प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
सेनापतींचीं राज्यें - अलेक्झांडरला कोणी वारस नव्हता. यामुळें तो मेल्यानंतर जग जिंकण्याचें काम तहकूब राहून मॅसिडोनियाच्या पिच्छेहाटीस सुरुवात झाली. सैन्यांतील शिपाई हेच लोकांचे प्रतिनिधी मानले जात असल्यामुळे त्यांनीं आपल्या नायकांच्या नेतृत्वाखालीं राज्यकारभार हाती घेतला. इराणी बायका आतां टाकून देण्यांत येऊन महत्त्वाच्या सर्व प्रांतांवरील इराणी क्षत्रप काढून टाकण्यांत आले. परंतु अलेक्झांडरनें पादाक्रांत केलेला सर्व मुलूख एका सत्तेखालीं ठेवणें आतां अशक्य वाटूं लागलें. अलेक्झांडरच्या मागून त्याच्या गादीवर कोणी बसावें याबद्दल बराच काळपर्यंत सेनापतींमध्यें झगडा चालू होता. ॲटिगोनस अलेक्झांडरच्या गादीसाठीं आपल्या प्रतिस्पर्ध्यां लढत असतां सिल्यूकसनें सिंधुनदीपर्यंतचा इराणी साम्राज्याचा सर्व मुलूख आपल्या कबज्यांत घेऊन बाबिलोन ही आपली राजधानी केली. उत्तरमीडियामध्यें मात्र अलेक्झांडरनें नेमलेल्या इराणी ॲट्रोपाटीझ नांवाच्या क्षत्रपानें आपलें स्वातंत्र्य कायम राखलें होतें, व त्याच्या मागून त्याचे वारसच त्या प्रांताचा कारभार पाहूं लागले. तसेंच आर्मीनियामध्यें हैडार्नीडांचें इराणी घराणें टिकाव धरून राहिलें होतें, व याचसारखीं आशियामायनरमधील पहिला मिथ्राडेटीझ व पहिला एरिआरेथीझ या इराण्यांनीं स्थापिलेलीं पाँटस व कॅप्पाडोशिआ हीं राज्यें होतीं.