प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मीडियाचें साम्राज्य - या राज्याच्या इतिहासाविषयीं हिरोडोटसमध्यें कांहीं वर्णन आहे. हिरोडोटस म्हणतो कीं, मीड लोकांनीं असुरियाविरुद्ध सुमारें ख्रि. पू. ७१० या वर्षी बंड केलें; व डायोसीस यानें हें राज्य स्थापलें; याचा मुलगा फ्राओटींझ यानें देश जिंकण्याचें काम केलें; व त्याचा मुलगा सायाक्सारीझ यावर प्रथम सिथियन लोकांनीं हल्ला केला. पुढें त्यानें निनिव्हि काबीज करून मीडियाची सत्ता वाढविली. यानंतर बाबिलोनी राजा नाबोनिडस (ख्रि. पू. ५५५-५३९) याच्या शिलालेखांवरून थोडीशी माहिती मिळते, व नंतरची कांहीं माहिती जुन्या करारातून काढतां येते. खुद्द मीडियाच्या साम्राज्याचें एकहि स्मारक उपलब्ध नाहीं; यामुळें या साम्राज्याबद्दल जग अद्यापि अज्ञानांतच आहे.
ब्रिटानिका ११ वी आवृत्तीमध्यें मीडियाच्या राज्याला ख्रिस्ती शकाच्यापूर्वी ६४० या वर्षाहून अगोदर सुरुवात झाली नसावी अशी समजूत व्यक्त केली आहे. पण तीस समाधानकारक आधार दिला नाहीं. असुरी राज्य मोडून मीडिया, बाबिलोन, इजिप्त, सिलिशिया व लिडिया हीं राज्यें निर्माण झालीं. पैकीं मीडियाचें राज्य फार प्रबळ होतें.
सायरसच्या पूर्वी म्हणजे अकिमिनियन या राजघराण्यापूर्वी इराणचा इतिहास बराच मनोरंजक कथांनीं भरला आहे. त्यांतील सोराब व रुस्तुम यांची कथा त्यावरील झालेल्या आर्नोल्डच्या एका काव्यामुळें बरीच प्रसिद्ध आहे. त्या काळाचा इतिहास एस. जी. डब्ल्यू बेंजामिननें आपल्या ग्रंथांत थोडक्यांत येणेंप्रमाणें दिला आहे.