प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख
प्रशियाचा अभ्युदय.- ज्या संस्थानानें विभागलेल्या जर्मन राष्ट्रांनां एक करून होली रोमन साम्राज्याच्या जागेवर एक भले मोठे साम्राज्य निर्माण केलें त्या प्रशिया संस्थानाच्या उदयाचा इतिहास मोठा मनोरंजक आहे.
प्रशिया संस्थानाच्या उदयाचा विचार करण्याबरोबर तीन गोष्टी डोळ्यासमोर येतात (१) प्रशियाची डची (२) ब्रँडेनबर्ग संस्थान व (३) होहेनझोलर्न राजघराणें प्रथम हें लक्षांत ठेविलें पाहिजे का, प्रशियाची डची ही त्यावेळेस जर्मन साम्राज्यांत मोडत नसे. ब्रँडनबर्गचें संस्थान हा जर्मन साम्राज्यांतला भाग असून हेच संस्थान प्रशिया संस्थानाच्या शक्तीचें केंद्र होतें. त्याला पुढें प्रशियाची डची जोडिली जाऊन त्याचें परिवर्तन हल्लींच्या प्रशिया संस्थानांत झालें. होहेनझोलने घराणें ब्रँन्डेनबर्गवर इ. स. १४११ पासून राज्य करावयास लागलें तेव्हांपासून बॅ्रन्डेनबर्गच्या संस्थानांत सुधारणा होण्यास सुरवात झाली.
होहेनझोलर्न घराण्यांतील राजे ज्यावेळेस ब्रॅन्डेनबर्गवर राज्य करूं लागले त्यावेळेस ते संस्थान फार लहान होतें. राज्यांत अतिशय अस्वस्थता माजून राजसत्ता कोणीहि मानीना अशी स्थिति आली होती. याशिवाय साम्राज्य शक्तिहीन झाल्यामुळें त्याचा संस्थानिकावर दाब राहिला नव्हता. यामुळें शेजारचे संस्थानिक ब्रॅन्डेनबर्गच्या संस्थानांत लुटालूट करीत. ही अराजक स्थिति नष्ट करून ब्रॅन्डेनबर्गचें संस्थान स्वतंत्र व प्रबल करण्याचें काम आरंभींच्या राजे लोकांनीं केलें. सतराव्या शतकाच्या आरंभीं आपणांस ब्रॅन्डेनबर्गचें संस्थान मोठें व साधारण शक्तिमान दिसतें. त्यास कांहीं प्रदेश विवाहसंबंधामुळेंहि प्राप्त झाले होते. त्यावरील पोपचें सांप्रदाययिक वर्चस्व जाऊन तेथील संस्थानिक हाच सांप्रदायिक बाबतींत मुख्य झाला. प्रबल सरदारांचा वर्ग नष्ट होऊन राजसत्तेला विरोध करणा-या सर्व संस्था अवनतीच्या मार्गास लागल्या होत्या. ग्रेट इलेक्टर गादीवर आला त्यावेळेस ब्रॅन्डेनबर्गची वर दिल्याप्रमाणें स्थिती होती. आतांपर्यंत ब्रॅन्डेनबर्गनें जर्मनांच्या किंवा यूरोपच्या राजकारणांत भाग घेतला नव्हता यापुढें ते यूरोपमध्यें एक बलिष्ठ राष्ट्र म्हणून पुढें आलें. ग्रेट इलेक्टरनें पुढीलप्रमाणें सुधारणा केल्या.
(१) ग्रेटइलेक्टरनें सैन्य सुधारणेकडे फार लक्ष दिलें. उत्तम शिपाई व उत्तम अधिकारी नेमून लष्करी शिक्षणानें त्यानें आपले सैन्य थोडक्याच दिवसांत यूरोपांतील कोणत्याहि राजाच्या सैन्याबरोबर टिकाव धरील असें केले.
(२) या कामाकरितां त्याला द्रव्याची फार जरूर लागे म्हणून त्यानें जमाबंदी खात्यांत सुधारणा करून तेथील घोटाळा नाहींसा केला.
(३) ब्रँन्डेनबर्ग संस्थान आतां विस्तारानें बरेच वाढलें. संस्थानांतील निरनिराळ्या प्रदेशांत एकसूत्रीपणा नसून तें अठरा प्रांतांचें कडबोळें होतें. प्रत्येक प्रांताच्या निरनिराळ्या स्वतंत्र संस्था असून तेथील लोक त्या संस्था कायम ठेवण्याकरितां फार प्रयत्न करीत. यामुळें एकछत्री राज्य होणें जवळ जवळ अशक्यच होतें. परंतु त्यावेळेस जर्मनाची अशी स्थिति होती की, जिकडे तिकडे अस्वस्थता माजून प्रबल राजे शक्तिहीन राजांना पदच्युत करून त्यांचें राज्य हिरावून घेत. या अशा परिस्थितींत प्रबल एकतंत्री राजसत्ता हा एकच रक्षणाचा उपाय होता. म्हणून ग्रेट इलेक्टरनें सर्व लोक-संस्थांचा नाश करून एकसत्तात्मक राजसत्ता स्थापन केली. याशिवाय त्यानें व्यापार व शिक्षण यांसहि उत्तेजन दिलें. उत्तम सेना, मुबलक पैसा, व प्रबल राजपुरूष या तीन साधनांनीं युक्त होत्सातें होलेनझोलर्न घराणें यूरोपच्या पटावर खेळावयास पुढें आलें स्पेनच्या गादीविषयी झालेल्या लढाईंत ब्रॅन्डेनबर्गच्या सैन्याची उपयुक्तता यूरोपांतील राजेलोकांनां कळून आली.
याप्रमाणें या कालापासून यूरोपच्या राजकारणांत रशिया व प्रशिया अशा दोन संस्थानांचा प्रवेश झाला. व येथून पुढें यूरोपांत महत्त्वाच्या घडामोडी घडून आल्या त्यांचा विचार पुढें एका स्वतंत्र प्रकरणांत केला आहे.