प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

इसवी सनाच्या सोळाव्या शतकांत यूरोपच्या इतिहासांत मुख्यतः संप्रदायसुधारणा व राष्ट्रपद्धतीची वाढ या दोन गोष्टी प्रामुख्यानें आपल्या नजरेसमोर येतात.

ख्रिस्ती संप्रदाय सुधारणा.- मागें सांगितलेंच आहे कीं ख्रिस्ती संप्रदायाच्या आचार्यपीठामध्यें म्हणजे पोपच्या कारभारांत अंतःकलह सुरू होऊन पोपचा सत्ता पूर्वींसारखी राहिली नव्हती. एकंदर ख्रिस्ती संप्रदाय संस्थेत अव्यवस्था माजल्यामुळें तिचा -हास फार झपाट्यानें होत होता. इकडे मुद्रण कलेचा शोध व मुद्रितग्रंथप्रसार व पुनरूज्जीवनाची चळवळ यामुळें लोकजागृति उर्फ बुद्धिभेद उत्पन्न झाला. पोपच्या व्यवस्थेंत अनाचार असून तिच्यांत सुधारणा करणें अवश्य आहे अशी त्यांची समजूत होऊं लागली. नंतर मार्टिन लूथर या नांवाचा एक उपदेशक पुढें आला. व ख्रिस्ती संप्रदायांतील दोष दाखवून सम्राट व पोप यांच्या विरोधाची पर्वा न करितां ख्रिस्ती संप्रदायाचा आद्य ग्रंथ जो बायबल त्याकडे वक्री अवलोकन करून त्यानें 'मूल' मताचाच उपदेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानें जो संप्रदाय स्थापन केला त्यांत पारमार्थिक मतांच्या बाबतींत पोपची सत्ता मानावयाची नाहीं, हें पहिलें मत आहे. त्याच्या पंथास प्रोटेस्टॅन्टिझम् हें नांव असून तदनुयायी लोकांस प्रोटेस्टन्ट असें म्हणतात. प्रोटेस्ट म्हणजे आक्षेप अथवा विरोध. प्राटेस्टंट म्हणजे विरोध (पोपच्या सत्तेस) करणारा आणि प्रॉटेस्टांटिझम म्हणजे विरोधवाद. पुढें पोपच्या विरुद्ध पुष्कळ पंथ निघाले व ते सर्वच पोपसत्तेला विरोधी असल्यामुळें प्रोटेस्टन्ट या नावांत सर्वांचा समावेश होई. म्हणून त्याच्या मधील भेद दाखविण्यासाठीं कधीं कधीं लूथरी पंथास ल्यूथरॅनिझम असें म्हणतात. सोळाव्या शतकाचा इतिहास म्हणजे प्रोटेसन्टिझम व रोमन कॅथॅलिसिझम (लुथरचा व इतर पाखंड पंथ व पोपचा पंथ म्ह.मूल संप्रदाय) यांतील भांडण हें होय. मागें सांगितलेंच आहे कीं या शतकांत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे राष्ट्रपद्धतीची वाढ ही होय. यूरोपांत बहुतेक सर्व ठिकाणीं राजघराणीं स्थापन झालीं. पुढें कांहीं राजे प्रबल झाले. व सहजच त्यांनां राज्यविस्ताराची हांव उत्पन्न झाली. याचा परिणाम असा झाला कीं सोळाव्या व सतराव्या राज्य विस्ताराकरितां मोठमोठ्या लढाया झाल्या. याचवेळेस राजनीतिशास्त्रांत निरनिराळ्या संस्थानांच्या अस्तित्वासाठीं व स्थैर्यासाठी ''स्थितिसाधाकता'' असावयास पाहिजे हें तत्व उद्भुत झालें या तत्त्वानें प्रबल राजांच्या वाढत्या सत्तेस पुष्कळदां आळा घालून (उ. फ्रान्सचा १४ लुई, स्पेनचा दुसरा फिलीफ यांच्या) १८ व्या शतकापर्यंत यूरोपांतील राजकीय व्यवस्थेत समतोलपणा राखला.

संप्रदायक्रांति व प्रोटेस्टंट पंथाचा विजय ही आणि राष्ट्रपद्धति व तज्जन्य युद्धें हीं परस्परावलंबी आहेत. पहिला फ्रान्सिस व पांचवा. चार्लस हे अनुक्रमें फ्रान्स व जर्मनी यांच्या गाद्यांवर आल्याबरोबर त्यांच्यामध्यें इ. स. १५२१ यावर्षी कलह सुरू होऊन तो इ. स. १७५६ या वर्षापर्यंत चालला. या कलहाच्या आरंभींच पॅव्हिआच्या लढाईंत (इ. स. १५२८) फ्रॉन्सिसचा पराभव होऊन जर्मन सम्राट यशस्वी झाला. परंतु इतक्यांत तुर्क लोकांच्या स्वा-या व जर्मनींतील संप्रदायक्रांति यांकडे लक्ष देणे चार्लसला जरूर झालें. पुढें तुर्क लोकांनां हांकलून लावण्यांत व प्रॉटेस्टन्ट पंथाचा मोड करण्यांत चार्लस गुंतला असतां पुन्हां फ्रान्सिसनें युद्ध सुरू केलें. म्हणून त्यास तीं कामें तशीच अर्धवट टाकून फ्रॉन्सिसकडे लक्ष द्यावें लागलें. इ. स. १५४४ यावर्षीं क्रेषीच्या तहानें फ्रान्सिस व चार्लस यांमधील यांमधील तंटा मिटून चार्लस मोकळा झाला. परंतु इतक्या वर्षांत प्रोटेसटन्ट पंथाची वाढ इतक्या झपाट्यानें झाली कीं, यावेळेस त्यांचा नाश करणें जवळ जवळ अशक्य झालें शेवटी इ. स. १५५५ यावर्षीं ओम्सबर्ग येथें झालेल्या तहानें चार्लसला प्रोटेस्टन्ट पंथ मान्य करावा लागला. याप्रमाणें चार्लस व फ्रान्सिस यांच्या भांडणामुळें प्रॉटेस्टन्ट पंथाचा फायदा झाला. तसेंच संप्रदायक्रांति व तज्जन्य अशांतता यांकडे चार्लसला लक्ष द्यावें लागल्यामुळें त्यांला फ्रान्सिसशीं झालेल्या भांडणांतहि यश आलें नाहीं. कारण इ. स. १५५३ यावर्षी मेटझ टूल व व्हरडून हीं त्याच्या हातून गेलीं. शेवटी इ. स. १५५६ यावर्षी साम्राज्याची राज्यव्यवस्था आपला भाऊ फरडिनान्ड याजकडे सोंपवून स्पेन व नेदरलंड हे प्रांत आपल्या मुलाच्या हाती देऊन, चार्लसबादशहा स्पेनमध्यें विश्रांति घेत राहिला. फिलिपनें सेन्ट क्विन्टेन येथे १५५८ यावर्षीं फ्रान्सिसचा पराभव करून त्यास तह करावयास भाग पाडलें. त्यानंतर फ्रान्सिस व हॅप्सबर्ग घराणें यांतील भांडण अजिबात बंद पडलें.

इतःपर फ्रान्स, स्पेन, जर्मनी व इंग्लंड येथील राजे आपापसांतील कलहापासून मुक्त झाल्यामुळें संप्रदायांतील मतक्रांति व अधिकारक्रांति याकडे त्यांस लक्ष देण्यास फावलें. मागें सांगितलेंच आहे कीं आतां प्रॉटेस्टन्ट पंथाची वाढ फार झपाट्यानें होऊन इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व डेन्मार्क या देशांत प्रोटेस्टन्ट पंथाभिमान्यांची संख्या वाढत चालली.