प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मणिसांप्रदायी लोकांची आचारनीति, समाजघटना व उपासनापद्धति - मणिसंप्रदायी नीतिशास्त्र नुसतें निषेधात्मक स्वरूपाचें नाहीं. त्याचा उद्देश आत्मविनाश नसून आत्मसंरक्षण हा आहे. तथापि तें निवळ तपस्वीवृत्ति शिकविणारें आहेसें दिसतें. ह्या संप्रदायांतील लोकांनां विषयसुखापासून परावृत्त रहावें लागे. (१) कोणत्याहि तर्हेचें वाईट अन्न (याला वनस्पत्याहार अपवार असे, कारण वनस्पतींच्या ठायीं जास्त प्रकाश असतो); मांस, दारू यांचें सेवन करावयाचें नाहीं; (२) तिमिरतत्त्वें ज्यांत आहेत अशा गोष्टींशीं संबंध ठेवावयाचा नाहीं; (३) व कोणत्याहि प्रकारें विषयेच्छातृप्ति करावयाची नाहीं (अर्थात् विवाहसंमत नसे); अशीं ही तीन व्रतें पाळावीं लागत. कांहीं राशीनक्षत्रादिकांच्या योगांवर त्यांनां उपवास करावा लागे. त्यांनां दिवसांतून चार वेळां स्नान करून प्रार्थना करावयाची असे. प्रार्थनेच्या वेळीं प्रकाश जिकडे असेल तिकडे तोंड वळवून प्रकाशाशिपति ईश्वर, प्रकाशाचें संपूर्ण राज्य, तेजोमय देवता व मणी यांची त्यांनां आराधना करावी लागे. मणिसंप्रदायाची ही अशा प्रकारची कडक व तापदायक तपस्या फार थोडे लोक पाळतील व त्या संप्रदायाची वाढ होणार नाहीं म्हणून दोन पंथ काढण्यांत आले. एक तंतोतंत ह्या संप्रदायाप्रमाणें चालणार्या लोकांचा व दुसरा प्रापंचिक लोकांचा. प्रापंचिकांकरितां धर्मशास्त्रांत बरीच सोडवणूक ठेवण्यांत आली. हे दोन पंथ करण्यांत ह्या संप्रदायाचें कॅथोलिक संप्रदायाशीं सादृश्य आहे. दुसर्या पंथांतील लोक पहिल्या पंथांतील लोकांनां गुरुस्थानीं मानून त्यांच्याकडून धर्मशिक्षण घेत असत. याच्या मोबदला ते त्यांनां भरपूर अन्नदान करीत असत. कारण ते लोक अन्न खाऊन वनस्पतींत असणार्या प्रकाशास स्वातंत्र्य देतात अशी समजूत होती. हे सांप्रदायिक नियमानुसार चालणारे प्रापंचिक लोकांकरितां ईश्वरापाशीं प्रार्थना व रदबदली करीत असत; व यामुळें मरणानंतर त्यांच्यावर होणार्या विशुद्धीकरणक्रियेंतील बराच भाग कमी होत असे.
या लोकांची उपासनापद्धति फार साधी असली पाहिजे असें दिसतें; तींत, प्रार्थना, स्तोत्रें व पूजापद्धति एवढेंच काय तें असावें. ह्या संप्रदायांतील निदान पश्चिमेकडच्या तरी लोकांनीं ख्रिस्ती देवालयांची सण पाळण्याची पद्धति स्वीकारली असावी. हे लोक कांहीं विशिष्ट सण साजरे करीत. मुख्यत्वेंकरून मार्च महिन्यांत मणीच्या मृत्यूची तिथि पाळण्यांत येत असे तो बीमा नांवाचा अध्यापकपीठाचा सण सर्व जातींतील लोक साजरा करीत असत.