प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

फ्रान्सच्या सत्तेची वाढ.- फ्रान्समध्यें सरंजामी पद्धति नाहींशीं होऊन राजसत्ता पूर्णपणें स्थापित झाली हें वर सांगितलेंच आहे. प्रथमतः तेथील राजांस सरदार लोकांपासून त्रास झाला, परंतु चवथा हेन्री हा फ्रान्सच्या गादीवर आल्यापासून राजसत्ता दृढ होण्यास प्रारंभ झाला. आपला प्रधान सली याच्या मदतीनें त्यानें राज्यकारभारांत पुष्कळ सुधारणा केल्या. विशेषतः त्यानें व्यापाराला उत्तेजन दिलें. याशिवाय त्यानें जमाबंदी खात्यांत पुष्कळच व्यवस्थितपणा आणिला.

चवथ्या हेन्रीनें ह्युजेनॉट म्हणजे फ्रेंच प्रोटेस्टंट लोकांस पुष्कळ सवलती देऊन त्यांचा विरोध नाहींसा केला. त्यानें बंडखोर सरदारांस शिक्षा लावून व त्यांवर आपला वचक बसवून सरदारांस शिक्षा लावून व त्यांवर आपला वचक बसवून सरदाराचा वर्ग शक्तिहीन केला. याप्रमाणें राज्यांत सर्व ठिकाणीं व्यवस्था करून सर्व फ्रान्स त्यानें आपल्या सत्ते खालीं आणिलें. याबरोबरच त्यानें हॅप्सबर्ग घराण्याशीं युद्ध सुरू केलें. हेन्रीच्या मरणानंतर फ्रान्समध्यें पुन्हां अस्वस्थता माजली. सरदार लोक प्रबल झाले. ह्युजेनॉट लोक आपल्या सवलतींचा दुरूपयोग करू लागले. परंतु ही विसकटलेली घडी १३ व्या लुईच्या कारकीर्दींपासून पुन्हां बसावयास लागली. १३ व्या लुईचा प्रख्यात प्रधान रिशेलु यानें सरदारांनां बलहीन केलें. ह्युजेनॉट लोकांचे राजकीय हक्क काढून घेतले व राजसत्तेला विरोधी असणा-या सर्व संस्था बंद करून फ्रान्समध्यें एकछत्री अंमल सुरू केला. फ्रान्समधील अंतःकलह बंद होऊन फ्रान्स आतां बराच प्रबल झाला. यामुळें त्यास तीस वर्षांच्या युद्धांत सामील होतां आलें. यावेळेस फ्रान्सला मोठमोठे सेनापती (कॉन्डे व ट्यूरेन) लाभल्यामुळें त्यास विजयश्रीने माळ घातली. यूरोपांत फ्रान्स एक बलाढ्य राष्ट्र म्हणून त्याचा बोलबाला झाला व मागील शतकांत बलिष्ठ असलेल्या हॅप्सबर्ग घराण्याचा -हास झपाट्यानें होऊं लागला. रिशेलूच्या मरणानंतर फ्राँडे चळवळीनें फ्रान्समध्यें पुन्हां अव्यवस्था माजून रिशेलूचें सर्व काय नष्ट होतें कीं काय अशी भीति पडली. परंतु १४ व्या लुईचा प्रधान माझरीन यानें फ्राँडे चळवळीचा मोड करून फ्रेंच राजसत्ता पुन्हां प्रस्थापित केली. यापुढें राजसत्तेला कधींहि विरोध झाला नाहीं. राजसत्तेला विरोध करणा-या सर्व संस्था जवळ जवळ नष्ट होऊन राजसत्तेची इमारत भक्कम पायावर उभारली गेली. इ. स. १६६० यावर्षीं १४ व्या लुईनें राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतली. यावेळेस यूरोपांतील सर्व देशांत राजसत्ता बलिष्ठ झाली होती. आतां यापुढें सतराव्या शतकांत राजसत्ता प्रबल करण्याकरितांच सर्वत्र प्रयत्न चालू होते.

१४ व्या लुईच्या कारकीर्दींत फ्रान्समध्यें तर ही राजसत्ता कळसास जाऊन पोहोंचली. या अशा प्रबल राजसत्तेच्या अंमलाखालीं फ्रान्सची सर्व प्रकारें उन्नति होऊं लागली. वाङ्मय, कला, शुद्धशास्त्र तत्त्वज्ञान वगैरे विषयांत विद्वान लोक निर्माण होऊन फ्रान्स देश सुधारणेचें माहेरघर बनला. टयुरेन, लक्सेंबर्ग, व्हीलर या सेनापतींनीं फ्रान्सची कीर्ति सर्व यूरोपांत गाजवली; त्याचप्रमाणें पास्कल, रेसीन, करनेली मालियर, फेनेलन्, सेन्टसायमन्, वगैरे विद्वानांनी तत्त्वज्ञान, नाट्यकला, वाङ्मय, इतिहास, वगैरे विषयांवर अधिकारयुक्त असें ग्रंथ निर्माण केले. फ्रान्समध्यें मोठमोठ्या इमारती बांधल्या जाऊन शिल्पशास्त्रांत फार सुधारणा झाली. फ्रान्स आतां सर्व यूरोपांत बलिष्ठ राष्ट्र म्हणून पुढें आलें. त्याचा हार्डवैरी स्पेन व ऑस्ट्रिया यांच्या सत्तेस कधींच उतरती कळा लागून फ्रान्सला आतां कोणी प्रतिस्पर्धी उरला नव्हता. राष्ट्रव्यवहारांत व राजकारणांत पुढाकार घेण्यास फ्रान्सला ही चांगली संधी सांपडली.

तीस वर्षांच्या युद्धांत झालेली नासधूस भरून काढण्यांत जर्मनी गुंतला असून परराष्ट्रीय राजकारणांत लक्ष देण्यास त्यास शक्तिहि नव्हती व अवकाशहि नव्हता. ऑस्ट्रिया व पोलंड यांचें लक्ष तुर्क लोकांच्या स्वा-यांकडे लागलें होतें व स्पेनच्या सत्तेला उतरती कळा लागली होती. इंग्लंडमध्यें दुसरा चार्लस व दुसरा जेम्स हे राजे लुईचे दोस्त असल्यामुळें त्यांनीं त्याच्या धोरणाला विरोध केला नाहीं. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे यूरोपच्या सार्वराष्ट्रीय व्यवहारांत आपली सत्ता पूर्णपणें प्रस्थापित करावयास लुईला ही संधी चांगली सापडली व तिचा त्यानें चांगला उपयोगहि करून घेतला. यापुढें लुईची महत्त्वाकांक्षा वाढत जाऊन सर्व यूरोप पादाक्रांत करण्याची हांव त्याच्या मनांत उत्पन्न झाली. इ. स. १६६७ यावर्षीं त्यानें 'डेव्होल्युशन' युद्ध सुरू केलें. या युद्धांत त्यानें स्पॅनिश नेदरलंड मधील कांहीं किल्ले काबीज केले. पुन्हां इ. स. १६७२ पासून १६७८ पर्यंत त्याचें व डच लोकांचें युद्ध चाललें. पुढें इ. स. १६७३ पासून त्यानें ऑस्ट्रिया व स्पेनशींहि युद्ध पुकारलें. याच वेळेस तुर्क लोकांनीं पोलंडवर स्वारी केली; परंतु जॉन सोबेस्की यानें तुर्क लोकांचा पराभव केला. झुरवना येथें तुर्कलोक व जॉन सोबेस्की यांमध्यें तह होऊन पूर्व यूरोपवर आलेले संकट कांहीं दिवस तरी टळलें. इतके इ. स. १६७८ यावर्षी निज्मवेगेन येथें झालेल्या तहानें लुईला बराच फायदा झाला. इ. स. १६७८ पासून १७ व्या शतकाच्या शेवटपर्यंत तुर्क लोकांच्या स्वा-या व चवदाव्या लुईची महत्त्वाकांक्षा याच दोन गोष्टी यूरोपच्या राजकारणांत प्रमुख होऊन बसल्या होत्या. सर्व पूर्व यूरोप मुसुलमानांच्या हाताखालीं जातो कीं काय अशी मोठी भीति पडली. परंतु सुदैवानें इ. स. १६८३ या वर्षी व्हिएन्नाच्या वेढ्यांत तुर्क लोकांचा पराभव होऊन तुर्क लोकांच्या स्वा-यांस चांगलाच आळा बसला या पुढें पूर्वयूरोपला तुर्कलोकांचें भय मुळींच राहिलें नाहीं. इकडे पश्चिम यूरोपांत लुईच्या महत्त्वाकांक्षेस इतक्या लवकर आळा बसला नाहीं. तिसरा वुइल्यम ज्यावेळेस इंग्लंडचा राजा झाला त्यावेळेपासून लुईच्या महत्त्वाकांक्षेस हळू हळू आळा बसूं लागला. तिस-या वुइल्यमनें आपलें सर्व आयुष्य लुईच्या सत्तेशीं झगडण्यांत खर्च केलें. त्यानें वेळोवेळीं यूरोपांतील निरनिराळ्या राजांशीं तह करून लुईची महत्त्वाकांक्षा निष्फळ केली. इ. स. १६९७ यावर्षीं रिसविक येथें झालेल्या तहानें लुईची सत्ता कांहीं अजिंक्य नाहीं हे स्पष्ट दिसून आलें.