशा प्रकारें शरीराच्या ओंगळपणाचें वर्णन केलें व आपला डोळा काढून त्याच्या हातांत दिला. तेव्हां त्याला पश्चात्ताप होऊन त्यानें तिची क्षमा मागितली. नंतर ती भिक्षुणी बुद्धाकडे गेली, व त्यानें तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिचा डोळा पूर्ववत् झाला (थेरीगाथा ३६६ ने ३९९).

यांपैकीं कांहीं गीतें मार व भिक्षुणी यांमधील संवादरूपीं असून तीं संयुत्तनिकाय यांतील भिक्षुणीसंयुत्त यामध्यें आढळणा-या गाण्यांच्याच धर्तीचीं आहेत, व कांहीं ठिकाणीं तींच निराळ्या रूपांत असल्याप्रमाणें आढळून येतात. मज्झिमनिकाय या ग्रंथामध्यें असलेली अंगुलीमाल या दरोडेखोराबद्दलची लावणी थेरगाथेमध्यें अक्षरशः पुन्हां आलेली आढळते (८६६ व पु.). याप्रमाणेंच या संग्रहांतील पुष्कळ पद्यें इतर चार संग्रह, धम्मपद व सुत्तनिपात यांमध्यें आढळून येतात. एका ठिकाणीं (थेरगाथा ४४५) तर निकायामधील दृष्टांत माहीत असल्याचें दर्शविलें आहे एवढेंच नव्हे, तर ते प्रत्यक्ष उद्धृतहि केले आहेत. परंतु या सर्व ठिकाणीं जरी उद्धृत केलेलीं वाक्यें दुस-यांतून घेतलेलीं आहेत हें खरें मानिलें, तरी त्यावरून हे दोन संग्रह मागाहून रचले गेले असें सिद्ध होत नाहीं; कारण हीं अवतरणें मागाहून घुसडून दिलीं गेलीं असण्याचा संभव आहे.

यां चा का ल.- या दोन संग्रहांमध्यें उत्तरकाली रचलेलीं बरींचशीं गाणीं आहेत ही गोष्ट निश्चित आहे. उदाहरणार्थ, एका भिक्षूनें एक फूल वाहिल्याबद्दल त्याला आठशें कोटी वर्षें स्वर्गवास घडून अखेरीस तो निर्वाणास गेला, असें सांगितलें आहे. अशा त-हेच्या कल्पना बौद्ध संप्रदायामध्यें ब-याच अलीकडील महायान ग्रंथांच्या रचनेपर्यंत रूढ झाल्या नव्हत्या. त्याप्रमाणें एका सात वर्षांच्या भिक्षूनें दाखविलेले चमत्कार, एका भिक्षूनें निर्माण केलेल्या स्वतःच्याच १००० आकृती व त्यानें आकाशांत केलेलें उड्डाण, सारिपुत्ताचा स्वर्गामध्यें देवांनीं केलेला सन्मान, आणि असेच इतर चमत्कार ज्या भागांत वर्णन केले आहेत ते भाग बौद्ध काव्यांच्या व विचारांच्या प्राचीन स्वरूपांतील असावेत असें म्हणतां येणार नाहीं; आणि ज्या दोन गीतांमध्यें धर्माच्या नाशाचें वर्णन केलेलें आहे, तीं संप्रदायाच्या स्थापनेनंतर कांहीं शतकांनीं, बहुधा अशोकाच्या कालीं, रचलेलीं, असावींत असें विंटरनिट्झ याचें मत आहे. पहिल्या गीतामध्यें पूर्वीच्या भिक्षूंच्या साध्या व पवित्र राहणीची तुलना तत्कालीन भिक्षूंच्या राहणीशीं केली आहे. जे प्रथम संपत्ति, स्त्री व अपत्य यांचा त्याग करीत असत, तेच त्या वेळीं घासभर भातासाठीं पातक करावयास मागें पुढें पहात नसत; जें आवडेल तें खात असत; बीभत्स करीत; आणि इतर लोकांपुढें दंभ माजवून, त्याबद्दल मोठें पारितोषिक मिळण्याची इच्छा करीत. ते वैद्याप्रमाणें वनस्पती गोळा करीत, वेश्येप्रमाणें नटत असत व ढोंगी, धूर्त व कावेबाज झाले होते. दुस-या गीतामध्यें पुढचे भिक्षू कसे होतील असा प्रश्न विचारिला असतां फुस्स यानें जें त्यांचें चित्र रेखाटलें आहे, तें अलीकडील तिबेटी भिक्षूंनां बरोबर लागू पडेल. त्यांत म्हटले आहे कीं, भिक्षू राग, द्वेष, मत्सर आणि हट्ट यांनीं पूर्ण असतील; त्यांनां सत्याबद्दल जिज्ञासा राहणार नाहीं; ते बुद्धाच्या वचनांचे विपरीत अर्थ करूं लागतील; सोनें व रुपें यांचा स्वीकार करूं लागतील, सदगुणी व ख-या भिक्षूंचा तिरस्कार करतील; भिक्षु व भिक्षुणी शिस्तीनें राहणार नाहींत इ. हें चित्र फार चमत्कारिक असून फार प्राचीन कालचें दिसत नाहीं. भिक्षुणीगीतांतील इतिदासी हिचें गाणें (थेरीगाथा ४०० ते ४४७) या संप्रदायाच्या अवनतीच्या काळचें दिसतें. यामध्यें स्त्री ही तिजवर कांहीं तरी संकट ओढवल्यामुळेंच भिक्षुणी होते असें सरसकट मानिलेलें दिसतें. त्याप्रमाणेंच एखाद्या मनुष्यानें प्रथम भिक्षु व्हावें, पुन्हां भिक्षूची छाटी टाकून देऊन लग्न करावें व पुन्हां पंधरा दिवसांनीं भिक्षु व्हावें, याप्रमाणें गोष्ट घडली असावी. परंतु ती बौद्ध संप्रदायावर कांहीं संकटें येऊन गेल्यानंतर घडली असावी असें वाटतें. शेवटचें भिक्षुणीगीत (थेरीगाथा ४४८ ते ५२१) हेंहि मागाहून घातलेलें असावें, अथवा त्यामध्यें भर घातल्यामुळें व अवतरणांची गर्दी केल्यामुळें त्याचें मूळचें स्वरूप पालटून गेलें असावें असें दिसतें.

यामुळें के. ई. न्यूमन याचें जें म्हणणें आहे कीं हीं सर्व गीतें गौतम जिवंत असतांना संगृहीत करून काळजीनें रक्षण करून ठेवलीं होती व त्याच्या मरणानंतर त्यांचें बिनचूक रीतीनें वर्गीकरण करण्यांत आलें, तें सिद्ध करतां येणार नाहीं; एवढेंच नव्हे, तर कांहीं गीतांच्या बाबतींत तें सर्वथा अशक्य आहे व इतरांच्या बाबतींत असंभवनीय आहे. तथापि कांहीं गाणीं बुद्धाच्या प्रारंभींच्या शिष्यांनींच रचिलीं असावीं हें शक्य आहे. तसेंच भिक्षुगीतांमध्यें वारंवार आढळून येणारा चरण ''मला मृत्यूपासून आनंद होत नाहीं. अथवा जीवितापासून आनंद होत नाहीं'' हा बुद्धाच्या प्रथम शिष्यांपैकीं एखाद्यानें म्हटला असेल. महापजापती हिच्या नांवावर असलेलें बुद्धाच्या स्तुतिपर गीत तिनें प्रत्यक्ष म्हटलेलें असेल; आणि बौद्ध भिक्षूच्या जीविताचें ध्येय ज्यांमध्यें इतकें सूक्ष्म रीतीने वर्णन केलें आहे तीं पद्यें (थेरगाथा ९८१ ते ९९४) सारिपुत्त यानेंच रचलेलीं असतील. ''पूर्णत्वाप्रत जाण्याची तुम्हांला सारखी तळमळ लागूं द्या हेंच माझें तुम्हांला सांगणें आहे. बरें आतां मी जातों, मी नाहींसा होतों. मी अगदीं स्वतंत्र झालों आहें, मी सर्वांपासून मुक्त झालों आहें.'' हे सुंदर शब्द खरोखर सारिपुत्तापासून त्याची शिष्यांस शेवटची आज्ञा म्हणून परंपरेनें चालत आले असतील. तसेच पाली धर्मशास्त्रामध्यें अनेक ठिकाणीं आढळणारी व या संग्रहामध्यें याच्या नांवावर असलेलीं

''सर्व वस्तू क्षणभंगुर आहेत. त्या जशा उत्पन्न होतात तसाच त्यांचा नाश होतो. त्यांचा आरंभ होत नाहीं तोंच अंत होतो. त्यांपासून मुक्त होणें यांतच धन्यता आहे.''  हीं पद्यें इतकीं जुनीं आहेत कीं, तीं मोग्गलान अथवा दुस-या एखाद्या बुद्धाच्या आरंभींच्याच शिष्यानें रचली असणें शक्य आहे. तिपिटकाच्या इतर संग्रहांप्रमाणें यांतहि नवें आणि जुनें यांचें मिश्रण आहे, आणि शोधकाच्या प्रत्येक सूत्राचा काल पृथकपणें निश्चित करावा लागतो.