प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

रोमन लोकांशीं लढाया - रोमन लोक आतां टांयग्रेनीझवर स्वार्‍या करूं लागले, ही गोष्ट ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. फ्राएटीझनें लुकुलस व पाँपी यांशीं तह करून ६६ मध्यें रोमन लोकांस टायग्रेनीझवर स्वारी करण्याच्या कामीं मदत केली. रोमन लोकांनीं पार्थियन राजाला युफ्रेटीझ नदीपर्यंतचें त्याचें जुनें राज्य परत मिळवून देण्याचें आमिष दाखविलें होतें. परंतु रोमन सेनापतींनीं पुढें पार्थियन लोकांशीं केलेला तह पाळला नाहीं, व पार्थियनांत रोमन लोकांशीं लढण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें फ्राएटीझ स्वस्थ बसला.

आपल्या पूर्वजांचें वैभव फ्राएटीझला परत मिळवितां आलें नाहीं तरी तो आपणांस शहानशहा म्हणजे राजराजेश्वर म्हणवीत असे. फ्राएटीझचा ख्रि. पू. ५७ मध्यें त्याच्या मुलांकडून खून झाला.