प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
संघटना - बाह्यतः पार्थियन साम्राज्य हा अँकिमेनिड साम्राज्याचाच उत्तरभाग असावा असें वाटतें, परंतु वस्तुतः हें साम्राज्य पूर्वीच्या साम्राज्याहून अंतस्थ व बाह्य स्थितींत अगदीं भिन्न होतें. हें राज्य जगभर पसरलेलें नव्हतें. युफ्रेटीझच्या पश्चिमेकडील देश या राज्याच्या सत्तेखालीं केव्हांच आले नव्हते व इराणांतीलहि अर्धा भागसुद्धां आर्सेसिडींच्या अंमलाखालीं नव्हता. आजूबाजूंस त्यांचे कित्येक सामंत राजे होते हें खरें, तथापि ज्यांचा कारभार स्वतः राजाच्या क्षत्रपांकडून चालविला जात होता असा फारच थोडा मुलूख होता. या प्रदेशाचा विस्तार केवळ युफ्रेटीझ व उत्तर बाबिलोनियापासून दक्षिण मीडिया व पार्थियामधून अँराकोशिआ (वायव्य अफगाणिस्थान) पर्यंतच होता.
लहान संस्थानें राज्यांत सामील करून मोठें राज्य स्थापण्याचा प्रयत्न आर्सेसिडी राजांनीं केला नाहीं; यावरून त्यांचा दुबळेपणा व त्यांच्या शहानशहांची अल्प सत्ता या गोष्टी सिद्ध होतात. हें राज्य केवळ बाह्य व आकस्मिक परिस्थितीमुळें निर्माण झालें असून त्याचा पाया मजबूत नव्हता.
आपसांतील लढायांमध्यें पदच्युत झालेल्या राजांनां सिरियन लोक फिरून गादीवर बसवीत असत. पार्थियामध्यें हे लोक एतद्देशीय इराणी लोकांशीं संलग्न झाले होते व त्यांनीं त्यांचा पेहराव, धर्म व इतर चालीरीती अंगीकारिल्या होत्या.
आर्सेसिडी राजांचे औपचारिक विधी वगैरे सिल्यूकिडी रांपासून घेतलेले होते. आणि यांचीं नाणी व राज्यपद्धतींचा बराच भाग त्यांनीं ग्रीक लोकांपासून घेतला होता. जसजसा आर्सेसिडीच्या सत्तेचा फैलाव होऊं लागला तसतसें ते ग्रीक संस्कृतीचे भक्त बनले.
तथापि यांच्या कारकीर्दीत ग्रीक संस्कृतीविरुद्ध प्रतिक्रियाहि सुरु झाली होती. पार्थियन लोकांनां बलाढ्य राज्य स्थापतां आलें नाहीं. त्यांचे राजे ही केवळ सैन्यांतील सरदारांच्या हातांतील बाहुलीं होतीं, व हे सरदार आर्सेसिडी घराण्याशीं राजनिष्ठ होते तरी व्यक्तिविषयक निष्ठा त्यांच्यामध्यें नसल्यामुळें वाटेल त्या राजाला गादीवरून काढून त्यांच्या मर्जीस येईल त्यास गादीवर बसवीत. या राजांनां राजघराण्यांतील प्रत्येक पुरुषापासून (विशेषतः स्वतःच्या मुलांपासून देखील) भीति असे.