प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

सस्सन साम्राज्य - आर्सेसिडी राजघराणें पहिल्या मिथ्राडेटीझकडून स्थापन झाल्यानंतर ३५० वर्षे टिकलें. हें घराणें इतकें वर्षे टिकण्याचें कारण त्यांतील पुरुष बलवान् होते असें नाहीं. या घराण्याच्या सत्तेचा बाह्य विस्तार केवळ यदृच्छेनेंच झाला होता व विशेष कांहीं आपत्ति ओढविली नसती तर ती आणखीहि कित्येक शतकें टिकून राहिली असती. परंतु चौथ्या आर्टाबेनसच्या वेळीं पर्सिसमध्यें पहिला अर्देशिर (आर्टाक्सक्सींझ) नांवाचा एक मोठा पुरुष निपजला. हा सस्सनचा वंशज पापाक (बाबेक) याचा मुलगा असून तो पर्सिसमधील एका लहानशा संस्थानचा राजा होता. त्याच्या बापानें जुन्या पर्सेपोलिसच्या जागेवर असलेला इस्ताखर जिल्हा आपल्या ताब्यांत घेतला होता. अर्देशिरच्या कारकीर्दीस इ.स. २१२ पासून आरंभ होतो. त्यानें शेजारचीं संस्थानें काबीज करून आपल्या संस्थानाची मर्यादा वाढविली, व त्यामुळें त्याला चौथ्या आर्टाबेनसशीं युद्ध करावें लागलें. हे युद्ध बराच काळ चालू होतें. त्यांत पार्थियन लोकांचा तीन वेळां मोड होऊन त्यांपैकीं शेवटच्या लढाईंत आर्टाबेनस मारला गेला. अर्देशिरनें आर्सेसिडी राजघराण्यांतील हातीं पडले तेवढे सर्व पुरुष ठार केले. कांहीं राजपुरुष आर्मीनियांत पळून गेले, व तेथें आर्सेसिडी घराणें (इ.स. ४२९) कायम होतें. राहिलेली कार्मेनिआ, सूशिएना, मेसीनि ही सामंत संस्थानेंहि अर्देशिरनें आपल्या राज्यांत सामील करून घेतली व टेसिफॉनचा राजवाडा घेऊन त्यानें ''इराणी लोकांचा शहानशहा'' ही पदवी धारण केली.