प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

स्पेनचा –हास - १६ व्या शतकांत सांप्रदायिक युद्धांत स्पेनने सर्वांत प्रमुख भाग घेतला होता. त्या वेळेस निरनिराळ्या राजघराण्यांशीं विवाहसंबंध करून हॅप्सबर्ग घराण्यानें आपली सत्ता फार वाढविली होती. १६ व्या शतकांत सर्व यूरोपच्या स्वतंत्र संस्थानिकांस स्पेनच्या दुस-या फिलीफचें मोठें भय वाटत होतें.- दुस-या फिलिफनें यूरोपांतील राजकीय समतोलपणाचा भंग केला होता. त्याच्या कारकीर्दींत स्पेन देश केवळ युद्धशास्त्रांतच प्रमुख नव्हता तर तो सर्व सुधारणांचें माहेरघर बनला होता;  परंतु पुढें स्पेनच्या सत्तेस उतरती कळा लागली. त्याच्या -हासाचीं कांहीं प्रमुख कारणें खालीं दिलीं आहेत.

(१) इ. स. च्या १६ व्या शतकाच्या आरंभीं स्पेन हा मूर लोकांनां हांकलून देण्यांत गुंतला होता व त्या कामीं स्पेनचें बरेंच नुकसान झालें. मूर लोक उद्यमशील नसून फक्त उत्तम व्यापारी होते. ते स्पेनमधून बाहेर गेल्यापासून स्पेनचा व्यापार जवळ जवळ बंदच पडला.

(२) प्रथम अमेरिकेंतील वसाहतीपासून स्पेनला बरीच मदत होत असे. पुढें वसाहतीच्या अंतर्व्यवस्थेंत घोंटाळा माजून स्पेनला मदत मिळेनाशी झाली.

(३) इ. स. च्या सोळाव्या शतकांत स्पेननें एक मोठें साम्राज्य निर्माण करण्याच्या अट्टाहास केला. त्या कामीं त्याची विपुल संपत्ति व मोठमोठे योद्धे कामीं आले. या प्रयत्नांत त्याला यश तर आलेच नाहीं, परंतु त्या अट्टाहासांत तो इतका बलहीन झाला कीं, पुढें यूरोपच्या इतिहासांत स्पेनचें नांवहि ऐकुं येईनासें झालें.

(४)  स्पेन हा प्रथमपासूनच कॅथोलिकपंथानुयायी होता. इ. स. च्या १६ व्या शतकाच्या आरंभीं झालेल्या संप्रदायसुधारणेला स्पेननें फार जोराचा विरोध केला. याचें एक कारण असें होतें कीं, ज्या ब-याचशा सुधारणा घडवून आणण्यासाठीं यूरोपांत इतर ठिकाणीं सांप्रदायिक अधिकारक्रांति झाली; त्यापैकीं ब-याचशा सुधारणा स्पेनमध्यें अगोदरच झाल्या होत्या. त्यामुळें सांप्रदायिक अधिकारक्रांति स्पेनला करावी लागली नाहीं. तथापि त्या संप्रदायसुधारणेच्या चळवळीबरोबरच पश्चिम यूरोपांत झालेल्या बौद्धिक चळवळीला स्पेन पारखा झाला. त्या वेळेस स्पेनमध्यें सर्व ठिकाणीं अज्ञान माजलें असून ज्ञान फक्त काय ते पाद्री लोकांतच दिसून येई. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे स्पेन अजून अर्धवट मध्ययुगांतच होता.

हीं वरील कारणें व फ्रान्सचें वैर यामुळें स्पेनचा -हास झाला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धांत स्पेनची स्थिति फार शोचनीय होऊन पुढें लवकरच स्पेनच्या खुद्द तक्ताकरितां यूरोपांतील राजांत लढाया लागल्या.

येथवर इ. स. १६९७ यावर्षी झालेल्या रिसविकच्या तहापर्यंत यूरोपच्या इतिहासाचें पर्यालोचन केलें आहे. यूरोपांत या वेळेस फ्रान्सची सत्ता जरी प्रबल होती तरी ती कांहीं अजिंक्य नाहीं हें आतां स्पष्ट दिसून आलें. स्पेन जो एकदां खालावला तो कायमचाच खालावला; स्वीडनलाहि उतरती कळा लागली. इंग्लंड नुकतेंच राजाच्या विरुद्ध झालेल्या सनदशीर चळवळीपासून मुक्त होत होतें. पुढें १८ व्या शतकांत ज्यांनीं यूरोपच्या राजकारणांत पुढाकार घेतला तीं रशिया व प्रशिया हीं राष्ट्रें नुकतींच कोठें उदयास येऊं लागलीं होतीं. अशा स्थितींत फ्रान्सला पुन्हां यूरोपांत धुडगूस घालण्यास चांगली संधी मिळाली. परंतु इतःपर इंग्लंडनें आपला एकलकोंडेपणा सोडून यूरोपच्या राजकारणांत प्रमुख भाग घेण्यास प्रारंभ केला. ऑरेन्ज घराण्याच्या तिस-या वुइल्यमच्या धुरीणत्वाखालीं इंग्लंडनें फ्रान्सच्या महत्त्वाकांक्षेला विरोध करून यूरोपांतील राजकीय समतोलपणा कायम ठेविला. यावेळेस जर तिसरा वुइल्यम पुढें आला नसता तर सर्व पश्चिमयूरोप १४ व्या लुईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडला असता. स्पेनच्या गादीविषयीं झालेल्या युद्धांत वुइल्यमनें निरनिराळ्या राजांशीं दोस्ती करून फ्रान्सची सत्ता हाणून पाडली. इ. स. १७१३ यावर्षीं यूट्रेचच्या तहानें हें युद्ध संपलें. यूद्रेचचा तह ही यूरोपच्या इतिहासांतील एक मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. या तहानें इंग्लंडला जिब्राल्टर हें भूमध्यसमुद्राचें एक नाकें व मिनोरका हें बेट मिळून दक्षिण अमेरिकेंत व्यापाराचे हक्क मिळाले. तें आतां आरमारी राष्ट्र बनून समुद्रावर वर्चस्व स्थापण्याच्या कामाला लागलें. ऑस्ट्रियाला बेलजम व इताली हे प्रदेश मिळालें; फ्रान्स बराच दुर्बल झाला. यूट्रेचच्या तहानंतर (इ. स. १७१३) अठराव्या शतकात आरंभ होतो. येथें हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं कोणत्याहि देशाच्या इतिहासाची विभागणी शतकांप्रमाणें केली असतां सोईवार व्हावयाची नाहीं. तर ज्यावेळेस एक प्रकारच्या कल्पनांचा व संस्थांचा -हास होऊन नवीन कल्पना व संस्था दृग्गोचर होतात त्या वेळेस नव्या शतकाच्या अथवा युगाचा आरंभ झाला असें म्हणावयास हरकत नाहीं. या दृष्टीनें पाहिलें असतां इ. स. १७१३ हें १८ व्या शतकाचें पहिलें वर्ष होय. १८ व्या शतकांत यूरोपांतील राज्यें अतिशय स्वार्थी बनलीं, त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली. मोठमोठीं ध्येयें त्यांच्या दृष्टिपथांतून नाहींशीं झालीं. गस्टावस, अँडोल्फस, जॉन सोबेसकी यांसारखे पुरूष १८ व्या शतकांत विरळाच दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणें आतां ग्रेट रेबिलेशन सारख्या पारमार्थिक चळवळी बंद पडून विशिष्ट राष्ट्रस्वार्थ किंवा विशिष्ट वर्गाचा स्वार्थ साधण्याकरितां धडपड सुरू झाली. पूर्वीं सांगितलेच आहे कीं १७ व्या शतकांत यूरोपच्या राजकारणांत राजकीय समतोलपणा या तत्त्वाचा उद्भव होऊन त्याचें महत्त्व अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांपर्यंत होतें. परंतु अठराव्या शतकांत या तत्त्वाचा विपर्यास केला गेला. १४ वा लुई व दुसरा फिलिफ यांनीं यूरोपच्या स्वतंत्रतेवर घाला घातला असतां ज्या तत्त्वाच्या बळावर यूरोपांतील राष्ट्रें एक होऊन त्यांनीं लुई व फिलिक यांचा पराभव केला त्याच तत्त्वाच्या नावांखालीं आतां प्रबल राजे लहान लहान राष्ट्रांची स्वतंत्रता हिरावून त्यांच्या प्रदेशाची राजरोसपणें विभागणी करूं लागले व बळी तो कान पिळी हें तत्त्व आतां प्रबल झालें.

परंतु अठराव्या शतकांतील घडामोडींचा इतिहास देण्यापूर्वीं १८ व्या शतकाच्या आरंभीं यूरोपांत जीं नवीनच राष्ट्रें उदयास आलीं त्या विषयीं थोडी माहिती देणें जरूर आहे; कारण त्यांनीं अठराव्या शतकांतील राजकारणांत बराच महत्त्वाचा भाग घेतला असल्यामुळें त्या शतकांतील इतिहास समजण्यास त्यांच्या माहितीचा उपयोग बराच होईल. हीं दोन राष्ट्रें म्हणजे रशिया व प्रशिया हीं होत त्यापैकीं रशियाकडे आपण प्रथम वळूं.