प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मॅसिडोनचा उत्कर्ष - या मताच्या फलप्राप्तीला फार कालावधि लागत नाहीं. मॅसिडोनच्या फिलिप राजानें स्थापिलेली नवीन सत्ता लवकरच पहिल्या प्रतीची झाली; परंतु या सत्तेचा इराणी राज्याविरुद्ध कटाक्ष नव्हता. थ्रेस, इलिरिया व बाल्कन द्वीपकल्प हे प्रदेश काबीज करून मॅसिडोनियाचा विस्तार करावा असा या सत्तेचा प्रत्यक्ष उद्देश होता. परंतु ग्रीक संस्थानांस आपल्या सत्तेखालीं आणण्याच्या उद्योगांत मॅसिडोनला इराणाविरुद्ध ग्रीक लोकांचें ऐक्य करणें भाग होतें. येणेंप्रमाणें, लढाया केवळ अपरिहार्यच झाल्या होत्या. ख्रि. पू. ३४० मध्यें तिसर्या आर्टाक्सक्सींझनें मॅसिडोनियाच्या चढाईपासून बचाव करण्याकरितां पिरिंथस व बिझॅन्शिअम या थ्रेसमधील शहरांनां मदत केली; ३३८ मध्यें त्यानें डिमॉस्थिनीझशीं तह केला. केरोनीआचा विजय मिळाल्यावर ३३७ मध्यें फिलिपनें कॉरिंथचा सर्व ग्रीक संस्थानांचा अंतर्भाव करणारा संघ स्थापन केला; व राष्ट्रीय कार्यक्रम मान्य करून त्यानें ३३६ मध्यें आशियामायनरमध्यें आपलें सैन्य पाठविलें. सर्व इराणी साम्राज्य जिंकण्याचा त्याचा इरादा नव्हता. ग्रीक शहरें स्वतंत्र करून टॉरसपर्यंत आशियामायनर काबीज करावा ही जास्तीत जास्त फिलिपची महत्त्वाकांक्षा होती.
परंतु ३३६ मध्यें फिलिपचा वध झाल्यामुळें ही स्थिति अजीबात पालटून गेली. त्याच्या मागून त्याचा मुलगा अलेक्झांडर दि ग्रेट गादीवर बसला. हा लढवय्या व कुशाग्र बुद्धीचा राजकारणपटु पुरुष असल्यामुळें त्यानें मॅसिडोनियन लोकांच्या बळावर सर्व जग पादाक्रांत करण्याची अत्युच्च महत्त्वाकांक्षा धरली. जग जिंकण्याची कल्पना याच्या मनांत ऍकिमेनिड राजापेक्षांहि जास्त उत्कट असल्यामुळें त्यानें तें काम नेटानें हातीं घेतलें, व त्याचा अकाली मृत्यु झाला नसता तर तो आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्याशिवाय खास राहिला नसता.