प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मणीचें चरित्र - मणी हा उच्च कुलांत जन्मलेला एक-बटानाचा इराणी रहिवासी होता. केस्लरच्या मताप्रमाणें तो इ.स. २१५-२१६ त जन्मला. त्याच्या बापाचें नांव फटक असें असून त्यानें मणीला काळजीपूर्वक शिक्षण दिलें होतें. फटक हा दक्षिण बाबिलोनियांतील बॅप्टिस्ट लोकांच्या पंथांत असल्याकारणानें त्याच्या मुलासहि त्याच पंथाचें शिक्षण मिळालें. या बाबिलोनी पंथाचा एके साइट, हेमिरोबॅप्टिस्ट व मँडिअन या दुसर्‍या पंथांशीं उघड उघड संबंध असल्यामुळें व त्यांत ख्रिस्ती संप्रदायांतीलहि अनेक गोष्टींचा अंतर्भाव झाला असल्यामुळें मणीला लहान वयांतच निरनिराळ्या पंथांच्या स्वरूपांची ओळख झाली. वयाच्या २५ व्या किंवा ३० व्या वर्षी त्यानें आपल्या नवीन संप्रदायाच्या उपदेशास सुरुवात केली. इराणचा राजा, पहिला शापुर याच्या दरबारींच प्रथम ही सुरुवात झाली. आपल्या धर्मप्रसारार्थ त्यानें स्वतः दूरदूरचे प्रवास केले व आपल्या शिष्यांसहि देशपर्यटनार्थ पाठविलें. अक्टा अर्चेलाइवरून त्याची चळवळ पश्चिमेकडे ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रदेशापर्यंत जाऊन पोहोंचलेली दिसते. पूर्वेकडील ग्रंथ वगैरेवरून जी माहिती मिळते. तीवरून तो ट्रॅन्स ऑक्सेनिया, पश्चिम चीन या प्रदेशांत व दक्षिणेकडे हिंदुस्थानपर्यंत आला होता असें सिद्ध होतें. ही त्याची मोहीम यशस्वी झाली. त्याच्या मागून झालेल्या महंमद पैगंबराप्रमाणें तोहि मी शेवटचा व श्रेष्ठ पैगंबर आहें, मला ईश्वरानें सर्व श्रेष्ठ धर्मसंस्थापना करण्याकरितां धाडिलें आहे वगैरे सांगत फिरे. पहिल्या शापुरच्या कारकीर्दीच्या शेवटीं (इ.स.२७०) तो इराणच्या दरबारीं परत आला. तेथें त्याचे पुष्कळ भक्त होते, पण मगी पुरोहितवर्गाचें त्याच्याशीं हाडवैर होतें. या पुरोहितांनीं राजाशीं संधान बांधून त्याला कैद केलें. तथापि तो कैदेंतून पळाला. पहिल्या बहिरामनें त्याला धर्मवेड्या मगी लोकांच्या स्वाधीन केलें. इ.स. २७६-७७ त त्याला सुळावर चढवून ठार मारण्यांत येऊन त्याच्या अनुयायांचा निष्ठुरपणानें छळ करण्यांत आला.